जळगाव – जिल्ह्यातील यावल तालुक्यात निंबादेवी धरणात मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेला तरूण बुडाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती. यावल पोलिसांसह महसूलच्या कर्मचाऱ्यांनी त्याच दिवशी तसेच सोमवारी धरणातील पाण्यात त्याचा शोध घेतला. बुडालेल्या तरूणाचा सोमवारी सायंकाळपर्यंतही शोध लागला नाही.

सातपुड्याच्या पायथ्याशी सावखेडा सीम गावाजवळ निंबादेवी धरण असून, त्याठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यापूर्वी, या धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अनेकांनी जीव देखील गमावला आहे. त्यामुळे निंबादेवी धरण भरल्यानंतर त्या परिसरात कोणालाच फिरकू दिले जात नाही. तिथे पोलीस बंदोबस्तही लावला जातो. यंदा, पावसाला अद्याप जोर नसल्याने धरण भरलेले नाही. त्यानंतरही तिथे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील आठ समवयस्क तरूण रविवारची सुटी घालविण्यासाठी गेले होते. काही तरूण धरणातील पाण्यात अंघोळीसाठी उतरले. त्यापैकी जतीन वार्डे (१८) हा अचानक खोल पाण्यात गेला. गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या बरोबर असलेल्या तरूणांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत तो बुडाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरूण पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार हर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी, संतोष पाटील यांना तातडीने निंबादेवी धरणावर रवाना केले. महसूल विभागाच्या मदतीने पोलिसांनी रविवारी अंधार पडेपर्यंत जतीनचा पाण्यात शोध घेतला. परंतु, तो मिळून आला नाही. पोलीस निरीक्षक धारबळे यांनी स्वतः सोमवारी सकाळपासून स्थानिक पोहणाऱ्यांची मदत घेऊन पुन्हा शोध घेतला. मात्र, सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नाही. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.