..आणि याच दोन वर्षांत माझ्या आयुष्यात एक असं ठिकाण आलं, की गेली ३० र्वष त्या स्थळाशी माझं कायमचं भावनिक नातं निर्माण झालंय. ते म्हणजे रुईया नाका! चार-पाच र्वष मी रुईया नाकाचा डे-नाइट मेंबरहोतो..

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

‘रंग उमलत्या मनाचे’ नाटकाच्या प्रयोगांनी तेव्हा वातावरण अक्षरश: दणाणून गेलं होतं. मुंबई, पुणे, ठाणे, पाल्रे, नाशिक आणि अन्य शहरांमध्येही ‘हाऊसफुल्ल शो’ सुरू झाले होते. रंगमंचावरचं नाटक प्रत्यक्ष रंगतं कसं, रसिक प्रेक्षकांची पात्रांच्या एन्ट्रीला आणि कानेटकरांच्या नसर्गिक संवादांना खळखळून दाद कशी मिळते, हे अंधाऱ्या नाटय़गृहाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमधून बघण्याचे तृप्त क्षण या नाटकानं दिले. आता हा लेख लिहिताना आठवलं की त्यावेळी दोन नाटकांनी ते वर्ष गाजवलं होतं. ‘कलावैभव’चं जयवंत दळवी लिखित, वामन केंद्रे दिग्दर्शित ‘नातीगोती’ आणि ‘चंद्रलेखा’चं वसंत कानेटकर लिखित ‘रंग उमलत्या मनाचे’! गंमत म्हणजे या नाटकातल्या ‘बच्चू’ आणि ‘चित्ता’ या भूमिका गाजवणारे दोन्ही मित्र होते रुपारेल महाविद्यालयाचे. अतुल परचुरे आणि सुमीत राघवन! यापकी सुमीतबद्दल यापूर्वीच्या लेखात विस्तारानं लिहिलंच आहे. पण ‘नातीगोती’तली अतुलची भूमिका ही मला आजवर आवडलेल्या भूमिकांपकी एक आहे. लिखित संवादांची मदत नसताना फक्त शारीर अभिनयातून त्यानं ताकदीनं साकारलेल्या या ‘बच्चू’नं तेव्हा सगळ्यांच्याच मनाचा ठाव

घेतला होता.

आजकाल जवळपास प्रत्येक आठवडय़ात होणारे चकचकीत, भव्य सन्मान सोहळे, अ‍ॅवार्ड फंक्शन्स, त्यांचे टेलिव्हिजनवर होणारे डोळे दिपवून टाकणारे ‘इव्हेंट्स’ त्याकाळी नव्हते. वर्षांअखेर ‘रंगभवन’मध्ये होणारा दामले परिवाराचा ‘नाटय़दर्पण सोहळा’ हे एकमेव ‘ग्लॅमर’ नाटय़क्षेत्राला तेव्हा ठाऊक होतं. जवळजवळ मराठीतला ‘ऑस्कर सोहळा’च म्हणा ना! त्याचं महत्त्व तेव्हा खूप मोठं असे! याच ‘नाटय़दर्पण रजनी’मध्ये तेव्हा एक ‘नाटय़पूर्ण घटना’ घडली. आधी घट्ट मत्री आणि नंतर खूप काळ अबोला असलेल्या मोहन वाघ आणि प्रभाकरपंत पणशीकर यांचे ‘मनोमीलन’ याच रंगमंचावर सर्वासमक्ष घडलं! त्यावर्षीचं सर्वोत्कृष्ट नाटकाचं पारितोषिक ‘रंग उमलत्या मनाचे’ला घोषित झालं आणि ‘नाटय़दर्पण’ची ट्रॉफी प्रदान करायला सुधीर दामलेंनी चक्क पंतांना पाचारण केलं. मोहन वाघ स्टेजवर. ‘आता काय होणार?’ या उत्सुकतेनं क्षणभर सारे प्रेक्षक स्तब्ध झाले. आणि या जीवलग दोस्तांची गळाभेट झाल्यावर टाळ्यांच्या कडकडाटानं वातावरण रोमांचित झालं. ही मत्री नाटय़क्षेत्राला उत्तेजन आणि प्रेरणा देणारी आहे हे जाणवूनच हा ‘नाटय़पूर्ण’ क्षण दामले आणि इतर ज्येष्ठ मंडळींनी जुळवून आणल्याचे किस्से पुढे अनेक दिवस रंगत राहिले. त्यानंतर रोज रात्री दादरमधल्या ‘जिप्सी’च्या मोहनकाकांच्या ‘कायम आरक्षित’ टेबलवर हे जिगरी दोस्त पुन्हा एकत्र बसून नव्या जोमानं भावी योजना ठरवू लागले.

