चंद्रकांत कुलकर्णी chandukul@gmail.com

‘सुयोग’ निर्मित ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि ‘चंद्रलेखा’ निर्मित ‘वाऱ्यावरची वरात’ व ‘बटाटय़ाची चाळ’ ही नाटकं दिग्दर्शित करताना पु. ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची ‘जादू’ मला तीन वेळा अनुभवता आली. वीस वर्षांनंतर अमेय खोपकर आणि महेश मांजरेकरांच्या पाठिंब्यानं संपूर्ण नव्या नटसंचातल्या पुनरुज्जीवित प्रयोगालाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पुलंच्या चिरंतन लोकप्रियतेची प्रचीती पुन्हा एकदा आली. हा सगळा प्रवास आनंददायी होताच; पण पहिल्यांदा ‘व्यक्ती आणि वल्ली’ या साहित्यकृतीचं नाटय़रूपांतर होण्याची प्रक्रिया अत्यंत नाटय़पूर्ण होती!

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
What Amit Shah Said About Uddhav Thackeray?
“उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून…”; अमित शाह यांचा गंभीर आरोप

येतं २०१९ हे वर्ष ‘भाईं’चं जन्मशताब्दी वर्ष! १९९४ या अमृतमहोत्सवी वर्षांत त्यांच्या नाटकांचा महोत्सव आयोजित करण्यासाठी एक समिती नेमली गेली. चार-पाच दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या नाटय़संस्थांतर्फे या नाटकांची नव्यानं निर्मिती करावी आणि त्याचे महाराष्ट्रभर प्रयोग व्हावेत असा हेतू होता. मला आठवतं, मीटिंगसाठी मी ‘शिवाजी मंदिर’समोरील इमारतीत ‘मेलडी मेकर्स’च्या कार्यालयात गेलो होतो. तिथे डॉ. रवि बापट, विनय आपटे, विजय देसाई आणि समितीचे इतर सदस्य होते. दिग्दर्शकांपैकी कोण कुठली नाटकं करणार, यासंबंधी बोलताना मी म्हणालो की, ‘‘या महोत्सवात पुलंचं आधीचंच एखादं नाटक सादर करण्यापेक्षा त्यांच्या एखाद्या साहित्यकृतीचं नाटय़रूपांतर करायला मला जास्त आवडेल.’’ समितीनं लगेच प्रतिप्रश्न केला, ‘‘कुठली निवडशील?’’ मी उत्स्फूर्तपणे म्हणालो, ‘‘व्यक्ती आणि वल्ली.’’

खरं तर त्या क्षणी खोलात जाऊन त्यावर विचार केला नव्हता; पण तसं का वाटलं असावं, यालाही पाश्र्वभूमी आहे. ‘व्यक्ती आणि वल्ली’ वाचताना आपल्याला ते पुलंच्याच खास शैलीत ‘ऐकू’ येतं. नर्मविनोदी भाषेतलं प्रवाही निवेदन, व्यक्तिरेखेविषयीचं वर्णन आणि पुलंचं मार्मिक भाष्य, त्या- त्या ‘वल्लीं’ची वेशभूषा, बोलण्या-चालण्याची लकब पुलं इतकी तंतोतंत, हुबेहूब सांगतात, की ती ‘व्यक्ती’ आपल्याला चक्क दिसू लागते! व्यंकटेश माडगूळकरांचं लिखाण वाचताना ते जसं तुम्हाला त्या वातावरणात नेऊन सोडतात, तसं पुलं तुम्हाला थेट त्या माणसासमोर नेऊनच बसवतात. शिवाय त्या निरागस व्यक्तिरेखेबरोबर तुमचा प्रत्यक्ष संवाद घडवताना तुम्हाला स्वत:च्या ‘मिश्कील’ स्वभावाचं हत्यारही सुपूर्द करतात. ही व्यक्तिचित्रं वाचताना ती जणू रंगमंचाच्या विंगेत पात्रं म्हणून उभी आहेत असं वाटत राहतं. बस्स! त्यावेळी हे एवढंच आणि इतकंच डोक्यात होतं माझ्या.

