नाशिक – मित्रांसमवेत फटाके फोडत असताना भावाने टोकल्याने संतप्त २२ वर्षाच्या युवकाने नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. चेहडी पंपिग येथे हा प्रकार घडला. किती फटाके फोडतो, घरात ये, हे भावाचे बोलणे संबंधिताला अपमानास्पद वाटल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
अनिकेत बोराडे (मारूती मंदिराजवळ, चेहडी, नाशिकरोड) असे मृत युवकाचे नाव आहे. अनिकेत रात्री आपल्या मित्रांसमवेत घराजवळ फटाके फोडत होता. बराच उशीर झाल्याने भाऊ दीपकने त्याला आवाज दिला. किती फटाके फोडतो, घरात ये, असे सांगितल्याने अनिकेत संतप्त झाला. मित्रांमध्ये अपमान केल्याच्या भावनेतून तो मित्राची दुचाकी घेऊन चेहडी पंपिगच्या दिशेने निघून गेला. यावेळी दोघा मित्रांनी त्याचा पाठलाग केला. ते पोहचण्याआधीच अनिकेतने पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. याची माहिती उपस्थित मित्रांनी कुटूंबियांना कळविल्याने बोराडे कुटूंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळला. या बाबत दीपक बोराडे यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
