21 February 2019

News Flash

पोकळी

भक्तीताईंचा रंगमंचावरचा ‘वावर’ फक्त पाहत राहावा असा होता. त्यात एखाद्या सम्राज्ञीचा तोरा होता.

(संग्रहित छायाचित्र)

भक्तीताईंचा रंगमंचावरचा ‘वावर’ फक्त पाहत राहावा असा होता. त्यात एखाद्या सम्राज्ञीचा तोरा होता. सहजता होती. लवचीकता होती. एक रुबाब होता. दरारा होता. त्या – त्या भूमिकेतला त्यांचा संचार हा ‘थरारक’ असायचा. एकदा त्यांची रंगमंचावर ‘एन्ट्री’ झाली, की काय बिशाद की तुमची नजर इतर पात्रांवर, हालचालींवर जाईल!

या सदरासाठी नव्या लेखाचा विचार डोक्यात सुरू होता. अचानक ‘१० सप्टेंबर’ या तारखेवर लक्ष गेलं आणि मग बराच वेळ मन तिथंच रेंगाळलं. हा भक्ती बर्वे-इनामदार यांचा जन्मदिन. गेल्या आठवडय़ात त्यांनी वयाची सत्तरी पूर्ण केली असती! गेल्या तेव्हा अवघ्या ५३ वर्षांच्या होत्या त्या. झोपेत होत्या. कारच्या प्रवासात. मागच्या सीटवर शांत झोपल्या होत्या. अत्यंत क्रूर अपघात होता तो. पुण्याहून मुंबईकडे प्रवास करताना तो बोगदा लागतो.. आणि ती अप्रिय आठवण मन उदास करून जाते. डोळे मिटले तरी आजही त्या दिसतात. आणि प्रत्येक वेळी त्या बोगद्याच्या अंधारातून बाहेर पडताना मनात एकच भावना शिल्लक राहते, की खरं तर भक्तीताईंना माहीतच नाही त्या नेमक्या कधी गेल्या ते! (पुढे हाच दुर्दैवी अनुभव आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसेच्या वेळीही आला.) कला, राजकारण, शिक्षण अशा सर्वव्यापी क्षेत्रातली कुणी व्यक्ती आपल्यातून गेली तर ‘पोकळी निर्माण झाली!’ अशी एक सहज, स्वाभाविक प्रतिक्रिया उमटते. वर्षांनुवर्षांच्या या शब्दाच्या वापरानं ही प्रतिमा झिजून गुळगुळीत झाली आहे असंही कधी कधी वाटतं. पण भक्तीताईंबाबत या प्रतिक्रियेचा समग्र अर्थ खोलवर मनात कायमचा ठसलाय. हो.. पोकळीच! एक निर्वात, रिक्त अवकाश- जे त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण, अनन्यसाधारण वेगळेपणामुळे कायम रिकामं रिकामं, आधंअधुरंच राहिलं.

भक्तीताईंची ‘उणीव’ सतत टोचत राहील. त्यांच्या अकाली ‘एक्झिट’चा धक्का बसलाच; पण त्यांनी पुढे किती उत्तमोत्तम भूमिकांनी रंगभूमीला समृद्ध केलं असतं, हा विचार वारंवार मनात येतो. आजही अनेकदा नवं नाटक करताना ही भूमिका भक्तीताई असत्या तर त्यांनी वेगळ्याच पद्धतीनं साकारली असती असं हमखास वाटून जातंच. नाटय़क्षेत्राशी जोडलं गेल्यापासून त्यांनी रंगमंचावर केलेलं प्रत्येक काम मी प्रेक्षक म्हणून आवर्जून पाहिलंच. पण पुढे कधीतरी या आपल्या नाटकात अभिनय करतील अशी सुतराम कल्पनाही तेव्हा डोक्यात नव्हती.

