23 September 2018

News Flash

एक चिरंतन प्रश्न.. ‘तुम्हीसुद्धा?’

‘डॉक्टर तुम्हीसुद्धा!’च्या पहिल्या वाचनापासूनच महेश मांजरेकर या नाटकाच्या मनापासूनच प्रेमात होता.

सुहास जोशी, सुनील शेंडे आणि मोहन गोखले.. ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा!’मध्ये.  

आदर्शवादी अविनाश पटवर्धन, विवेकाचा काटा मध्यबिंदूवर असलेली वैदेही पटवर्धन आणि येनकेनप्रकारेण मी पैसा मिळवीनच!असा झपाटलेला तरुण पिढीचा शिरीष पेंडसे यांच्या संघर्षांतून समाजातल्या तीन प्रवाहांना डॉक्टर तुम्हीसुद्धा!या नाटकात लेखकानं प्रतलावर आणलं होतं. रत्ना पवारवर झालेल्या अन्यायाच्या निमित्तानं शिक्षण, व्यवसाय, न्यायव्यवस्था, सामाजिक कार्य, कामगारांचे प्रश्न अशा सगळ्या समाजव्यवस्थेलाच जणू त्यात प्रश्न विचारला आहे..

‘नाटय़क्षेत्रात पूर्णवेळ काम करू या’ असं जे ठरवून मुंबईत आलो होतो तिथपर्यंत दोन-अडीच वर्षांत टप्प्याटप्प्यानं येऊन पोहोचलो होतो. आता तर प्रत्यक्षातली नोकरीही सोडून दिली होती. साल होतं १९९१.. आणि ‘नाटक २४ ७ ७’ या सदराच्या शीर्षकाला अगदी साजेसं वर्ष. कारण या एकाच वर्षांत मी दिग्दर्शित केलेली चार नाटकं अक्षरश: एकापाठोपाठ व्यावसायिक रंगभूमीवर आली. ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा!’ (१९ जून १९९१), ‘चारचौघी’ (१५ ऑगस्ट १९९१), ‘प्रिय आईस..’ (२३ सप्टेंबर १९९१) आणि ‘रंग माझा वेगळा’ (३१ डिसेंबर १९९१)!

‘डॉक्टर तुम्हीसुद्धा!’च्या पहिल्या वाचनापासूनच महेश मांजरेकर या नाटकाच्या मनापासूनच प्रेमात होता. ‘अश्वमी थिएटर्स’तर्फेच आपण ही निर्मिती करू, असा त्याने निश्चयच केला होता. त्यासाठी त्यानं अक्षरश: पशांची जुळवाजुळव कशी केली, याचे आम्ही साक्षीदार आहोत. याच नाटकाच्या निमित्तानं आमच्याबरोबर मुंबईत आलेल्या श्रीपाद पद्माकरनेही नोकरी सोडली आणि त्यानं ‘अश्वमी थिएटर्स’च्या व्यवस्थापनाची सूत्रं हाती घेतली. अजित दळवींनी नाटक लिहिल्यानंतर सुहास जोशींना नाटक वाचून दाखवलं होतं आणि त्यांना ते आवडलंही होतं. १९ जून १९९१ रोजी ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा!’चा पहिला प्रयोग महेश मांजरेकरच्या ‘अश्वमी थिएटर्स’तर्फे मुंबईच्या व्यावसायिक रंगभूमीवर झाला. ‘डॉक्टर’च्या निमित्तानं तीन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे या नाटकानं ‘अश्वमी थिएटर्स’च्या बॅनरचं एक दर्जेदार नाटक आलं. दोन- ‘आपल्या बापाचं काय जातं?’, ‘लढा’, ‘मुक्तिधाम’, ‘शतखंड’, ‘देहधून’ अशा नाटकांद्वारे राज्य नाटय़स्पर्धामधून आपली वेगळी लेखनशैली, ओळख निर्माण केलेल्या अजित दळवींचा मुख्य धारेत- व्यावसायिक रंगभूमीवर दमदार प्रवेश झाला. आणि तीन- प्रायोगिक रंगभूमीवर- मुंबईच्या बाहेर नाटय़-चळवळ करताना वेगळ्या पद्धतीची नाटकं हाताळणाऱ्या माझ्यासारख्या रंगकर्मीला आपल्या रंगजाणिवांचं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणता आलं.

