चंद्रकांत कुलकर्णी

रूढार्थानं ‘नाटक’ या आकृतिबंधात न लिहिलेल्या, पण नाटकाच्या संपूर्ण शक्यता दडलेल्या इतर साहित्यप्रकाराला रंगमंचीय रूप देण्यात दिग्दर्शकासमोर एक आव्हान असतं. वेगवेगळ्या टप्प्यांवर मी या वाटेवरून जाण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करून पाहिलाय. औरंगाबादच्या नाटय़चळवळीत ‘स्मशानातलं सोनं’ (अण्णाभाऊ साठे), ‘अरण्य’ (भारत सासणे), मुंबईला आल्यावर ‘व्यक्ती आणि वल्ली’ (पु. ल. देशपांडे), ‘मौनराग’ (महेश एलकुंचवार), ‘आरण्यक’ (नभोनाटय़- लक्ष्मण लोंढे), ‘खूप लोक आहेत’ (श्याम मनोहर) या कथा, कादंबरी, ललित लेख, व्यक्तिचित्रांना रंगमंचीय रूप देताना एक वेगळाच नाटय़ानुभव मिळाला. असाच अनोखा आनंद मिळाला डॉ. आनंद नाडकर्णी यांचं ‘मुक्तिपत्रे’ पुस्तक ते ‘गेट वेल सून’ या नाटकाच्या प्रवासात!

डॉ. आनंद नाडकर्णी हा एक उत्साहाचा खळाळता झरा. व्यक्ती नव्हे, तर एक मोठ्ठी संस्थाच! जेव्हा जेव्हा या माणसाला मी भेटतो तेव्हा तेव्हा जाणवतं, की याच्याकडून आपण ‘मल्टि-टास्किंग’चं कौशल्य शिकायलाच पाहिजे. बरं, ते सतत वेगवेगळ्या माणसांमध्ये वावरत असतात, त्यांच्याशी बोलत असतात. त्यामुळे बाहेरच्या जगात ‘आत्ता’ माणसं नेमकं कशी वागताहेत याचा ‘लसावि’ त्यांच्याकडून मिळतो. डॉक्टरांची दोन नाटकं मी केली- ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘आम्ही जगतो बेफाम’! ‘वेध’ आणि इतर अनेक उपक्रमांच्या निमित्तानंही माझा त्यांच्याशी सतत संवाद, संपर्क असतो. त्यांचं सगळंच लिखाण मला खूप आवडतं. पण ‘मुक्तिपत्रे’वर माझं विशेष प्रेम! ते वाचताना एवढा गुंतून गेलो होतो, की एकाच वेळी प्रचंड आनंद आणि अस्वस्थता अशा दोन्ही भावना उचंबळून आल्या. व्यसनाधीन तरुण आणि त्याला व्यसनमुक्तीकडे नेणारा त्याचा समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ यांच्यातील अत्यंत उत्कट असा हा पत्रव्यवहार. केवळ व्यसनावर नाही, तर आपल्या जगण्यावरच केलेलं किती सहजसुंदर भाष्य! त्याचं नाटय़रूप व्हावं म्हणून तातडीनं त्याच दिवशी याबाबत प्रशांत दळवीशी बोललो आणि ‘मुक्तिपत्रे’ त्याच्या हवाली केलं. जणू ते वाचून आलेल्या ताणातून मी मुक्त झालो. त्यानं ते वाचलं. माझ्याइतकंच त्यालाही ते भावलं. परंतु माझ्यासारखं नुसतं बोलून त्याचं ‘विरेचन’ झालं नाही. तो त्याच्या खोलवर आत जात राहिला. डॉ. नाडकर्णीची इतर पुस्तकंही त्यानं वाचली. पण घेतलं पुस्तक आणि केलं सरळ नाटय़रूपांतर असं करण्यात त्याला रस नव्हता. तो अस्वस्थ होता.. काहीतरी शोधत होता.

