घरापासून दूर असलेल्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात १९७८ साली मी प्रवेश घेतला तो दोन गोष्टींमुळे.. शाळेतल्याच मित्रांचा सहवास आणि वक्तृत्वाची आवड. पुण्या-मुंबईला जसा एकांकिका स्पर्धाचा जोर, तसा मराठवाडय़ात त्यावेळी वक्तृत्व-वादविवाद स्पर्धाचं सळसळतं वातावरण होतं. आज समाजकारण, राजकारण, पत्रकारिता, साहित्य क्षेत्रात गाजत असलेल्या अनेकांचा पाया याच स्पर्धामध्ये पक्का झालेला आहे. त्यातही आमच्या महाविद्यालयाला तर एका दशकाची विजयी परंपरा. प्रा. वसंत कुंभोजकर सर वक्तृत्वाच्या मार्गदर्शनाचं कार्य व्रतस्थपणे झपाटल्यासारखं करायचे. वर्षभरात कोणकोणत्या स्पर्धामध्ये सहभागी व्हायचं याचा तक्ता असलेली त्यांची फाइल जूनमध्येच तयार असे. सरांचं वैशिष्टय़ म्हणजे ते वादस्पर्धेतील विषयाच्या दोन्ही बाजूंची तयारी तितक्याच निष्ठेनं आमच्याकडून करवून घ्यायचे. आशय-विषयाची रसाळ मांडणी, भाषणाची शैली याचं जणू ‘प्रोफेशनल स्किल’ ते विद्यार्थ्यांना देत. या गुरू-शिष्य परंपरेत मी अत्यंत विनम्रपणे सामील झालो. महाविद्यालयीन पाच वर्षांत महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठेच्या २० स्पर्धामध्ये १७ वेळा मला प्रथम पारितोषिक मिळालं. माझी किरकोळ देहयष्टी आणि त्याच्या अगदी विरुद्ध असलेलं खणखणीत बोलणं याचा बहुधा स्पर्धामध्ये ‘ड्रॅमॅटिक इफेक्ट’ होत असावा! भाषण ऐकून सहकारी स्पर्धकच जेव्हा अभिनंदन करायचे तेव्हाचा आनंद पारितोषिकांपेक्षाही जास्त असे. महाविद्यालयाच्या देदीप्यमान परंपरेला आणि सरांच्या विश्वासाला सहसा तडा न जाऊ देता जेव्हा आमचा विजयी संघ परतायचा तेव्हा महाविद्यालयाच्या कॉरिडॉरमध्ये सरांच्या वळणदार अक्षरातला अभिनंदनाचा ‘बोर्ड’ आमच्या स्वागताला तयारच असायचा!

ढाल किंवा करंडक मिळाल्यानंतर कुंभोजकर सरांची संयत शाबासकी, प्राचार्याच्या चेहऱ्यावरचं तृप्त समाधान, मित्रांमध्ये झालेली ‘टाइट कॉलर’ या आनंदाचं मोल करणं अशक्य. रानडे, लोकहितवादी, पाणिनी, महावीर अशा गाजलेल्या स्पर्धामध्ये भाषण करण्याची मला संधी मिळाली. मुंबई, पुणे, कोल्हापूरच्या स्पर्धकांमध्ये तेव्हा (आताचा नाटककार) अभिराम भडकमकर, प्रशासकीय सेवेतील भूषण गगराणी, अभ्यासक हरी नरके, पत्रकार चारुहास साटम असायचे. आमच्याच महाविद्यालयातील प्रशांत दळवी, मन्मथ कुंभोजकर, अभय बंगाळे, सरिता कुलकर्णी, राधाकृष्ण मुळी, गोपाळ आवटी, राजेंद्र गोडबोले, शुभांगी संगवई (गोखले), सरिता सुराणा, प्रतीक्षा लोणकर यांनीही स्पर्धा गाजवल्या. इतर महाविद्यालयांमधले झालानी, तोतला, धोंगडे भगिनी, नंदकिशोर पवार, जालन्याचा संजय देशपांडे यांचीही उत्तम भाषणं आठवतात. अंबेजोगाईच्या परांजपे स्पर्धेत जेव्हा १०१ रुपयांचं रोख प्रथम पारितोषिक मिळालं तेव्हा आईनं अविश्वासानं विचारलं होतं, ‘‘खरंच, हे रुपये तुला बक्षीस म्हणूनच मिळालेत नं?’’ पुढे अशाच एका बक्षिसाच्या रकमेमधून माझ्या घरात पहिल्यांदा लोखंडी पलंग विकत घेतल्याचीही आठवण आहे.