पुढच्याच वर्षी रंगमंचावर आलेलं ‘चंद्रलेखा’चं ‘ज्वालामुखी’ हे नाटक त्याचंच फलित! हिंदू-मुस्लीम प्रश्नावरचं, काश्मीरच्या पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या या नाटकाचं अशोक पाटोळेंनी केलेलं लेखन, शीर्षक, पुनल्रेखन, पुन्हा वेगळ्याच भूमिकेतला सुमीत राघवन, पुण्याची ‘पुरुषोत्तम’ गाजवून मुंबईत झालेली चिन्मयी सुर्वेची एन्ट्री.. या सगळ्या वेगवान घटनांबरोबरच थेट ‘पंतां’ना दिग्दर्शित करण्याची मला संधी मिळणं.. असं सगळं या नाटकामुळे एकाच वेळी घडलं! (पुढे चिन्मयीनं फक्त पुण्यातून मुंबईतच नाही, तर सरळ सुमीतच्या ‘मनात’च एन्ट्री केली आणि काही वर्षांतच ती त्याची पत्नीही झाली!) हा गंभीर विषय फक्त वरवर न हाताळता काश्मीर प्रश्नाचा नेमका तिढा समजावून घेणं, िहदू-मुस्लीम संघर्षांच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न, अशोक पाटोळेंनी खुल्या दिलानं केलेल्या चर्चा या सगळ्यात मला मोहनकाका, पंत, डॉ. भालचंद्र कानगो, लोकवाङ्मय गृह, अनंत अमेंबल या सर्वानी फार मोलाची मदत केली. या नाटकाच्या तालमी आणि चर्चामधून ‘पंतां’शी अगाध स्नेह निर्माण झाला. पंत म्हणजे प्रचंड वाचन, व्यवस्थापक ते ‘लखोबा लोखंडे’पर्यंतचा त्यांचा रंगभूमीवरचा अद्भुत प्रवास, ‘नाटय़संपदा’चे हजारो प्रयोग, दौरे, किस्से असा अनुभवांचा खजिनाच होता. तासन् तास तालमी करण्याची त्यांची शिस्त, चच्रेचा खुलेपणा, मोहनकाका आणि त्यांची आपसातली मिश्किल शेरेबाजी, टोमणे सगळंच खूप समृद्ध करणारं होतं!

..आणि याच दोन वर्षांत माझ्या आयुष्यात एक असं ठिकाण आलं, की गेली ३० र्वष त्या ‘स्थळा’शी माझं कायमचं भावनिक नातं निर्माण झालंय. ते म्हणजे रुईया नाका! ‘आय. एन. टी.’च्या निमित्तानं ज्येष्ठ मित्र प्रमोद पवार यानं मला सहजच, ‘चल माझ्याबरोबर’ म्हणून रुईया महाविद्यालयात नेलं. त्यावर्षीच्या आय. एन. टी. स्पध्रेसाठी रुईयासाठीची एकांकिका तेव्हा तो शोधत होता. ‘रुईया नाटय़वलय’च्या ३०-४० उत्साही विद्यार्थ्यांच्या ऑडिशन्स घेत होता. पुढे अचानक लक्ष्मण लोंढेंच्या ‘आरण्यक’ कथेवर आधारित एकांकिका करण्याची जबाबदारी त्यानं माझ्यावर सोपवली आणि पुढे मी तिथे कायमचा रुजलो. ‘आरण्यक’, ‘सती’ अशा दोन एकांकिका लागोपाठ मी त्या काळात दिग्दर्शित केल्या. पण या दोन वर्षांतल्या वेगवान घटनांचा वेग आठवून मी आजही स्तंभित होऊन जातो. वास्तविक ‘सती’ हे दोन अंकी नाटक. पण त्यातल्या कथानकाची पुनर्माडणी आणि संकलन करून संजय पवारने एक उत्तम ‘ड्राफ्ट’ बनवला. खास ‘संजय पवार’ शैलीतली ही रचना होती. ‘सती’च्या निमित्तानेच मला संजय नार्वेकर, सोनिया मुळ्ये (परचुरे), असिता जोशी, अभिजित पानसे, नीलेश दिवेकर, गजेंद्र अहिरे आणि असंख्य तरुण मित्रमत्रिणी भेटले; जे पुढे कायमचेच दोस्त बनले. (सगळ्या रुईया गँगची नावं मी इथं लिहिली तर चार लेखांची शब्दमर्यादाही पुरेशी होणार नाही, हे ‘नाका’ गँगने कृपया समजून घ्यावे.) पुढची चार-पाच र्वष मी ‘रुईया नाका’चा ‘डे-नाइट मेंबर’ होतो. ‘डीपी’त पडीक होतो, ‘मणीज्’मध्ये खादाडी करत होतो आणि कॉलेजसमोर फुटपाथ, कट्टा, रुईयाचं कँटीन, ऑडिटोरियम.. असा तिथल्या गर्दीत मिसळून गेलो होतो. पुढे अनेक वर्षांत ‘रुईया नाटय़वलय’च्या उपक्रमातून नवनवीन लेखक, दिग्दर्शक, कलावंत निर्माण होतच राहिले. त्यांनी सगळ्यांनी पुढे नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी माध्यमांत खूप नाव कमावलं. या सगळ्यांशी माझं भावनिक नातं जोडलं गेलंय. आजही अनेक जणांना मी रुईयाचाच माजी विद्यार्थी आहे असं वाटतं.

