02 March 2021

News Flash

तीन कस्तुरबा, दोन हरिलाल आणि एकच गांधी!

‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकानं रंगमंचावरच्या आणि विंगेतल्या आम्हा सर्वानाच एका विशिष्ट अभ्यासपद्धतीकडे नेलं.

(संग्रहित छायाचित्र)

चंद्रकांत कुलकर्णी

‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकानं रंगमंचावरच्या आणि विंगेतल्या आम्हा सर्वानाच एका विशिष्ट अभ्यासपद्धतीकडे नेलं. या नाटकाच्या रचनेचा आवाका मोठा होता. दक्षिण आफ्रिका, मुंबई, अहमदाबाद, साबरमती, कोलकाता, आगाखान पॅलेस अशा जवळपास २५ ‘ठिकाणी’ या नाटकातील दृश्यं घडत होती आणि सुमारे ३५ वर्षांचा कालावधी कथानकातील घटनाक्रमातून पुढे सरकत होता. उपलब्ध छायाचित्रं, इतर कागदोपत्री पुरावे, पत्रं यासाठी संशोधनाच्या अंगानंच सर्व विभागांना विचार करणं भाग होतं. जणू तुकडय़ा-तुकडय़ांनी जोडून तयार होणाऱ्या निश्चित ‘आकृती’चं रूप या तीन अंकी नाटकाला प्राप्त होत गेलं. शिवाय, या रचनेला ‘हरिलाल’चा आयुष्यक्रम, त्याची बाजू, वेळोवेळी त्याचं प्रतिक्रियात्मक वागणं हे परिमाण होतंच. हे फक्त गांधीजींचं चरित्र कथानक नव्हतं, तर इतिहासातल्या काही अंधाऱ्या कोपऱ्यांवरही इथे ‘प्रकाशझोत’ पडणार होता. बापूंची जगण्याविषयीची, देशसेवेविषयीची निश्चित, ठाम भूमिका आणि आपल्यावर अन्याय होतोय ही हरिलालची पक्की भावना, असा हा वेगळ्या पातळीवरचा संघर्ष होता. अगदी गांधीजींना चार मुलं होती हेही त्या वेळी अनेकांना माहीत नसायचं. आयुष्यात किती प्रसंगांमध्ये बापू वैयक्तिक आव्हानांना कसे सामोरे गेले, हरिलालची सतत फरफट कशी होत गेली, कस्तुरबांची आई म्हणून झालेली कुतरओढ असे ज्ञात नसणारे अनेक क्षण या संहितेमध्ये दडले होते. म्हणूनच या सगळ्यांना नाटय़रूप देताना इतिहासातल्या कोणत्याही घटनेचं चुकीचं चित्र रेखाटलं जाऊ नये याची विशेष दक्षता नाटककार अजित दळवींनी काटेकोरपणे घेतली. रंगमंचावर तो काळ उभारतानाही अचुकता जपली जाणं गरजेचं होतं. शिस्तबद्ध टीमवर्कमुळेच हे सगळं शक्य झालं. यात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला या नाटकानं वैचारिक भान दिलं, रंगमंचीय शक्यतांची जाणीव करून दिली. एकुणातच अनुभवाची समृद्धी दिली.