‘रंग माझा वेगळा’, ‘गांधी विरुद्ध गांधी’ ही दोन नाटकं, ‘ओझ्याविना प्रवासी’ हा टेलि-प्ले आणि ‘पिंपळपान’ मालिकेतल्या ‘अंधाराच्या पारंब्या’ या कादंबरी रूपांतरात दिग्दर्शक म्हणून मला भक्तीताईंबरोबर काम करता आलं. दशकभराच्या ओळखीचं रूपांतर हळूहळू एका आदरणीय मत्रीत झालं. खूप स्नेहशील सहवास लाभला मला त्यांचा. रंगमंचावरच्या एका विशिष्ट भूमिकेमधील ‘त्या’, तालमीतली एक प्रतिभासंपन्न ‘अभिनेत्री’ आणि इतर वेळी एक ‘माणूस’ म्हणून भक्तीताईंचं तिहेरी रूप मी अनुभवलं. मुंबईत आल्यापासून आजतागायत मला ‘चंद्रकांत’अशी पूर्ण नावानं हाक मारणाऱ्या दोनच व्यक्ती. एक भक्तीताई आणि दुसरी प्रतिमा कुलकर्णी. जवळपास सगळ्यांशीच बोलताना त्या ‘अहो-जाहो’ म्हणत. त्यात एक आब होता. समोरच्याशी आदरानं बोललं तर आपसूकच तोही त्याच अदबीनं तुमच्याशी बोलतो असाही तो विचार असेल; किंवा पटकन् कुणी सलगीनं एकेरी संबोधनावर येऊ नये अशी धारणाही कदाचित त्यामागे असेल!

मराठी रंगभूमीवर समृद्ध, कसदार अभिनयाची मोठी परंपरा आहे. किंबहुना, काही काही नाटकांची ओळखच त्या नाटकातील मुख्य भूमिका रंगवणाऱ्या अभिनेता/ अभिनेत्रीमुळे निर्माण झालीय. प्रत्येकाची वैशिष्टय़ं वेगळी, पद्धत वेगळी. सगळ्यांचा ‘एक्स’ फॅक्टर निराळा. कुणाचा आवाज, कुणाचं व्यक्तिमत्त्व, कुणाची भाषा, कुणाचा लहेजा, कुणाची लवचीकता, तर कुणाची तीव्रता. पण काहीजणांची अनन्यसाधारण, एकमेवाद्वितीय अशी ‘शैली’ होती.. ज्यात अग्रक्रमानं भक्तीताईंचा आदरपूर्वक उल्लेख सातत्यानं होतो. नाटक वाचल्यापासून त्या भूमिकेचे कंगोरे, तिच्या मानसिकतेचे धागेदोरे तपासण्याची त्यांची म्हणून एक पद्धत होती. लेखकाशी संवाद, दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनाविषयी जागरूक राहून त्याच्याशी सतत चर्चा करणं, वेशभूषा, केशभूषा, प्रॉपर्टी याही अंगांचा बारकाईनं विचार करणं, प्रसंगी विषयाच्या तज्ज्ञांची प्रत्यक्ष भेट घेणं, नाटककारानं कल्पनेत उभी केलेली ती व्यक्तिरेखा, ती भूमिका जिवंत हाडामांसाची कशी बनेल यासाठीचा विचार डोक्यात सुरू ठेवून नाना खटाटोप करणं.. असं झपाटलेपण तालमींदरम्यान त्यांच्यात असे. तालमीव्यतिरिक्तही कधी घरी फोन करून त्या काय विचारतील याचा भरवसा नसे.

भक्तीताईंनी गुरू पार्वतीकुमारांकडून नृत्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यांनी पु. ल. देशपांडे, पं. सत्यदेव दुबे, विजया मेहता ते थेट तरुण पिढीतल्या सगळ्या लेखक-दिग्दर्शकांबरोबर प्रत्यक्ष कामंही केली. अत्यंत उत्तम दर्जाचा अभिनय करणाऱ्या एकसे एक सहकलावंतांचा सहवास त्यांना अनेक नाटकांमधून लाभला. त्यांचं वाचन उत्तम होतं. मित्रसंग्रह मोठा होता. दरवेळी नवी भूमिका करताना अभिनेत्री म्हणून आपण अजून काय नवं शिकू शकतो, याची त्यांना आस होती. त्या व्यक्तिरेखेविषयी त्यांची त्यांची स्वत:ची अशी जुळवणी, रियाज तालमींच्या काळात जणू सुरू असे. अशी सर्व सामुग्री त्या कणाकणानं साठवत असत आणि मग अभिनयाच्या सादरीकरणात त्याचा बारकाईनं, खुबीनं वापर करीत असत.