याच दरम्यान मी आणि प्रशांत प्रत्यक्ष ‘मुक्तांगण’मध्ये गेलो. एरवी चित्रपट किंवा मालिकेचं लोकेशन बघायला जाण्यापेक्षा हा एक दिवसाचा अनुभव खूप अंगावर आला. व्यसनाच्या गाळात रुतलेल्यांना स्वत:च बाहेर येण्यासाठी, आत्मभान प्राप्त करून देण्यासाठी ‘मुक्तांगण’ची दैनंदिनी विचारपूर्वक बनवलेली आहे. स्वत:च्या वागण्याविषयी जाहीर कबुली देणं, श्रमातून गर्वहरण होणं, एकमेकांशी ‘शेअर’ करून भावनांचा निचरा करणं अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या ‘रिकव्हरी’चा तो ‘कोर्स’ आहे. ते हॉस्पिटल नाही, तो तुरुंगही नाही, तो आश्रम नाही किंवा ते सुधारगृहही नाही. खरं तर कबुली, प्रायश्चित्त, आत्मशुद्धीनंतर पुन्हा नव्यानं जगण्याचा मंत्र देणारं हे ठिकाण! सुरुवातीला थोडी माहिती देऊन डॉ. नाडकर्णीनी आम्हाला ‘मुक्तांगण’ फिरवून आणण्याची जबाबदारी एका कार्यकर्त्यांवर सोपवली. नंतर त्याच्याशी गप्पा मारताना लक्षात आलं, की हा कार्यकर्तासुद्धा इथेच बरा झालेला.. एक ‘रिकव्हर्ड’ पेशंट! इथे व्यसनांचे प्रकार नानाविध; पण ‘केस हिस्ट्री’ थोडय़ाफार फरकानं तीच! गंमत म्हणजे व्यसनांमध्ये मात्र ‘स्त्री-पुरुष’ समानता! सामाजिक-आर्थिक दर्जा, वय झुगारून व्यसनाच्या पातळीवर सगळेच समान! तिथे इंजिनीअर, डॉक्टर, शिक्षकही होते आणि कमी शिकलेले श्रमजीवीही. स्त्रियांसाठी तर ‘निशिगंध’ नावाचा वेगळा वॉर्डच होता! त्याविषयी डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांच्याबरोबर चर्चा करतानाही खूप तपशील मिळाले. ‘मुक्तांगण’हून परतलो आणि अचानक ‘निशिगंध’च्या धाग्यादोऱ्यातून प्रशांतला ‘नीरा’ ही नवी व्यक्तिरेखा सापडली. जणू त्यातलं नाटकपणच त्याला गवसलं. मग एका नव्या नाटय़रचनेची उभारणी करता करता त्यानं डॉक्टरांच्या आशयाला अर्थपूर्ण नाटय़रूप दिलं. नीराच्या अस्तित्वानं कथानकाची लय, गतीच बदलली आणि नाटकाला नवी मितीही प्राप्त झाली. समुपदेशनाला नाटय़पूर्ण गुंतागुंतीची, रहस्याची जोड मिळाली. व्यसनमुक्तीचा वसा पूर्ण बऱ्या झालेल्या पेशंटनंच पुढे चालवायचा असतो.. अशा एका सकारात्मक जाणिवेच्या पातळीवर ते येऊन पोहोचलं. आता ही नाडकर्णी-दळवी जोडीची नवीच रचना आकाराला आली होती : ‘गेट वेल सून’!