जेव्हा जेव्हा ‘गांधी विरुद्ध गांधी’ नाटकाचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा त्यातील अतुल कुलकर्णीनं साकारलेल्या ‘गांधी’ या व्यक्तिरेखेचा विषय अपरिहार्यपणे निघतोच आणि निघणारच! त्यानं बारकाईनं केलेला संहितेचा अभ्यास, त्यासाठीचं पूरक वाचन, तालमीच्या प्रक्रियेतली त्याची पूर्ण एकाग्रता, भूमिकेच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याची आस, त्यासाठी त्यानं अहोरात्र घेतलेले परिश्रम हे सगळंच अत्यंत विलोभनीय होतं. अक्षरश: काया-वाचा-मनानं तो जणू गांधीजींच्या अंतरंगात शिरू पाहात होता. त्याला त्या भूमिकेची अचूक लय आणि ताल तालमीत गवसत गेली. तो-तो शब्द, वाक्य, संवाद उच्चारताना ‘बापू’ नेमका काय विचार करत असतील, या अंत:प्रेरणेपर्यंत पोहोचण्याचा आम्हा दोघांचा प्रयत्न होता. या व्यक्तिरेखेचं ‘माहात्म्य’ ओळखून त्यांच्या आचार-विचारांतील समतोल साकारताना त्यानं त्यांची प्रत्येक हालचाल, कृती, त्यांचं उठणं-बसणं, बोलणं-चालणं, लिहिणं आत्मसात केलं. गांधीजींच्या चरखा चालवण्यात एक एकाग्रता, शांतपणे विचार करण्याची पद्धत सामावलेली दिसते. अनेक महत्त्वाच्या चर्चा त्यांनी सूत कातताना केल्या. अतुल चरखा चालवणं शिकला, त्याचा त्यानं रीतसर सराव केला. या भूमिकेचा शांत, निश्चयी ‘सूर’ त्याला ‘सूत’ काततानाच सापडला असावा! भूमिकेसाठीची एखाद्या नटाची पूर्वतयारी, त्यातलं त्याचं समर्पण, सहजता, सातत्य यासाठी नट आणि दिग्दर्शकासाठीचा हा एक आदर्श वस्तुपाठच ठरावा. अतुल कुलकर्णी ते ‘बापू’ हा त्याचा ‘कायापालट’ अचंबित करून टाकणारा होता. या आधीचं सर्व प्रशिक्षण, अनुभव आणि कौशल्य अतुलनं गांधींच्या भूमिकेसाठी पणाला लावलं. या नाटकाच्या तालमीत संवाद, भाषा,  हालचाल, कृती, विरामांविषयी आम्ही खूप तपशिलांत चर्चा केल्या, आग्रही राहिलो. अनेक दिवस बठं वाचन, भाषेवर खूप काळ काम, दृश्यांची पुन:पुन्हा मांडणी करून पाहाणं अशा अत्यंत दमवणाऱ्या त्या तालमी होत्या. प्रत्यक्ष प्रयोगात मात्र त्याचं परिपूर्ण, काठोकाठ समाधान नट आणि दिग्दर्शक म्हणून आम्हा सगळ्यांनाच मिळालं. प्रेक्षक, समीक्षक, अभ्यासक, जाणकार, नाटय़क्षेत्रातले सीनियर्स अशा तमाम लोकांनी ‘त्यानं तिन्ही भाषांमध्ये उभा केलेला ‘गांधी’ ‘अतुल’नीय होता’ हे एकमुखानं मान्य केलं. हिंदी, गुजराती भाषेतल्या सादरीकरणातही त्या-त्या भाषेचा लहेजा, लय सांभाळण्यासाठी त्यानं खूप कष्ट घेतले.