अभिनेत्री म्हणून त्यांच्याजवळ सर्वात प्रभावी हत्यार, अस्त्र होतं- त्यांचा आवाज! खरं तर प्रत्यक्षात त्यांची शारीरिक चण थोडीशी ठेंगणेपणाकडेच जाणारी.. फार ‘उंच’ या प्रकारात न मोडणारी. शिवाय रंगमंचावरच्या भव्य अवकाशात या उंचीमुळे एक मर्यादा निर्माण होण्याचाही धोका. पण या चाणाक्ष अभिनेत्रीनं आपल्या आवाजाच्या हुकमतीनं त्यावर मात तर केलीच; पण आपली अशी एक स्वतंत्र ‘शैली’ही निर्माण केली. त्यांच्या रंगमंचावरील हालचालींना एक लय.. एक ‘ग्रेस’ होती; ज्यामुळे त्यांच्या उंचीकडे कधीच लक्ष जात नसे. किंबहुना, भूमिका ‘लार्जर दॅन लाइफ’ बनवण्याचं ‘मॅजिक’ त्यांच्याजवळ होतं. हजारो प्रेक्षकांच्या कानात त्यांचा म्हणून असलेला एक विशिष्ट ‘आवाज’ आजही सतत ऐकू येतो. त्यांनी केलेल्या भूमिकांच्या संहिता वाचतानाही तोच तुम्हाला ऐकू येतो.. ही तर त्यांची ‘किमया’!

भक्तीताईंचा रंगमंचावरचा ‘वावर’ हा फक्त पाहत राहावा असा होता. त्यात एखाद्या सम्राज्ञीचा तोरा होता. सहजता होती. लवचीकता होती. एक रुबाब होता. एक दरारा होता. त्या- त्या भूमिकेतला त्यांचा संचार हा ‘थरारक’ असायचा. एकदा त्यांची रंगमंचावर ‘एन्ट्री’ झाली, की काय बिशाद की तुमची नजर इतर पात्रांवर, हालचालींवर जाईल! एक प्रकारची ‘खिळवून’ टाकण्याची, संमोहित करण्याची शक्ती त्यांच्या अभिनयात होती. त्यांना रंगमंचावरील हालचाली, कृती, व्हॉइस प्रोजेक्शन याविषयी अचूक अंदाज होता. अनुभवागणिक त्यांनी त्यावर प्रभुत्व मिळवलं होतं. त्यांची ‘फुलराणी’तली ‘मंजुळा’, ‘रातराणी’तली ‘अ‍ॅना’, ‘नागमंडल’मधली ‘म्हातारी’, ‘किमयागार’मधली झपाटलेली शिक्षिका, ‘डबलगेम’मधली रहस्यपूर्ण ‘ती’, हजारो प्रयोगसंख्या झालेल्या ‘आई रिटायर होतेय’मधली ‘आई’ या आणि अशा अनेक जिवंत व्यक्तिरेखा कायम स्मरणात राहतील. तसंच ‘अखेरचा सवाल’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘हँड्स अप्’ अशी अनेक नाटकं न पाहू शकल्याची खंतही माझ्या मनात आहे.