१९९० चं संपूर्ण वर्ष ‘सती’नं दुमदुमत राहिलं. ‘आय. एन. टी’, ‘उन्मेष’, ‘मृगजळ’, ‘सवाई’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये त्या वर्षी झाडून या एकांकिकेनं लेखन, दिग्दर्शन, अभिनयाची सर्व पारितोषिकं पटकावली. एक वेगळीच गमतीशीर आठवण यानिमित्तानं सांगावीशी वाटते. ‘सती’मधल्या पडखाऊ, मध्यमवर्गीय नायकाचं (सदाशिव मुखेडकर) बुजरं व्यक्तिमत्त्व आणि प्रत्यक्षातला मोठे डोळे, जाड मिशी असलेला संजय नार्वेकर हे ‘कॉम्बिनेशन’ सुरुवातीला काही काळ मला सतत खटकत होतं. एका क्षणी त्यानं ही ‘मिशी’च काढून टाकली तर..? असा विचार चमकून गेला. सुरुवातीला एकदम ही कल्पना झटकून टाकणाऱ्या संजयला मी आणि आजूबाजूच्या सर्व मित्रांनी हळूहळू यासाठी तयार केलं! पण त्यामुळे एकदम कलाटणी मिळाली आणि त्याचा चेहरामोहरा बदलून तो गरीब ‘सदाशिव’ दिसू लागला, हे तो आज त्याच मिशीवर ताव मारीत कबूलही करेल! त्याची रंगमंचावरची एनर्जी, अफलातून ‘टायमिंग’, संजय पवारचे मार्मिक व भेदक संवाद, सोनियाचा तडफदार अभिनय आणि रंगमंचावरचा सहज वावर, वेगवान प्रयोग, स्टेजवर ३५ आणि विंगेत वीसेक जण, वाक्यावाक्याला मिळणारा ‘बेफाम’ प्रतिसाद असा ‘सती’चा माहौल होता! रंगमंचावर घडून जाणारं ते जणू ४० मिनिटांचं वादळच होतं. ‘सती’च्या प्रत्येक प्रयोगानंतरचा टाळ्यांचा कडकडाट आणि प्रत्येक बक्षिसानंतर नाटय़गृहात घुमणारा ‘रुईऽऽया.. रुईयाऽऽ’ हा जल्लोष आमच्या सर्वाच्याच कानात आजही आहे!