मात्र या नाटय़रचनेत प्रशांतनं दिग्दर्शक, नट, तंत्रज्ञांना कोडय़ात, पेचातच टाकलं होतं. जवळजवळ अर्धा भाग ‘पत्रं’ स्वरूपात आणि त्यांना जोडणारी काही दृश्यं. वाचून अत्यंत सुंदर अनुभव येत होता. पण नाटक उभं करण्यासाठी रंगमंचावरील ‘स्थळ-काळ-कृती’ या त्रिसूत्रीला अनुसरून दिग्दर्शकाला मदत होईल असं लेखकानं यावेळी काहीच दिलं नव्हतं. (सुरुवातीची एक रंगसूचना सोडून!) एकेक पात्र प्रदीर्घ ‘स्वगत कम् संवाद’ बोलतंय. कधी भारतातून, तर कधी अमेरिकेतून. बरं, तेही एकाच वेळी घर, क्लिनिक, उपचार केंद्र, अमेरिकेतला फ्लॅट, कधी हॉटेल, तर कधी एक नवा फ्लॅट, कधी एखादी पार्टी प्लेस.. असं कुठेही! कसा झेपायचा हा सगळा प्रवास? कसं बांधायचं ते एकत्र, एकाच रंगमंचावर? म्हणजे ते नाटक होतं की पत्रांचं अभिवाचन? की चित्रपटाचा स्क्रीन-प्ले? अंदाज येत नव्हता. परंतु ते- ते प्रसंग ‘दृश्य’रूपात दिसत मात्र होते. प्रसंगांमधला उत्कटपणा तर स्पष्टपणे जाणवत होता. खणखणीत आशयाची जोड होती! म्हणजे खरं सांगू का? पाकिटावर फक्त माणसाचं नाव लिहून एखाद्या महानगरात ‘शोधून काढ आता हा पत्ता!’ असं जणू दिग्दर्शकाला दिलेलं ते ‘चॅलेंज’च होतं. आधी हे नाटक प्रशांतच्या तोंडून ऐकलं. मग मनात वाचलं. नंतर ग्रुपसमोर, नटांसमोर, तंत्रज्ञांसमोर मी ते वाचलं. प्रत्येक वेळी सगळ्यांची प्रतिक्रिया हीच- ‘चांगलंय.. पण कठीणेय हे सगळं एकत्र बांधणं!’ मात्र, प्रत्येक वाचनातून मला दरवेळी काही न् काही मिळतच गेलं. पात्रांचा सूर, आवेग जाणवला. दृश्यस्वरूपात काही दिसू लागलं. नाटकाच्या बाबतीत एका प्रमेय-सिद्धतेवर माझा ठाम विश्वास आहे- ‘मूळ नाटय़लेखनातच सादरीकरणाची ‘शैली’ लपलेली असते. आकृतिबंध दडलेला असतो. नाटकाविषयीच्या एका पुस्तकात ‘शैली’ची व्याख्या अशीच सहजतेनं सांगितलीय- ‘Style is a particular manner of expression!’ नाटकात अभिव्यक्तीचं मुख्य साधन होतं- ‘पत्रं’! ते वाचताना लिहिणाऱ्याचा खासगी, विश्वासाचा सूर तुम्हाला त्याच्याच आवाजात ऐकू येत असतो. लिहिणारा अगदी तुमच्या जवळ बसून तुमच्याशी हितगूज करतोय, हे जाणवणारी निकटता त्यात असते. नेमकी हीच नसर्गिक प्रक्रिया मी दिग्दर्शनाची ‘शैली’ म्हणून वापरायचं ठरवलं. मग सगळं कोडं कसं अलगद सुटत गेलं. लिखाणातली गुंतागुंत सोपी होत गेली. आणि मग सगळ्या ‘नाटकीय’ शक्यता वापरून मी हा ‘खेळ’ रंगतदार करत गेलो. लिहिणारा किंवा वाचणारा यांनी ‘एका जागीच बसणं’ हे मी बादच करून टाकलं. नाही तरी वास्तवातले नियम मोडण्याच्या ‘शक्यता’ आणि ‘स्वातंत्र्य’ रंगमंच तुम्हाला देत असतोच. यानिमित्तानं मी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. अमेरिकेतून पत्रं लिहीत किंवा वाचत असलेल्या प्रतीकच्या हालचाली मग सहज-सोप्या झाल्या. अमेरिकेच्या फ्लॅटमधून भारतातल्या डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये येण्यासाठी मग त्याला रंगमंचावरच्या भिंतींचंही बंधन उरलं नाही. एका लेव्हलवरून खाली आला की तो सरळ भारतातल्या डॉक्टरांजवळ जाऊन बोलू लागे. आणि डॉक्टरही क्षणार्धात त्याच्या अमेरिकेतल्या फ्लॅटमध्ये पोहोचून त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला समजावू लागले. या लवचीकतेमुळे रंगमंचावरच्या भिंती पडल्या. बंधनं तोडली गेली. पत्रं, तार, ई-मेल, फोनवरचा मेसेज, फॅक्स हे ज्या ‘गती’नं हल्ली आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात, त्याच वेगानं पात्रंही एकमेकांपर्यंत पोहोचू लागली. ‘फिरत्या’ रंगमंचाचं नेपथ्य वापरण्यापेक्षा मी नटांना फिरतं ठेवून अपेक्षित नाटय़परिणाम साधू शकलो. हालचाली आणि कम्पोझिशन्सच्या या प्रयोगाला विजय केंकरे, गिरीश जोशी, पुरुषोत्तम बेर्डे, रवींद्र लाखे अशा समकालीन दिग्दर्शकांनी मन:पूर्वक दाद दिली. माझ्यासाठी ते खूप मोलाचं होतं.

‘गेट वेल सून’च्या प्रवासात नेहमीप्रमाणे मोलाची साथ लाभली ती प्रदीप मुळ्ये या सर्जनशील नेपथ्यकाराची. बहुस्थळी नेपथ्याच्या त्याच्या ‘ब्रिलियंट आयडिये’मुळं प्रेक्षकांना थेट भारत ते अमेरिका असा मोठ्ठा प्रवास अनुभवता आला. नाटकात असलेली मनोव्यापारांतील गूढता मिलिंद जोशीच्या संगीतानं अधोरेखित केली. माझ्या दिग्दर्शन वाटचालीमध्ये मोलाची आणि महत्त्वाची साथ असणाऱ्या प्रतिमा जोशी- भाग्यश्री जाधव या दोन मत्रिणींनी देखणी वेशभूषा डिझाइन केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नाटकाची व्यावसायिक रंगभूमीवरची अवघड अशी नाटय़निर्मिती केली ती माझ्या दोन समर्थ निर्मात्यांनी- दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर! पकी दिलीप जाधव हे रंगभूमीवरचं एक सीनियर नाव. व्यवस्थापन ते निर्मितीचा मोठा पल्ला पाहिलेला हा अनुभवी आणि धडाडीचा माणूस. त्यांच्या ‘अष्टविनायक’ आणि आमच्या ‘जिगीषा’नं ‘गेट वेल सून’ची मिळून नाटय़निर्मिती केली. तीस वर्षांपूर्वी ‘जिगीषा’च्या बालनाटय़ात काम करणारा आणि ‘डॉक्टर! तुम्हीसुद्धा..’पासून ‘सेलिब्रेशन’पर्यंत व्यवस्थापनाचा अनुभव गाठीशी असलेला श्रीपाद पद्माकर हा या नाटकाच्या निमित्तानं आता निर्माता बनला होता.

