नाशिक : नाशिकरोड परिसरातील गाडेकर मळा येथील २९ वर्षाच्या युवकाचा बुधवारी सकाळी कामावर जात असतांना भरधाव मालमोटारीची दुचाकीला धडक बसल्याने मृत्यू झाला.
सिन्नर फाटा परिसरातील गाडेकर मळा येथे अमित मिश्रा (२९) हे कुटूंबासमवेत राहत होते. बुधवारी सकाळी इंदिरा नगर येथील डब्ल्यूएनएस या ठिकाणी कामावर जाण्यासाठी ते दुचाकीने निघाले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकी उड्डाणपुलावरून मार्गस्थ झाली असतांना दत्त मंदिराजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव मालमोटारीची दुचाकीला जोरदार धडक बसली.
हे ही वाचा…Malegaon Central : मुस्लीम समाजाचं वर्चस्व असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघाची पार्श्वभूमी काय आहे?
या धडकेमुळे अमित हे लांबवर फेकले गेले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला लोकांनी पकडले. त्याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या अपघातामुळे उड्डाणपुलावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. अमित यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.