तोपर्यंत आलेली माझी ‘चारचौघी’, ‘डॉक्टर! तुम्हीसुद्धा..’ ही नाटकं भाई आणि सुनीताबाईंनी प्रत्यक्ष पाहून शाबासकीही दिली होती. बहुधा त्या दोघांच्या डोक्यात मी दुसरंच एक नाटक करावं असं होतं, हे नंतर मला समजलं. डॉ. बापटांकडून माझी कल्पना ऐकल्यावर भाई आणि सुनीताबाईंनी मला प्रत्यक्ष चच्रेसाठी पुण्याला बोलावलं. भेटण्यापूर्वी मी पुन्हा पुस्तक वाचून काही टिपणं काढली. एव्हाना निर्माते सुधीर भट ‘सुयोग’तर्फे हे नाटक करायला अधीर झाले होते!

आमच्या भेटीचा किस्सा जर भाईंनी स्वत:च नंतर कधी लिहिला असता तर मार्मिक विनोदाचा नमुना म्हणून तो लोकप्रिय झाला असता. नाटय़सृष्टीतल्या आम्हा सर्वाचीच अशी पक्की भावना आहे, की सुधीर भट जर पुलंना आधीच भेटले असते तर पुस्तकात याही भन्नाट ‘वल्ली’ची भर हमखास पडली असती! पुणे ट्रिपचं काटेकोर नियोजन सुधीर आणि गोपाळ अलगेरीनं केलं होतं. आदल्या दिवशीच भटांच्या फियाटमधून आम्ही रात्री पुण्याच्या ‘पर्ल’ हॉटेलला मुक्कामी पोहोचलो. तिथे स्वत: बनवलेली खिचडी सुधीरनं आम्हाला खाऊ घातली. एखादा छोटासा ‘मोर्चा’च घरावर चालून आला की काय, असं भाई आणि सुनीताबाईंना वाटावं इतकं मोठं शिष्टमंडळ या ‘चच्रेला’ हजर होतं! कोण नव्हतं त्यात? सुधीर, गोपाळ, अशोक मुळ्ये, प्रशांत दामले, मी, हंपी आणि आणखी एक-दोघे. ही नाटय़रूपांतराची संकल्पना त्यांना रुचेल का, या तणावात मी; तर या नाटकाच्या शतकमहोत्सवी समारंभात काय काय करता येईल, इथपर्यंतचा सुधीरचा प्लॅन रेडी! भाईंनी एकदा पूर्ण संकल्पना ऐकून आपल्याला ‘ग्रीन सिग्नल’ दिला की मगच पुढचं सगळं बोलू, अशी विनंती मी भटांना केली. ती मात्र त्यांनी सुरुवातीला मान्य केली. चच्रेसाठी एवढी माणसं आल्याचं पाहून सुनीताबाईंनी दिलेलं ‘एक्स्प्रेशन’ मला अजूनही स्मरतंय. भाई आले. आम्ही सगळे बसलो. आणि सुनीताबाई म्हणाल्या, ‘‘चहा चालेल नं?’’ त्यावर क्षणाचीही उसंत न घेता सुधीर भट म्हणाले, ‘‘हो, हो. आणि बरोबर चकली वगैरेही चालेल!’’ आम्हा सगळ्यांच्या पोटात गोळा आणि देशपांडे दाम्पत्याच्या चेहऱ्यावर मिश्कील हसू!

