scorecardresearch

सावकाराच्या जाचामुळे युवकाची आत्महत्या

सावकाराच्या जाचाला कंटाळून सातपूर येथे एका ३० वर्षांच्या युवकाने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

नाशिक : सावकाराच्या जाचाला कंटाळून सातपूर येथे एका ३० वर्षांच्या युवकाने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी युवकाच्या कुटुंबीयांनी सातपूर पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश सोनवणे असे मृत युवकाचे नाव आहे.

सातपूर परिसरातील अशोकनगरात नीलेश सोनवणे हा कुटुंबीयांसह राहत होता. नीलेशला आर्थिक चणचण भासत असल्याने त्याने खासगी सावकारी करणाऱ्या निखिल भावले याच्याकडून १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी भावले हा सातत्याने तगादा लावत होता. तो शिवीगाळ करीत असल्याने नीलेश तणावात होता. पैसे वसुलीसाठी भावले याने नीलेशची दुचाकी उचलून नेली होती. या साऱ्या प्रकाराने खचलेल्या नीलेशने गळफास घेतल्याचा आरोप सोनवणे कुटुंबीयांनी केला आहे. भावलेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेकायदेशीर सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या नव्या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी केल्यास संबंधितांस पाच वर्षांपर्यंत कैद किंवा ५० हजार रुपयांपर्यंत दंड यापैकी एक किंवा दोनही प्रकारच्या शिक्षेची तरतूद आहे.

तसेच परवाना प्राप्त करुन घेताना हेतूपुरस्पर आणि जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती अर्जासोबत सादर केल्यास दोन वर्षांपर्यंत कैद किंवा २५ हजार रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. परंतु, या कायद्याची अद्याप प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने सावकारी पेशाचा विळखा सर्वसामान्यांना पडत आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Youth commits suicide due to money lender harassment zws

ताज्या बातम्या