दळवी बंधूंच्या पुढील नाटय़प्रवासाची ‘डॉक्टर’ ही एक प्रकारे नांदीच होती. अशी संहिता माझ्या हाती आल्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास मिळाला आणि महेश मांजरेकर, श्रीपाद पद्माकर, रघुवीर तळाशिलकर, मोहन गोखले, सुहास जोशी, नंदू माधव, आसावरी घोटीकर, सुनील शेंडे अशा उत्कृष्ट अभिनेते-अभिनेत्रींच्या, तंत्रज्ञांच्या सशक्त संचात ‘डॉक्टर’नं वेगळेपण उमटवलं. ‘आत्मकथा’, ‘नातीगोती’नं व्यावसायिक रंगभूमीवर निर्माण केलेल्या सकारात्मक वातावरणात ‘डॉक्टर’च्या प्रयोगामुळे आणखी भर पडली. समविचारी, आशयघन नाटकांच्या यशस्वीतेमुळे एकमेकांना पाठबळ मिळत सशक्त नाटककारांची, दिग्दर्शकांची एक भक्कम फळीच १९९० ते २००० या दशकभरात उभी राहिली. त्यात ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा!’चं स्थानही महत्त्वाचं आहे. या नवदोत्तरी दशकाविषयी पुढे लिहीनच.

अजित दळवी हे एकतर रंगकर्मी- नाटककार. ‘परिवर्तन’ ही त्यांची नाटय़संस्था. त्यांचं राज्यशास्त्राचा प्राध्यापक असणं, चळवळीची पाश्र्वभूमी असणं, नाटय़लेखनाला संशोधनाची शिस्त असणं, यामुळे त्यांची नाटकं स्वतची वेगळी ओळख निर्माण करतात. सामाजिक आशय आणि त्यातलं ‘नाटय़’ यांचं बेमालूम मिश्रण त्यांच्या संहितेत असतं. वैचारिक स्पष्टता असल्यामुळे आशय कधी नाटय़मयतेत वाहून जात नाही. आणि रंगकर्मी असल्यामुळे फक्त आशय ‘ठळकपणे’ अधोरेखित करता करता त्यांचं नाटक कधी प्रचारकी होत नाही. तटस्थता, वस्तुनिष्ठता आणि प्रमाणभाषा ही अजित दळवींच्या नाटय़लेखनाची काही ठळक वैशिष्टय़े जाणवतात. म्हणूनच त्यांच्या नाटकांचे दोन-तीन ड्राफ्ट्स होतात, चर्चा होतात आणि त्यातून एक आशयघन नाटक आकाराला येतं.

‘डॉक्टर’च्या पहिल्या खडर्य़ातल्या दोनच गोष्टी प्रामुख्यानं बदलल्या गेल्या होत्या. अविनाश पटवर्धनच्या अपराधी भावनेचं प्रतीक असलेलं अपंग ‘काशीनाथ’ हे पात्र नंतर चच्रेअंती वगळलं गेलं. दुसरं म्हणजे आधीच्या खडर्य़ात रत्ना तिच्यावरचा अन्याय रात्री सांगून गेल्यावरही डॉ. अविनाश दुसऱ्या दिवशी वैदेहीला त्याचा जाब विचारतात असा प्रसंग होता. बहुधा अजित दळवींचा शांत स्वभाव, संयमीपणा अविनाशमध्ये उतरला असावा. मात्र, त्याच दिवशी रात्री फंक्शनहून परतल्यावर त्यांचं जाब विचारणं अधिक सयुक्तिक व नाटय़मय वाटल्यामुळे तो प्रसंग त्याच रात्री घडवला जावा असा आग्रह मी धरला. त्यामुळे या प्रवेशाला एक चढता आलेख मिळाला.