‘रंग माझा वेगळा’ नाटकाच्या वेळी आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं. पण त्यांचा खरा सहवास, ओळख, मत्री मी अनुभवली ती ‘गांधी विरुद्ध गांधी’ करताना. मोठा रंजक किस्सा आहे तो. मी नाटकाचं वाचन, कास्टिंग अशी जुळवाजुळव करत होतो. अतुल कुलकर्णी, किशोर कदम यांची नावं एव्हाना पक्की ठरली होती. आणि एके दिवशी माझ्या घरचा फोन खणखणला.. ‘‘हॅलो, मी भक्ती बोलतेय.’’ मी उडालोच. फोनवरचा पुढचा संवाद साधारण अशा धाटणीचा होता-

‘‘चंद्रकांतऽऽ तुम्ही ‘गांधी विरुद्ध गांधी’ नाटक करताय ना?’’

‘‘हो भक्तीताई..’’

‘‘मला ऐकायला आवडेल.’’

‘‘जरूर. पण खरं सांगू का? ते नाटक प्रामुख्यानं गांधीजी आणि त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांच्या मानसिक संघर्षांचं आहे.’’

‘‘बरं.. मग?’’

‘‘मांडणीतही नाटककारानं दोघांच्याच संघर्षांवर भर दिलेला आहे. म्हणजे यातली कस्तुरबाची भूमिका तशी खूप मोठी नाहीए भक्तीताई..’’

‘‘तुम्हाला कुणी सांगितलं- मी भूमिकेची लांबी पाहून ती स्वीकारते? (मोठा विराम!) मला वाचून दाखवाल?’’

‘‘असं का म्हणताय भक्तीताई? नक्की येतो. मला तुम्हाला नाटक वाचून दाखवून तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल!’’

‘‘मग या. मी वाट पाहते.’’

दुसऱ्याच दिवशी मी ग्रँट रोडला त्यांच्या ‘मॉडेल हाऊस’च्या घरात दोन सोफ्यांच्या मधे जमिनीवर बसून त्यांना नाटक वाचून दाखवत होतो. आणि त्या अतिशय एकाग्रतेनं, तल्लीन होऊन ते ऐकत होत्या. नाटक संपलं आणि मी बघितलं तर त्या पूर्ण गलबलून गेल्या होत्या. नाटक आणि ‘कस्तुरबा’ त्यांच्या आत घुसली होती. नाटक ऐकतानाच त्यांच्या मनाचा काहीतरी निर्णय झाला होता. मला एवढंच म्हाणाल्या, ‘‘आत्ता  इथूनच सुधीर भटांना फोन करा आणि कळवा- मी यात काम करतेय!’’ जणू त्यांना नंतर सावकाशीनं विचार करून आपला निश्चय बदलायचाही नव्हता. पुढे स्क्रिप्टवर त्या भरभरून बोलल्या. खरं तर त्याक्षणीच त्या भूमिकेच्या तयारीला लागल्या होत्या. आणि नंतर त्यांनी खरोखरच या कमी लांबीच्या भूमिकेला एक अर्थपूर्ण ‘खोली’ प्राप्त करून दिली, हा इतिहास आहे. त्यांच्या असण्यानं नाटकाला एक मिती मिळाली, वजन निर्माण झालं. तालमींमध्ये त्या खूप समरस झाल्या होत्या. या नाटकात व्यावसायिक रंगभूमीवर त्यांच्यासमोर तेव्हा सगळे नवीन कलाकार होते. पण त्यांनी पुढाकार घेऊन या टीमशी एक स्पेशल नातं निर्माण केलं. अनेक दिवस आम्ही बसूनच हे नाटक वाचत होतो. संहिता सखोल समजावून घेत होतो. इतिहासातले संदर्भ पाहत होतो. उपलब्ध फोटो, पत्रं चाळत होतो. या नाटकाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा तो प्रयत्न होता. पण तालमींमध्येही ‘फक्त माझा प्रवेश, माझा सीन आधी वाचू या, बसवू या, मग मी जाते..’ असं चुकूनही त्या कधी म्हणाल्या नाहीत. इतर नाटकांपेक्षा जवळपास दुप्पट वेळ आम्ही या नाटकाच्या प्रक्रियेला दिला. इतर पात्रांची दृश्यं बसवतानाही त्या पूर्णवेळ आवर्जून उपस्थित होत्या, हे ठळकपणे आठवतंय. आपल्या अभिनयाच्या, अनुभवाच्या ‘टिप्स’ त्या सगळ्यांना देत. पुढे गावोगावी प्रयोग करताना त्या सगळ्या टीमसोबत कायम राहणं, त्यांच्याबरोबर सिनेमाला जाणं, कालच्या प्रयोगात काय चांगलं झालं? काय राहिलं? याविषयी सविस्तर चर्चा करणं, या टीमची पिकनिक लोणावळ्याला  मत्रिणीच्या रिसॉर्टवर आयोजित करणं- हे सगळं विलोभनीय होतं. ‘गांधी विरुद्ध गांधी’मधला प्रत्येक कलाकार तो समृद्ध आठवणींचा साठा आयुष्यभर स्वत:जवळ जपून ठेवेल.