किशोर कदम यानं उभा केलेला ‘हरिलाल’ एकदम अस्सल, इंटेन्स होता. वास्तवात परिस्थितीनं तर सतत हरिलालवर अन्याय केलाच; पण संदर्भ, उपलब्ध सामग्रीनंही किशोरवर तेवढाच अन्याय केला. गांधीजींची हजारो छायाचित्रं, पत्रं, वेशभूषा, वस्तू सगळंच जगासमोर ठळकपणे मांडलेलं, तर हरिलालचा मात्र नावाला फोटोही उपलब्ध नाही. किशोर मात्र त्या काळात हरिलालनं झपाटून गेला होता. हरिलालची अस्वस्थता, चीड, त्याचं सरभर होणं, बंडखोरी ही खऱ्या अर्थानं त्यानं स्वत:मध्ये ‘इंजेक्ट’ केली. सर्वसामान्यांसाठी अंधारात असणारी ही व्यक्तिरेखा त्यानं रंगमंचावरच्या ‘प्रकाशा’त उजळून टाकली. बौद्धिक वाद, आरोप-प्रत्यारोपाची तीव्रता, हरिलालचं सतत प्रतिक्रियात्मक वागणं, कस्तुरबांच्या मातृत्वानं त्याचं हळवं होणं, पत्नी गुलाब आणि मुलांच्या भावविश्वात रमणं हे सगळंच किशोरनं खूप समजदारीनं आणि नजाकतीनं सादर केलं. हरिलालच्या मनात साठलेला राग आणि तो व्यक्त करून पुन्हा शून्यावस्थेत येणं हे त्यानं हळुवार उलगडलं. छोटय़ा कांतीबरोबरच्या एका दृश्यात आपणही मुलावर आपली स्वप्नं लादत तर नाही आहोत ना, या भावनेनं होणारी हरिलालची चलबिचल त्यानं फार सुंदरपणे व्यक्त केली. गांधीजींच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर आपल्या जगण्याचा, बंडखोरीचा, संघर्षांचा सगळा पायाच खचून जाण्याची हरिलालची हताश अवस्था आणि त्याचं ‘आता मी कुणाशी भांडू?’ असं कळवळून विचारणं अंगावर येत असे. मराठी आणि हिंदी असं दोन वेळा त्यानं या हरिलालकडून स्वत:ला पछाडून घेतलं. हिंदी भाषेतल्या प्रयोगात तर किशोर अधिकच खुलला, प्रवाही झाला असं जाणवलं. नाटकाचे प्रयोग थांबल्यावर हरिलालला उद्देशून त्यानं लिहिलेली कविता ही अभिनेत्याच्या प्रतिभेला एक वेगळा आयाम देणारी होती.

गुजराती रंगावृत्तीत मनोज जोशी या नटानं हरिलाल साकारला. त्याचं शैलीबद्ध सादरीकरणही मराठीपेक्षा थोडं वेगळं होतं. गुजराती भाषेचा एक वेगळा ‘ऱ्हिदम’ त्याच्या अभिव्यक्तीत होता. या तालमी आणि प्रयोगांमध्ये त्याची खूप भावनिक गुंतवणूक होती. गुजराती रंगभूमीवर त्याची ती भूमिका अनेकार्थानी गाजली, प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली.

प्रथेप्रमाणेच मराठी ‘गांधी’च्या शुभारंभालाच गुजराती रंगभूमीवरील काही मान्यवर अभिनेते, निर्माते मनहर गढिया, राजेंद्र बुटाला आणि इतर मंडळी आवर्जून उपस्थित होती. विशेषत: मनहरभाईंनी तर या नाटकावर प्रचंड प्रेम केलं. पुढे हिंदी भाषेतली निर्मितीही त्यांनी स्वत: केली आणि गुजरातीत नाटक करतानाही राजेंद्रभाईंना आग्रह करून सोबत घेतलं. हिंदीच्या प्राध्यापक आणि स्वत: अभिनेत्री असलेल्या अनुया दळवींनी नाटकाचा हिंदी अनुवाद अभ्यासपूर्वक केला. हिंदी प्रयोगात अतुल, किशोर कायम राहिले, तर मराठीत दिग्दर्शन साहाय्य करणाऱ्या शिल्पा नवलकरनं या वेळी हरिलालच्या पत्नीची- गुलाबची भूमिका साकारली. मनहरभाईंनी हिंदी ‘गांधी’चे प्रयोग दिल्ली, मद्रास, कोलकाता असे राष्ट्रीय पातळीवर सादर केले. हिंदी प्रयोगांच्या व्यवस्थापनात आमचा मित्र श्रीपाद पद्माकरने अत्यंत नियोजनबद्ध अशी जबाबदारी पार पाडली.