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
loksatta kutuhal french computer scientist dr yann andre lecun deep learning and the future of ai zws 70
कुतूहल : यान आंद्रे लकून : डीप लर्निंगचे गॉडफादर
controversy between vice chancellor and student union
कुलगुरू-विद्यार्थी संघटनांमध्ये वादाचे निखारे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला छावणीचे स्वरूप
Indian Institute of Science Education and Research
विज्ञान दिनी विज्ञानप्रेमींना मेजवानी! खुला दिवस, शास्त्रज्ञ संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन

महाविद्यालयाच्या पहिल्याच गॅदिरगला माझी नंदू माधवशी भेट झाली. मी अकरावीला, तर तो थर्ड इयरला. त्यानं महाविद्यालयाबाहेरही नाटकाचा ग्रुप जमवला होता. आपसूकच मी त्या तालमींना जाऊन बसू लागलो. तालमीतच संपूर्ण नाटक पाठ होण्याच्या माझ्या सवयीमुळं मुंबईतल्या स्पर्धेच्या प्रयोगाला मला ‘लाइव्ह प्रॉम्प्टर’ म्हणून नेलं गेलं. ही होती माझी पहिली स्पॉन्सर्ड मुंबई ट्रिप! आणि नाटक होतं- ‘संगीत घराबाहेर!’

एक महत्त्वाचं वळण नंदूमुळेच मिळालं. मी ‘यंग डिबेटर्स असोसिएशन’मध्ये गेलो. आणीबाणीनंतर आणि नामांतर आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर औरंगाबादमध्ये एकत्र आलेल्या तरुण विद्यार्थ्यांचा हा डॅशिंग ग्रुप. त्यावेळच्या धगधगत्या वातावरणात दलित आणि इतर तरुण-तरुणी एकत्र येऊन काम करतायत, हा वेगळा संदेश या ग्रुपनं दिला. स्पर्धेत भाषणं करून केवळ पारितोषिकं मिळवण्यापेक्षा बांधिलकी आणि सामिलकी मानणाऱ्या या ग्रुपमध्ये होते- देवीदास तुळजापूरकर, प्रदीप शहाणे, सुहास जेवळीकर, अनिल डोंगरे, सुरेंद्र जोंधळे, राम दोतोंडे, श्याम देशपांडे, व्यंकटेश केसरी, शैला शिरवाडकर, स्मिता देशपांडे, सुरेश अवचार, जयश्री खारकर आणि सगळ्यात ज्युनिअर असलेले मी आणि सुंदर लटपटे. स्वत:चं मत व्यक्त करताना, प्रतिक्रिया देताना कधीही घाबरायचं नाही, प्रस्थापितांविषयीच्या आदराखाली दबून न जाता त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार गमावायचा नाही, हे बळ या संघटनेनं मला दिलं. हे मित्र मला भेटले नसते तर सामाजिक प्रश्नांच्या ‘दुसऱ्या बाजू’ मला दिसल्याच नसत्या. या मित्रांच्या सहवासामुळेच मी पुरोगामित्वाची संकल्पना मुळापासून समजावून घेऊ शकलो. आजही मी याच परिवर्तनशील, प्रागतिक विचारांचा ठाम पुरस्कर्ता आहे.

वानखेडे व्याख्यानमाला, विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांशी थेट चर्चा, शिबिरं, पथनाटय़ असं इथं बरंच काही घडत होतं. पथनाटय़ांची एक असाधारण अनुभूती मी या काळात घेतली. स्वातंत्र्याची खरी संकल्पना सांगणं, महागाई-भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणं, मतदारांना जागरूक करणं असा या रस्तानाटय़ांचा उद्देश होता. सादर करणारे आम्ही सगळे खरं तर मुळात पांढरपेशे, मध्यमवर्गीय वातावरणातले. त्यामुळे अशा उत्स्फूर्त सादर होणाऱ्या ‘स्ट्रीट प्ले’चा अनुभव रोमांचकारी आणि साहसी होता. किरण देशपांडेच्या ढोलकीच्या ठेक्यावर आम्ही एक कॉर्नर पकडून रस्त्यावर जाणाऱ्या-येणाऱ्यांचं कुतूहल जागं करीत असू. सोबतीला गुरू पवार, जुगुळकर, पठणकर, जालेवार अशी मोठी गँगच होती. औरंगपुऱ्यापासून बेगमपुऱ्यापर्यंत आणि शहागंजपासून पठण गेटपर्यंत पथनाटय़ं सादर करताना ‘स्पॉट’ आणि ‘दिवस’ जाणीवपूर्वक निवडलेले असत.