मी संकल्पना सविस्तर मांडली. पुस्तकातील केवळ दहा-अकराच व्यक्तिरेखा निवडून आणि सूत्रधाराचा दुवा निर्माण करून हे रीतसर नाटय़रूपांतर करावं लागेल. कारण नंदा प्रधान, पेस्तनकाकांसारख्या वल्ली रंगमंचावर साकारताना मर्यादा येईल असं वाटत होतं, तर काही व्यक्तिचित्रांच्या बाबतीत पुनरुक्तीची शक्यता होती. शिवाय सादरीकरणासाठी अडीच-तीन तासांच्या कालमर्यादेचं भान राखणंही आवश्यक होतंच. पण नाटय़रूपांतर कोण करणार, हा कळीचा प्रश्न भाईंच्या मनात होता. आम्ही सगळे एकमुखानं म्हणालो- ‘‘रत्नाकर मतकरी!’’ कारण ते दोन्ही पिढय़ांमधले अचूक ‘सुवर्णमध्य’ आहेत. स्वत: कथा, कादंबरीकार, नाटककार आहेत. नाटय़तंत्र आणि आकृतिबंधाच्या त्यांच्या अनुभवाचा रूपांतरासाठी अचूक आणि चांगला उपयोग होईल. त्या दोघांनाही हा विचार शंभर टक्केपटला.

चहा-कडबोळीच्या पाहुणचारात हळूहळू वातावरण खुललं. गप्पा रंगल्या. पुलंच्या मार्मिक विनोदांनी हशे उसळले. आणि मग इतका वेळ शांत बसलेले सुधीर भट कधी आपली जागा बदलून भाईंजवळ जाऊन बसले, हे आमच्या लक्षातही आलं नाही. बोलता बोलता ‘‘खरं तर तुम्ही स्वत:च या नाटकात काम केलं तर एकदम बेश्ट होईल!’’ असं जेव्हा भट भाईंना म्हणाले तेव्हा मात्र काही काळ एकदम ‘कर्फ्यू’ लागल्यासारखी शांतता पसरली. अर्थातच सुधीरची निखालस निरागसता आणि प्रचंड उत्साही स्वभाव माहीत असल्यामुळे कुणाचाही गैरसमज होत नसे. त्याच्या बेधडकपणातही एक गोडवा दडलेला असायचा.

मतकरींबरोबर दिग्दर्शक म्हणून माझी चर्चा झाली. भाईही त्यांच्याशी फोनवर विस्तारानं बोलले. अल्पावधीतच रत्नाकर मतकरींनी नाटय़रूपांतराची उत्तम संहिता लिहून दिली. पुलंच्या मूळ बाजाला अजिबात धक्का न लागू देता, उलट रंगमंचावर सादरीकरणासाठीचं एक खेळकर रूपडं असलेली रचना त्यांनी स्वीकारली होती. त्यांनी नव्यानं लिहिलेली सुरुवात, मध्य, शेवट किंवा दोन प्रवेशांना जोडणारं निवेदन पुलंच्या लेखनशैलीइतकंच रसाळ आणि प्रवाही होतं. किंबहुना, हे पुलंनीच लिहिलंय असं वाटण्याइतपत ते मूळ शैलीशी तादात्म्य पावलं होतं. इतर पूरक पात्ररचना, स्थळ-काळाचं भानही त्यांनी कुशलतेनं राखलं होतं. सूत्रधार, निवेदक, लेखकाचा प्रतिनिधी असं संमिश्र रूप असलेल्या ‘भाऊ’ या प्रमुख भूमिकेसाठी अतुल परचुरे हे एकच नाव सुरुवातीपासून मनात पक्कं होतं आणि अतुलनं ही भूमिका शंभर टक्के अस्सलपणानं केली. उत्कृष्ट वाचिक अभिनय, भाषेची, विनोदाची प्रगल्भ समज आणि पुलंच्या साहित्यावरचं निस्सीम प्रेम यांचा जणू तो सुंदर मिलाफच! नाटकवाल्यांच्या परिभाषेत सांगायचं तर अतुलला या भूमिकेचा ‘भाऊ’ सापडला होता! संपूर्ण नाटक त्यानं पुलंच्याच ‘खेळिया’ वृत्तीनं अंगावर पेललं, खेळवलं. अतुल आणि दिग्दर्शन साहाय्य करणारा आशुतोष भालेराव हे या प्रक्रियेत पूर्ण वेळ शरीर-मनानं माझ्यासोबत होते. दोघांनाही ‘व्यक्ती आणि वल्ली’ मागून-पुढून मुखोद्गत! पुलंच्या वाक्यावाक्यांमध्ये, शब्दप्रयोगांमध्ये दडलेला मार्मिक विनोद त्यांना ज्ञात होता. संहितेतील जातिवंत विनोदांचे सुरुंग, टायिमगच्या जागा, उपहासाचा अर्थ त्यांना माहीत होता. दोघांचीही मला नाटय़उभारणीत मोलाची मदत झाली. या नाटकाची निर्मितीमूल्यं ‘सुयोग’च्या परंपरेला साजेशी होती. अवाढव्य पसारा उभा करताना सुधीर भट, गोपाळ अलगेरी यांनी कशाचीही उणीव भासू दिली नाही.