मराठी नाटकात तर भक्ती बर्वे स्वत:हून सामील झाल्याची गोष्ट पूर्वीच सांगितलीय. परंतु या नाटकाच्या प्रक्रियेत त्यांच्या प्रेमानं, आश्वासक सहवासानं त्या भक्ती‘ताई’ ऐवजी सगळ्यांच्या ‘आई’च बनल्या. फॉर्ममध्ये असलेल्या नवीन खेळाडूला फलंदाजीची लय सापडल्यावर अनुभवी, जुन्या-जाणत्या खेळाडूनं पिचवर उभं राहून दुसऱ्या बाजूनं सतत प्रोत्साहन द्यावं, तसंच त्यांनी अतुल कुलकर्णी, किशोर कदम या अभिनेत्यांना सतत ऊर्जा दिली, इतरांना मार्गदर्शन केलं. या टीमवर त्यांची माया जडली होती. दौऱ्यावर नाटकाची बस जाताना शिवाजी मंदिरला सगळ्यांना निरोप द्यायला मी गेलो, की त्यांच्या खास उपरोधिक शैलीत त्या चिडवायच्या, ‘‘आम्हाला प्रयोगांना जुंपून आता तुम्ही मस्त उनाड फिरायला मोकळे ना? चला आमच्याबरोबर!’’

भक्ती बर्वे-इनामदार यांच्या मराठीतल्या कस्तुरबानं मनात घर केलंच; पण हिंदीत चक्क जगभरात गाजलेल्या ‘बँडिट क्वीन’ सीमा विश्वासच ‘बा’च्या भूमिकेत होत्या! दोन्ही एकदम टोकाच्या भूमिका! पण सीमाजींनी अत्यंत मन:पूर्वक ‘बा’ उभी केली. एका िहसक भूमिकेमुळे जगाच्या नकाशावर लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री पुन्हा आपली पाटी कोरी करून अिहसक ‘कस्तुरबा’ची भूमिका रेखाटायला आतुर होती. अतुल, किशोर आणि त्या असे तिघेही हिंदीत ‘कम्फर्टेबल’ होतेच; पण या नाटकाच्या भाषेत एक तरलता, निर्मळपणा होता. या काव्यमय हिंदी भाषेवर आम्ही खूप मेहनत घेतली. दक्षिण आफ्रिकेतील काही प्रसंगांत तरुणपणी गांधींवर चिडणारी कस्तुरबा साकारताना मला सतत भीती वाटत असे, की अचानक त्यांच्यातली ‘बँडिट क्वीन’ प्रगट होऊ नये! हिंदी बोलीभाषेतला ‘ऐंऽऽ?’ असा स्वर त्यांच्याकडून नसर्गिकपणे वापरला जाई. तो बोलण्यातून त्यांनी काळजीपूर्वक खोडून टाकला.

गुजराती नाटकात ‘कस्तुरबा’ होत्या- मीनल पटेल! गुजराती रंगभूमीवरच्या जुन्याजाणत्या अभिनेत्री. सरळ, साध्या गुजराती कुटुंबातल्या कस्तुरबांना पुढे आपण ‘गांधी’ या महान व्यक्तीच्या पत्नी म्हणून काय काय आयुष्य जगणार आहोत, याची पूर्वकल्पनाही नसेल. तोच एका साध्या गृहिणीचा भाव मीनलबेन यांनी ही भूमिका करताना उत्तम वापरला. प्रवीण सोळंकी या अत्यंत ज्येष्ठ लेखकानं गुजराती भाषेत अनुवाद केला होता. त्यांनी कस्तुरबांचे संवाद गुजरातीत लिहिताना सहज लयीची भाषा वापरली. विशेषत: आपापल्या नवऱ्यांबाबत बोलताना सासू-सुनांच्या तोंडी त्यांनी गुजराती म्हणींचा चपखल वापर केला होता. त्या संवादांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असे.