दिवसा कॉलेज, वादविवाद स्पर्धा, इतर अ‍ॅक्टिव्हिटीज् आणि रात्री दहानंतर ‘मॉडर्न’, ‘पॅराडाईज’ या बसस्टँडसमोरच्या रेस्टॉरंटस्मध्ये गप्पांचे अड्डे.. बॅकग्राऊंडला मेहदी हसन, गुलाम अलींच्या गझलांचे सूर.. उत्तम साऊंड सिस्टीमवरच्या या गझल ऐकणं हे त्याकाळी औरंगाबादमधलं खास आकर्षण! अर्थात जरी गुलाम अली ‘हंगामा है क्यों बरपा.. थोडीसी जो पी ली है’ असं गात असले तरी आमच्या हातात ग्लास मात्र चहाचेच असायचे! अशा कटिंग चहाचे असंख्य राऊंडस् होत होत मग शोभा गुर्टूच्या भारदस्त गायकीनं सकाळी तीन वाजता ही शाळा सुटायची. विद्यापीठातले शिक्षणतज्ज्ञ, साहित्य-कला क्षेत्रातली सगळी नेमाडपंथी-हेमाडपंथी मंडळी या सांस्कृतिक अड्डय़ावर रात्र जागवीत. या सर्व काळात वयानं माझ्यापेक्षा मोठय़ा, जाणकार असलेल्या मित्रांच्याच सहवासात मी जास्त होतो. वाचन, विचार, मांडणी, अभिव्यक्ती यांचं अनौपचारिक शिक्षण घेत होतो. जडणघडणीच्या काळातच अचूक व्यक्तींचं ‘इम्प्रेशन’ किती महत्त्वाचं असतं, हे आज जाणवून या सर्वाविषयी खूप कृतज्ञता दाटून येते. या काळात जगलेल्या प्रत्येक क्षणानं साहित्य, कलेचं आणि जगण्याचं भान समृद्ध केलं, हे नक्की.

गंमत म्हणजे याच काळात हिंदी सिनेमा हाही माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. जवळपास ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’वालाच प्रेक्षक होतो मी. विशेषत: बच्चन-फॅन! सिनेमाचा विषय निघाला की कोणत्या टॉकिजमध्ये तो पाहिला यासकटच तो आठवतो. उदा. ‘शोले’- स्टेट टॉकिज, ‘मुकद्दर का सिकंदर’- मोहन टॉकिज, ‘शान’- अंजली टॉकिज, ‘अर्धसत्य’- अंबा टॉकिज, दादा कोंडकेंचे बरेच चित्रपट- रॉक्सीत. (पुढे याच ‘रॉक्सी’त जेव्हा ‘बिनधास्त’ प्रदर्शित झाला तेव्हाची एक्साइटमेंट काही औरच होती!) औरंगाबाद हे ‘निजाम टेरिटरी’मध्ये येतं, म्हणून खूप वेळा गुरुवारीच (जुम्मेरात) इथं चित्रपट प्रदर्शित होई. ‘धरमवीर’ मी सकाळी आठ वाजता पाहिला होता! एक मात्र निश्चित.. ‘शोले’, ‘दीवार’, ‘काला पत्थर’, ‘त्रिशूल’ ही अमिताभची सगळी सीरिज फॉलो करणारा मी हळूहळू ‘चक्र’, ‘आक्रोश’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?’, ‘स्पर्श’ अशाही चित्रपटांमुळे भारावून जाऊ लागलो होतो. एकीकडे मराठवाडय़ात रेल्वे रुंदीकरणामुळे वाहतुकीचं क्षितीज रुंदावत होतं, तर दुसरीकडे माझ्या अभिरुचीच्या रुळाचे सांधेही असे बदलत होते. गल्लीतली दोस्तांबरोबरची ‘तेरेकु-मेरेकु’ थाटातली हिंदी, वादविवाद स्पर्धेतली स्वच्छ मराठीतली मांडणी, सिनेमांचे डायलॉग्ज आणि गाणी, नाटकाच्या संवादांमधली काव्यात्मकता.. अशी भाषेला ‘लय’ येत होती; तर ‘यंग डिबेटर्स’मध्ये सामाजिक बांधिलकीचा ‘ताल’ आत पक्का भिनत होता. रस्त्यावरच्या लोकांना अचानक थांबवून पथनाटय़ सादर करतानाचा टिपेचा ‘स्वर’ अन् बंदिस्त नाटय़गृहातला, अंधाऱ्या अवकाशातल्या संवादांचा ‘तरल स्वर’ यामधली ‘प्रमाणबद्धता’ उलगडत जात होती. सीनियर्सच्या विचारमांडणीतून समाजभान येत होतं आणि अभ्यासपूर्ण भाषणं, नवनवीन पुस्तकं यामुळे संकल्पना ठाशीव बनत होत्या. हा भारलेला ‘माहौल’ हीच माझ्या अनुभवांची शिदोरी!