रंगमंचाच्या मध्यभागी असणारी ‘भाऊ’ची बठकीची खोली हे एकच ‘स्थळ’ नेपथ्यात कायमस्वरूपी ठेवून मी इतर सर्व उंचसखल भागांचा वापर प्रसंगानुरूप लवचीकरीत्या हाताळायचं ठरवलं. या मुक्तशैलीसाठी नितीन नेरुरकरनं सुंदर नेपथ्यरचना केली होती; ज्यात सूचक प्रॉपर्टी आणि मोजक्या वस्तूंच्या मदतीनं क्षणार्धात मुंबई, पुणे, कोकण असा अप्रतिम माहौल उभा होत असे. रंगमंचावरील वावरासाठी ‘सूत्रधार’ असलेल्या भाऊला फक्त हालचालीचे कोणतेही निर्बंध, नियम नव्हते. नेपथ्यातली कोणतीही ‘भिंत’ तोडण्याची मुभा त्याला होती. वर्तमानातून भूतकाळात जाताना आणि प्रवेशानुरूप स्थळ-काळ बदलताना अशोक पत्कींच्या पाश्र्वसंगीताचा तसंच प्रकाशयोजनेचा वापर परिणामकारकतेनं करता आला. लग्नघरातली धांदल, पाठमोरी बसणारी जेवणाची पंगत, रंगमंचावर प्रत्यक्ष सायकल वापरणं, सत्कार समारंभ, हरितात्यांची छत्रीविक्री आणि बालगोपाळांना रंगवून गोष्टी सांगणं अशी अनेक उत्तम दृश्यचित्रं दिग्दर्शक म्हणून निर्माण करता आली. समूहरचनेसाठी रंगमंचाचा कोपरा न् कोपरा पिंजून काढता आला. पुलं म्हटलं की आपसूक ऐकू येणारी हार्मोनियम, मफलर, कुर्ता, चष्मा घातलेला त्यांचा प्रसन्न चेहरा हे सगळं समोर दिसल्यामुळे प्रेक्षक अक्षरश: खुलून जात असत. पडदा उघडल्यापासून नाटक संपेपर्यंत वाक्यावाक्याला दाद, हशा, टाळ्यांनी ‘हाऊसफुल्ल’ वातावरण दणाणून जाई.

अकरा व्यक्तिरेखांसाठीची पात्रयोजना हे अत्यंत अवघड काम होतं. कारण लाखो वाचकांच्या मनात त्यांचा त्यांचा म्हणून एक ‘अंतू बर्वा’, ‘चितळे मास्तर’, ‘गंपू’ आधीपासूनच पक्का झालेला असतो. अशा वेळी रंगमंचावर जिवंत रूपात वावरणाऱ्या या पात्रांशी त्यांचं नातं जुळेल ना, त्यांच्या कल्पनेतील प्रतिमांना तडा जाणार नाही ना, असे असंख्य प्रश्न मनात होतेच; परंतु या संकल्पनेमागची नाटकीय गंमत ओळखून भूमिकेच्या लांबीकडे न बघणाऱ्या सशक्त नटांची ए-वन टीम निर्माण झाली. जणू त्यावेळच्या रंगभूमीवरील नटांपैकी ‘बेस्ट इलेव्हन’!