या नाटकात एकूण पंधरा ते सतरा पात्रं रंगमंचावर येतात. अशा वेळी प्रमुख व्यक्तिरेखा सोडल्या, तर भूमिकांबाबत तडजोड करावी लागण्याची शक्यता मोठी असते. मात्र असं झालं नाही. मला अत्यंत योग्य आणि गुणी सहकलाकारांची साथ मिळाली. हरिलाल व्यतिरिक्त गांधीजींची इतर तीन छोटी मुलं, पुढे हरिलालचीही छोटी मुलं हे प्रकरणही पात्रयोजनेच्या दृष्टीनं किचकट होतं, पण तिथेही खणखणीत कामं करणाऱ्या भक्ती कुलकर्णी, प्रियरंजन ओझे, अमेय अंबुलकर, रुद्र जोशी या छोटय़ा मंडळींनी तालमीत आणि प्रयोगांत रंगत निर्माण केली (ही नावं लिहिताना आता हसू येतंय, कारण या सगळ्यांनी एव्हाना तिशी पार केलेली आहे!). मनोज जोशीचा मुलगा रुद्र हा तर तेव्हा अत्यंत ‘हायपर’, चुळबुळ्या असा होता. मनोजला भीती होती, की हा रंगमंचावर असाच मनस्वी वागला तर? परंतु पहिल्या तालमीपासूनच त्याच्याशी माझा एक भावबंध निर्माण झाला. इतर महत्त्वाच्या भूमिकांसाठी मला संज्योत वैद्य, किरण माने, बाळकृष्ण िशदे, किशोर प्रभू, सुनीता भोईटे, अनामिका चौधरी, पूर्णिमा पाटील, भाग्यश्री जाधव, सतीश देसाई ही नटमंडळी उपलब्ध झाली. यापकी एकदोघेच सीनियर होते, पण बाकी महाविद्यालयीन एकांकिकांमधून प्रकाशझोतात आलेली तरुण-तडफदार फळीही या नाटकात समरस होऊन गेली. त्यांनी या तालमींकडे एक कार्यशाळा म्हणून पाहिलं. या नाटकाच्या तालमी आणि प्रत्यक्ष प्रयोग करताना आम्हाला नाटकाबाबत खूप काही मिळालं, अशी कृतज्ञता ते आजही व्यक्त करतात.

खरंच, या नाटकानं आम्हा सगळ्यांनाच काहीतरी वेगळं दिलं. या जगावेगळ्या बाप-मुलाच्या संघर्षांतून केवळ नाटय़पूर्ण क्षणच निर्माण झाले नाहीत, तर बापूंना आपण ‘राष्ट्रपिता’ का म्हणतो, याचा अन्वयार्थ उमगला. आयुष्यभर गांधीजींशी भांडणारा हरिलाल एका नितळ जाणिवेनं नाटकाच्या शेवटी त्यांना उद्देशून जे बोलतो तेच खरंतर खूप समर्पक आहे..

‘‘तुमच्या आजूबाजूच्या माणसांपेक्षा तुम्ही किती वेगळे आहात. तुम्ही मोठे यासाठी नाही बापू की जगभरातले लाखो लोक तुम्हाला ‘महात्मा’ मानतात, पण यासाठी आहात की या लाखोंना शरण जाऊन तुम्ही स्वत्व सोडत नाही, शोध सोडत नाही. त्यांनी उभारलेल्या पोस्टरसारखं सपाट, गुळगुळीत आयुष्य स्वीकारत नाही.’’

chandukul@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 12:12 am

Web Title: article on marathi play gandhi virudh gandhi 2
Next Stories
1 रंगमंचीय अवकाशात प्रकाशाची सावली!
2 पोकळी
3 नाटक २४ x ७ : ज्याचा त्याचा..  तरीही सगळ्यांचा प्रश्न!
Just Now!
X