..आणि याच दरम्यान जवळजवळ सिनेमात शोभावा असा एक प्रसंग ‘नाक्या’वर घडला. मी कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यांशी रिहर्सल्सविषयी बोलत होतो. अचानक कुणीतरी मागून आलं आणि त्यानं मला समोरच्या फुटपाथकडे बोट दाखवत सांगितलं, ‘‘तुम्हाला बोलवलंय तिकडे.’’ मी वळून बघितलं तर रस्ता ओलांडून एक कंपू गप्पा मारत उभा होता. बहुधा ते माजी विद्यार्थी किंवा नाक्यावर सहज रेंगाळायला आलेले कुणीतरी असावेत असा अंदाज घेत मी तिथं पोहोचलो. त्यातल्या एका उंच, गोऱ्या, भेदक नजर असलेल्या तरुणानं शेकहँडसाठी हात पुढे केला आणि त्याच्या ठेवणीतल्या आवाजात तो म्हणाला, ‘‘मी महेश मांजरेकर! आय. एन. टी.च्या प्राथमिक फेरीत एकांकिका खूप ‘कडक’ झाली असा रिपोर्ट आहे. फायनलला आम्ही सगळे आहोत तुमच्या मदतीला. दणक्यात करा प्रयोग.’’ महेश मांजरेकर, अजय फणसेकर, संदीप पडियार, क्रिकेटवाली गँग, काही डॉक्टर्स, नोकरदार अशी वेगवेगळ्या क्षेत्रांतली ही मंडळी हे खरे ‘नाका मेंबर’ असल्याची माहिती मला हळूहळू मिळत गेली. महेश मूळचा विनय आपटेंच्या  ‘अफलातून’ गँगमधला! त्यापकी प्रत्येकानंच पुढे जाऊन आपापली ओळख निर्माण केली हे सर्वज्ञात आहे. तेव्हा महेश-अजयचं एक नाटकही व्यावसायिक रंगमंचावर सुरू होतं. आज विविध क्षेत्रांत स्वतचा ‘ब्रँड’ निर्माण केलेल्या महेशच्या त्या सुरुवातीच्या काळातला मी मित्र असल्यानं आमची दोस्ती निरपेक्ष आणि पक्की राहिली. विनय आपटे आणि महेश मांजरेकर या जवळपास एकाच स्वभावधर्माच्या जिगरी दोस्तांनी तेव्हा जो मला आणि ‘जिगीषा’तल्या प्रत्येकाला भरभरून पाठिंबा दिला, प्रेम दिलं ते विसरणं अशक्य आहे.

नरिमन पॉइंट, विक्रोळी, ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी दिवसभर कामं करून संध्याकाळी शिवाजी पार्कच्या एका कोपऱ्यात जमायचं; त्या दिवशी काय काय झालं, हे एकमेकांना सांगायचं असा आमचा ‘जिगीषा’तल्या मित्रांचा तेव्हा शिरस्ता होता.. जो आम्ही कधीही मोडला नाही. कारण तोच आमचा सगळ्यांचा भावनिक आधार होता, शेअरिंग होतं. कोणतेही निर्णय घेताना एकमेकांना सूचना देणं, संभाव्य अडचणींविषयी बोलणं होत असे. त्या आमच्या रोजच्या जमण्यातही महेश अत्यंत सहजतेनं सामील व्हायचा.

एकूणच मुंबईत येऊन एव्हाना दीड-पावणेदोन र्वष होत आली होती. नवीन माणसं जोडली जात होती, एकापाठोपाठ संधीही मिळत होती. नोकरी आणि तालमींची, प्रयोगांची तारेवरची कसरत करणं हळूहळू कठीण होतंय ही जाणीवही व्हायला सुरुवात झाली होती. या काळात विनय आपटेनं फार प्रेमानं, आग्रहानं समजावलं, की जर हेच काम पूर्णवेळ करायला आला आहेस तर निर्णयाची हीच ती वेळ! नाहीतर मग पुढे कुतरओढ होत राहील. आपण स्थर्याचा, आर्थिक सुरक्षिततेचा विचार करत राहतो आणि पुढे जाऊन पुन्हा फक्त पश्चात्तापच करावा लागतो. स्वतच्या उशिरा नोकरी सोडण्याच्या निर्णयाबाबत त्याचं सतत हेच म्हणणं होतं. फक्त समजावून सांगून तो थांबला नाही, तर ‘तुला जेवढा मासिक पगार आता मिळतो, त्याची फिक्स जबाबदारी माझी!’ म्हणून त्यानं त्याच्याकडे कामही दिलं आणि मला नोकरी सोडण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचायला खूप आश्वासक साहाय्य केलं. ‘जर-तर’च्या सिद्धान्तात आता या क्षणांचं मोल किती मोठं आहे, हे सतत जाणवून विनयविषयीची आस्था मनात दाटून येते.

अर्थात, हेही खूप छोटं वळण असणार होतं. आणि माझ्यासाठी मुंबईत आल्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं असणारं १९९१ हे वर्ष जणू माझी वाट पाहत होतं.. अजून काहीतरी ‘ड्रॅमॅटिक’ घडण्यासाठी!

chandukul@gmail.com