१९८० च्या ग्रामीण राज्य नाटय़स्पर्धेत कमलाकर देशमुख लिखित ‘भग्नमूर्ती’ या नाटकात मी काम केलं. त्यात नंदूबरोबर मकरंद मांडे, बळीराम पवार, शुभा खारकर असे अनेक जण होते. ‘भग्नमूर्ती’त मी तीन-चार भूमिका करायचो. अंतिम फेरीत मला चक्क अभिनयाचं बक्षीस मिळालं आणि त्यामुळे एक वेगळा अनुभव मिळाला.. पुण्यातल्या महिन्याभराच्या निवासी नाटय़शिबिराचा! १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट १९८१ हा संपूर्ण महिनाभर महाराष्ट्रातून आलेले वेगवेगळ्या वयोगटाचे आम्ही ५० रंगकर्मी भरत नाटय़मंदिरच्या इमारतीमध्येच राहत होतो. सकाळी सहा ते रात्री बारा असं भरगच्च वेळापत्रक होतं. दिवसभर व्याख्यानं, प्रात्यक्षिकं, संध्याकाळी वेगवेगळ्या नाटय़संस्थांच्या प्रायोगिक एकांकिका. मुंबई-पुण्याच्या व्यावसायिक नाटकांना तर आम्हा शिबिरार्थीना थेट प्रवेश होता. उरलेल्या वेळात भरत नाटय़मंदिरातील स्टेज गॅलरीच्या टॉप अँगलवरून अनेक नाटकांचं नेपथ्य कसं लावलं, बदललं जातं हे पाहता आलं. रात्रंदिवस फक्त नाटकाविषयीच बोलणं, चर्चा! मला स्पष्ट आठवतं, या शिबिराला येण्यापूर्वी मी पहिल्यांदाच अजित दळवींना भेटलो होतो. त्यांना वेगवेगळ्या नाटकांविषयी माहिती विचारली. त्यांनी एलकुंचवार आणि इतर नाटककारांची काही पुस्तकंही वाचायला दिली. मी ती अधाशासारखी वाचून काढली. (पुढे याच दळवी कुटुंबाशी आयुष्यभर नातं जोडलं जाणार आहे हे तेव्हा माझ्या गावीही नव्हतं.)

मुंबई-पुण्याच्या नाटय़क्षेत्रातील लेखन, दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा या क्षेत्रांतले सगळे दिग्गज या महिनाभरात व्याख्यानांसाठी आले. त्यातून नाटय़संकल्पना उलगडत आणि ठळक होत गेल्या. फक्त १८ वर्षे वय असणाऱ्या मला हे सगळंच भारावून टाकणारं होतं. इतर वेळी फक्त रंगमंचावर किंवा पडद्यावर पाहिलेली नटमंडळी इथं प्रत्यक्ष भेटली, त्यांच्याशी बोलता आलं. ‘उंबरठा’चं शूटिंग पाहायला रात्री आम्ही सगळे येरवडय़ाला गेलो होतो. क्लोजअप् आहे की मिड् शॉट? कुठल्या दृश्यानंतर हे येतं? याविषयी स्मिता पाटील डॉ. जब्बार पटेलांना खूप बारकाईनं प्रश्न विचारीत होत्या, हे स्पष्ट आठवतं. नंतर हा चित्रपट प्रत्यक्ष पडद्यावर पाहताना ही शूटिंगची आठवण सतत राहिली. एकूणच पुण्यातला हा ‘अधिक मास’ खूप झपाटलेपण देऊन गेला. कोण जाणे, पूर्णवेळ नाटक हाच अनुभव घेण्याची ‘ऊर्मी’ तिथंच मनात रुजली असणार!

चंद्रकांत कुलकर्णी

chandukul@gmail.com