‘राष्ट्रपिता’ असणाऱ्या आपल्या नवऱ्याला ‘पित्या’च्या नात्याकडे दुर्लक्ष करू नका, असं ठामपणे सांगणारी त्यांची कस्तुरबा कुणीच विसरू शकत नाही. आईचं ‘प्रेम’ आणि बायकोचं ‘कर्तव्य’ यातली दोलायमानता त्यांनी फार नजाकतीनं साकारली. ‘‘आपल्या दोघांचेही नवरे असे टोकाच्या स्वभावांचे; पण तुझं-माझं नातं पक्कं ठेव!’’ असं आपल्या सुनेशी- गुलाबशी होणाऱ्या ‘हितगुजा’तला त्यांचा स्वर खूप स्निग्ध आणि हळवा असायचा. हरिलालला उद्देशून पत्राचं डिक्टेशन महादेवभाईंना देता देता अचानक तो समोर उभाच आहे असं वाटून ‘‘तू का करतोस रे असं?’’ असा त्यांचा गदगदलेला उद्गार जेव्हा बाहेर पडे तेव्हा प्रेक्षक आणि रंगमंचावरचे सहकलाकार अक्षरश: गलबलून जात! एक मोठ्ठा आवंढा गिळत डोळ्यात टचकन् आलेलं पाणी आवरणं सगळ्यांना अशक्य होई! हरिलालसारख्या भरकटलेल्या अनेकांच्या मातांचा कळवळाच जणू त्यांच्या तोंडून बाहेर पडत असे.

कार, ट्रेन, विमानातून बराच प्रवास घडला  भक्तीताईंबरोबर माझा. खूप गप्पा, गॉसिप, त्यांच्या खास तिरकस शैलीतल्या प्रश्नोत्तरातून झालेला संवाद.. सगळंच मोहक! शफीभाई इनामदार, भक्तीताई आणि मी असं त्रिकूटही एका प्रकल्पाच्या काळात जमलं होतं. दोघंही माझ्यामार्फत एकमेकांना टोमणे मारायचे- त्याची मजा काही औरच. नाटक-चित्रपटांबाबत तिघांच्या खूप गप्पा होत असत. अनेक ठिकाणी त्या दोघांबरोबर जेवायला गेल्याचे प्लॅन्स आठवतात. शफीभाईंचं निधन झालं त्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत मी भक्तीताईंबरोबर होतो. पण पाच वर्षांनंतर त्याही मागे थांबणार नाहीत, हे कुठं तेव्हा माहीत होतं? भक्तीताईंचं घर ते शिवाजी मंदिपर्यंतच्या त्यांच्या अखेरच्या प्रवासात त्या दिवशी अ‍ॅम्ब्युलन्समध्ये मी आणि अतुल कुलकर्णी सुन्न, बधिर अवस्थेत बसून होतो. एकदाही आम्ही एकमेकांकडे पाहिलं नाही..

chandukul@gmail.com

First Published on September 16, 2018 12:04 am

Web Title: article on natak 24 x seven 2