वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे शून्य सर्पदंश मोहीम ; जनजागृतीवर भर

पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. त्याच वेळी शेत शिवारात, मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढले आहे.

वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे शून्य सर्पदंश मोहीम ; जनजागृतीवर भर
( प्रतिनिधिक छायाचित्र )

नाशिक : पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. त्याच वेळी शेत शिवारात, मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. साप दिसताच भीतीने ते मारलेही जात आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने शून्य सर्पदंश मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पाऊस सुरू झाला की बिळांमध्ये पाणी जाऊन साप बाहेर येण्यास सुरुवात होते. पावसाळा हा बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजननकाळ असतो. साप राहात असलेल्या अडगळीच्या जागी, बिळामध्ये पाणी साचते. त्यामुळे भक्ष्य मिळविण्यासाठी, सुरक्षित जागेच्या शोधात साप फिरत असतात. या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास काही वेळा साप आढळून येतात. नागरिकांनी साप दिसला तर घाबरून न जाता साप आणि त्यांचे वर्तन याची किमान शास्त्रीय माहिती घेणे गरजेचे असल्याचे वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष जयेश पाटील यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात मानवी वस्तीजवळ आढळणाऱ्या केवळ चारच सापांच्या जाती विषारी आहेत. यामध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे यांचा समावेश आहे. शेत शिवारात नाग आणि घोणस यांचे वास्तव्य जास्त असते. रहिवासी भागातही या विषारी सापांचा वावर नेहमी आढळून येतो. जून ते ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांनी जमिनीवर झोपणे टाळले पाहिजे. रात्रीच्या वेळी होणारा कोणताही दंश अपरिचित सर्पदंश समजून तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा जवळच्या रुग्णालयात जावे.
संस्थेच्या वतीने सर्प आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी शून्य सर्पदंश हे अभियान सुरू करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून जनजागृती, सापांबद्दल माहिती तसेच दंश होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती दिली जात आहे. वनविभागही यात सहभागी आहे.
नागरिकांनी जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी घरात साप निघाला असेल किंवा सर्पदंश झाल्यास संस्थेच्या ८१४९३३०८७३ या किंवा मदतवाहिनी क्रमांकांवर अथवा वनविभागाच्या १९२६ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
साप घरात, अंगणात दिसल्यास काय कराल ?
साप घरात, अंगणात दिसल्यास त्याला न मारता वनविभाग किंवा आपल्या माहितीतील जाणकार सर्पमित्राला बोलवा. सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षित अंतरावरून सापावर व्यवस्थित लक्ष ठेवा, सापाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे मानवी वस्तीजवळ आढळणारे प्रमुख चार विषारी साप आहेत. यांचा दंश प्राणघातक असतो. सापांबद्दल पूर्ण ओळख आणि माहिती नसताना कोणताही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका.
सर्पदंश झाल्यास काय कराल?
सर्पदंश झाल्यास लवकरात लवकर रुग्णालयामध्ये पोहोचणे गरजेचे आहे. रुग्णाला धीर द्यावा. अनेक वेळा भीतीनेच रुग्ण दगावतात. शक्य असल्यास सापाकडे नीट लक्ष द्या. लांबून फोटो घेता आल्यास सापाचा फोटो घ्या, जेणेकरून आपल्याला डॉक्टरांना किंवा सर्पमित्रांना सापाबद्दल माहिती देता येईल. पीडित व्यक्तीला हालचाल करू देऊ नका. जखमेच्या ठिकाणी दागिने असल्यास ते काढून घ्या. पायाला किंवा पंजाला साप चावला असल्यास पायातील बूट काढून घ्या. जखम पाण्याने आणि साबणाने धुवा. पूर्ण ज्ञान असल्याशिवाय चिरा देऊ नका.
घराच्या आसपास साप येऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी
घराच्या तसेच कुंपण भिंती यांना पडलेल्या तडा बुजवा. गटारीच्या पाइपला जाळय़ा बसवा. घराजवळ पाला- पाचोळा, कचऱ्याचे ढीग, दगड- विटाचे ढीग, लाकडांचा साठा करून ठेवू नये. घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. खिडक्या- दरवाजे यांना लागून झाडांच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गवतातुन चालताना पायात बूट असावेत. शेतात काम करताना गवतात एकदम हात घालू नका. अंधारातून जाताना नेहमी विजेरी (टॉर्च) सोबत बाळगावी. कोणताही साप सरपटत असताना भिंतीच्या लगत चालतो. जमिनीवर झोपायचे असल्यास अंथरुण भिंतीलगत न ठेवता मध्यभागी ठेवावे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Zero snake bite campaign by the wildlife conservation society amy

Next Story
दोन दुकानदारांसह हॉटेल व्यावसायिकाला दंड ; प्लास्टिक वापरामुळे कारवाई
फोटो गॅलरी