जसा ‘चलाख’ गुन्हेगार हा इन्स्पेक्टर आणि वकिलासाठी मोठा पेच असतो, तसाच ‘हुशार’ पेशंट हा डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञासाठी! गुन्ह्य़ाचं आणि रोगाचं अचूक ‘निदान’ करणं जितकं कठीण, तितकंच त्याचं विश्लेषण करून उपचार करणंही अवघड. बरं, ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ असंही करता येणं शक्य नसतं. ‘मुक्तिपत्रे’मधला ‘प्रतीक’ हे पात्र म्हणजे तर आजच्या काळाचंच ठळक ‘प्रतीक’.. एक ‘लव्हेबल रास्कल’! केवळ व्यसनाधीनता हा त्याचा आजार नाही, तर ‘आय अ‍ॅम द बेस्ट’ या आजच्या अहंगंडानं तो पुरता झपाटलाय. ‘मला हे पाहिजे’, ‘माझं हे असंय’, ‘मला हे वाटतं’ असा तो ‘क’(आय) स्पेशालिस्ट आहे. येनकेनप्रकारेन मला पुढे जायचंय, मला सर्वच कळतं- या गर्वाच्या भरात अत्यंत जवळच्या नातेसंबंधांना संपूर्ण झुगारून तो स्वत: मस्त झोके घेत संपूर्ण ‘आत्ममग्न’ झालाय. वेगवेगळ्या रूपांत आणि अंशात हा ‘प्रतीक’ आपल्या सगळ्यांमध्येच दडलाय. मोठा-छोटा पडदा गाजवणाऱ्या आणि लोकप्रियतेच्या उंच लाटेवर असणाऱ्या स्वप्नील जोशीनं हा ‘प्रतीक’ अफलातून रंगवला. या नाटकाच्या निमित्तानं झालेली या अभिनेत्याची रंगमंचावरील एण्ट्री ‘सरप्राइज पॅकेज’ ठरली! तालमींसाठी त्यानं दिलेला वेळ, दाखवलेली शिस्त, बारकाईनं केलेलं भाषेवरचं काम, स्वत:ला दिग्दर्शकावर सोपवण्याची वृत्ती- सगळंच लोभस होतं. माझं म्हणणं, सूचना, दिलेले स्वर तो अक्षरश: टीपकागदासारखा टिपत होता. त्याच्या लोकप्रियतेचा ‘चार्म’ मला खुबीनं ‘प्रतीक’मध्ये पेरता आला. दुसऱ्या अंकातला ‘स्लिप’ झाल्यानंतरचा ‘कन्फेशन’चा प्रसंग म्हणजे त्याच्या अभिनयातल्या समजेचं, तल्लख ग्रहणशक्तीचं प्रात्यक्षिकच! त्याच्या नाटकात असण्यानं ‘तरुणाई’ मोठय़ा संख्येनं ‘गेट वेल सून’कडे आकर्षित झाली! नाटक, टेलि-प्ले असं संदीप मेहतानं यापूर्वीही माझ्याबरोबर काम केलं होतं. दरम्यानच्या काळात तो छोटय़ा पडद्यावर- त्यातही हिंदीत अधिक कार्यरत होता. या नाटकानं तो पुन्हा मराठी प्रेक्षकांसमोर आला. त्याचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि परिपक्व अभिनयामुळं डॉक्टरची व्यक्तिरेखा अत्यंत परिणामकारक झाली! समिधा गुरूचं पाच-सहा वर्षांपूर्वी पाहिलेलं एका एकांकिकेतलं काम मला स्मरत होतं. म्हणूनच तिच्यावर ‘नीरा’ची अवघड कामगिरी सोपवता आली. ‘नीरा’तल्या आडवळणांना ती उत्कटपणे सामोरं गेली. ‘लतिका’च्या भूमिकेसाठी हवा असलेला सच्चा सूर माधवी कुलकर्णीनं तिच्या नसर्गिक अभिनयातून जपला. इतर कलावंतांचीही खूप उत्तम साथ मिळाली.

एकूणच आनंद नाडकर्णीच्या आशयाच्या ऐवजाला प्रशांत दळवीच्या नाटय़रचनेचं निराळं कोंदण मिळालं. वरवर ‘आलबेल’ आणि आत ‘घालमेल’ असा आजचा काळ. अशा वेळी तुमच्या अत्यंत जवळच्या कुणीतरी ‘तुमचं नेमकं काय होतंय’ हे अधिकारानं सांगावं आणि प्रेमानं तुम्हाला ‘गेट वेल सून’ म्हणावं.. हेच तर आज अत्यंत गरजेचं झालंय!

chandukul@gmail.com