नाटकाच्या रचनेत तंत्र आणि आशय यांची सांगड प्रत्येक नाटककार आपापल्या शैलीप्रमाणे, रंगजाणिवेनुसार घालत असतो. ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा!’ हे नाटक मला रचनेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं वाटतं. भाषा, संवाद, प्रवेश, आशयाचा प्रवाह एकमेकांत मिसळून अत्यंत तीव्र असा नाटय़ानुभव हे नाटक देतं. त्यातला एकही शब्द अवाजवी, अनाठायी वापरला गेलेला नाही. स्वच्छ आणि स्पष्ट चरित्रचित्रण, नाटकाच्या प्रवासातले संघर्षांचे नेमके टप्पे, छोटय़ा छोटय़ा पात्रांच्या सूचक संवादांतून समाजाचं उभं केलेलं रेखीव, ठसठशीत चित्र, ‘काय म्हणायचंय?’ आणि ‘कसं सांगायचंय?’ या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आतून माहीत असल्यामुळे ‘नाटक’ या माध्यमातूनच हा अनुभव मांडला जाणं ही ‘डॉक्टर’ची बलस्थानं आहेत. हे नाटक लिहिण्यापूर्वी अजित दळवी वर्षभर अगोदर अनेक डॉक्टरांबरोबर बोलत होते, वाचत होते. कारण फक्त एखाद्या सत्यघटनेवर आधारित खळबळजनक नाटक त्यांना लिहायचं नव्हतं, तर एकूणच व्यावसायिक नीतिमूल्यं आणि बदलणारा समाज त्यांना या नाटकातून अधोरेखित करायचा होता. आदर्शवादी अविनाश पटवर्धन, विवेकाचा काटा मध्यबिंदूवर असलेली वैदेही पटवर्धन आणि ‘येनकेनप्रकारेण मी पैसा मिळवीनच!’ असा झपाटलेला तरुण पिढीचा शिरीष पेंडसे यांच्या संघर्षांतून समाजातल्या तीन प्रवाहांना या नाटकात लेखकानं प्रतलावर आणलं होतं. रत्ना पवारवर झालेल्या अन्यायाच्या निमित्तानं शिक्षण, व्यवसाय, न्यायव्यवस्था, सामाजिक कार्य, कामगारांचे प्रश्न अशा सगळ्या समाजव्यवस्थेलाच जणू त्यांनी प्रश्न विचारला आहे.

व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या पद्धतीचं, आवडीचं नाटक सादर करण्याची संधी मला ‘डॉक्टर’मुळे पहिल्यांदा मिळाली. एकतर लेखनप्रक्रियेतच लेखक बरोबर असल्यामुळे नाटक लिहून पूर्ण होत असतानाच त्याचं रंगमंचीय सादरीकरण डोळ्यांसमोर स्पष्ट उभं राहत होतं. त्यानंतरच्या महत्त्वाच्या टप्प्यात मला रघुवीर तळाशिलकर या ज्येष्ठ आणि अनुभवी नेपथ्यकाराची खूप मोलाची मदत झाली. वर वर पाहता एकच नेपथ्य, पण त्यातही रिसेप्शन काऊंटर, पॅसेज, क्लिनिक, वरच्या मजल्यावरचा ड्रॉइंग हॉल अशी नेपथ्याची स्तरनिविष्ट रचना या नाटकात होती. एकदा पात्रांनी रंगमंचावर प्रवेश केला की त्यांच्या सर्वत्र होणाऱ्या समांतर हालचाली आणि कृती यांची सेकंदा-सेकंदाची सांगड घालणं हे या नाटकात दिग्दर्शकासाठी एक आव्हान होतं. या नाटकात एकाच वेळी शब्द, हालचाल आणि कृतीही तितकीच महत्त्वाची आहे. शिवाय इंटरकॉम आणि फोनवरील संभाषणंही तितकीच अपरिहार्य आहेत. घर म्हणून सहज, नसर्गिक वावर आणि अत्यंत कमी पात्रांच्या मदतीने हॉस्पिटलचं वातावरण, लगबग, तणाव यांची निर्मिती दिलेल्या नेपथ्य अवकाशात ब्लॉकिंग, मूव्हमेंट्स, कंपोझिशन्समधून बांधली.