लग्नाच्या धावपळीतला जनार्दन लवंगारेंचा ‘नारायण’, रवींद्र बेर्डे यांच्या मोठमोठय़ा डोळ्यांचा आणि खास आवाजातला ‘नामू परीट’, ‘तुझं जग वेगळं.. माझं वेगळं!’ म्हणणारा सुनील तावडेचा स्टायलिस्ट ‘नाथा कामत’, शशांक केवलेचा निर्विकार, निराकार ‘गजा’, ‘कुठून शोधून काढला हा ‘सखाराम गटणे’?’ अशी एकमुखी दाद मिळालेला मिलिंद जोगळेकर, आनंद अभ्यंकरचा अफलातून ‘परोपकारी गंपू’, सेक्रेटरी म्हणूनच जन्माला आलेला बाळ कर्वेचा फटकळ, गडगडाटी ‘बापू काणे’, जयंत फडकेंनी रंगवलेले, अनेक पिढय़ा घडवणारे, हळवे ‘चितळे मास्तर’ आणि जगण्याचं अफाट तत्त्वज्ञान अचाट भाषेतून मांडणारा अरुण नलावडेंचा ‘बबडू’.. सगळेच एकदम इरसाल नमुने! पुढे संजय मोनेनंही या ‘बबडू’मध्ये खास आपल्या शैलीत वेगळे रंग भरले. या सगळ्यांवर कडी करायचे ते आमचे ‘अण्णा’- म्हणजे जयंत सावरकर.. या टीममधला अष्टपलू खेळाडू! कारण ते एकाच प्रयोगात पहिल्या अंकात ‘हरितात्या’ रंगवायचे, तर दुसऱ्या अंकात ‘अंतू बर्वा’! शिवाय हेडक्लार्क, सत्काराला धोतर-जोडी घेऊन येणारे फेंगडे गृहस्थ अशा विविध भूमिकांमधून त्यांचा नाटकभर संचार होताच. प्रमुख व्यक्तिरेखेसोबत इतर अनेक पूरक पात्रांच्या वेशात सगळेच जण ‘एन्ट्री’ घेत असत. प्रत्येकाचा डबल-ट्रिपल रोल होता. जोडीला वैजयंती चिटणीस, सुनीता गोरे, उमा राणे, चारुता चेंदवणकर, चिन्मय बेर्डे हेही धमाल आणत असत. विशेषत: ‘आई’च्या भूमिकेत वैजयंती चिटणीस मायेचे, हळवेपणाचे क्षण अचूक निर्माण करीत असत.

तालमी रंगात आल्या होत्या. मला अद्याप समर्पक शेवट सुचत नव्हता. नाटकाची रचना ‘एपिसोडिक’ होती. प्रयोगात ‘माझा प्रवेश संपला की मी घरी जाणार!’ असंही एखाद्या नटाचं म्हणणं कानावर पडत होतं. आणि एकाएकी पुस्तकाच्या प्रस्तावनेतलं एक वाक्य डोक्यात लख्ख उमटलं. चित्रकार गोडसेंनी भाईंना विचारलं होतं, ‘‘जर ही माणसं जिवंत होऊन तुम्हाला भेटली तर काय कराल?’’ उत्स्फूर्तपणे भाई म्हणाले, ‘‘मी त्यांना कडकडून भेटेन!’’ मला शेवटची चित्रचौकट गवसली होती! आता सर्व नटांना शेवटपर्यंत थांबावंच लागणार होतं. पण पडदा पडताना रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटानं अंगावर रोमांच उभं राहण्याचा अलौकिक आनंदही मी त्यांना देऊ केला होता.