सुहास जोशी, सुनील शेंडे आणि मुख्य म्हणजे मोहन गोखलेसारख्या बुद्धिमान नटांबरोबर चर्चा होत असत. सुहास जोशींबरोबरही मी यानिमित्तानं पहिल्यांदाच काम करणार होतो. इतक्या सीनियर असूनही त्यांनी त्याचं कुठेही माझ्यावर दडपण येऊ दिलं नाही. अक्षरश: एखाद्या ज्येष्ठ मत्रिणीसारख्या या प्रक्रियेत त्या सहजतेनं, हसतखेळत सामील झाल्या आणि तितक्याच सहजतेनं त्यांनी डॉ. वैदेहीला आपलंसं केलं. मोहनने उभा केलेला शिरीष पेंडसे म्हणजे तर नसर्गिक आणि नेमक्या अभिनयाचा आदर्श नमुना होता. वाणी, धारदार नजर, अत्यंत दिमाखदार हालचाली, त्यातला ग्रेस आणि भूमिकेच्या अगदी अंतरंगात शिरणं यामुळं मोहननं सादर केलेला डॉ. शिरीष पेंडसे तेव्हा लक्षणीय ठरला. हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यापासून रिसेप्शनिस्ट, पेशंट, नर्स, घरातला नोकर, आपल्या वरिष्ठ असणाऱ्या वैदेही मॅडम यांच्याशी बोलतानाचा त्याचा कमालीचा सहज स्वर वेगळीच मजा आणायचा. विशेषत: त्याच्या एका गोष्टीविषयी मी सतत आजही सर्व नटांशी बोलतो, ते म्हणजे रंगमंचावरचं मोहन गोखलेचं टेलिफोनवरचं संभाषण! मोहन ज्या नजाकतीनं स्टेजवरच्या खोटय़ा फोनमधून आपल्याला प्रत्यक्ष न दिसणारी ‘ती’ पलीकडची व्यक्ती प्रेक्षकांच्या अक्षरश: डोळ्यांसमोर उभा करायचा, ते लाजवाब होतं! पलीकडचा काय म्हणतोय, हे ऐकण्याचा बेमालूम आभास तो निर्माण करायचा. एकूणच मोहनच्या चिवट, तीक्ष्ण, किचकट प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मी जो संहितेचा विचार आणि अभ्यास तालमीच्या हॉलमध्ये जाण्याअगोदर केला, त्यामुळेच बहुधा ‘डॉक्टर’चं दिग्दर्शन आपोआप सहज होत गेलं असावं. सुहासताईंनीही ‘तुझी पद्धत चांगलीय’ असं म्हणून वेळोवेळी पाठ थोपटली. आसावरी घोटीकर, नंदू माधव या दोघांच्याही अभिनयानं नाटकाची दुसरी बाजू भक्कम झाली. विशेषत: दोनच प्रवेश असलेला ‘सुरेश पवार’ नंदूने ज्या ताकदीने उभा केला तो आज दहा वर्षांनंतरही प्रेक्षक-समीक्षकांच्या स्मरणात आहे.

पुढे अनेक वर्षांनी नव्या संचातल्या ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा!’चं जेव्हा दूरदर्शनवर नाटय़ावलोकन झालं तेव्हा लेखक अजित दळवींनी अत्यंत सच्ची प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले : ‘‘बारा वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं तुमचं नाटक आजही तितकंच महत्त्वाचं वाटतं. उलट, वैद्यकीय क्षेत्राचं तर दिवसेंदिवस अधिकच अधपतन होतंय. ‘या नाटकाची आजही तितकीच गरज आहे,’ अशी प्रतिक्रिया जेव्हा कुणी मला देतं तेव्हा नाटककार आणि जबाबदार नागरिक म्हणून मला आनंद होण्यापेक्षा खंतच जास्त वाटते!’’

आपल्या नाटकाचं बारा वर्षांनंतरही समकालीन मूल्य तसंच राहिलंय याचा आनंद होण्यापेक्षा आपण मांडलेल्या समस्येची तीव्रता वाढतच गेल्याचं दुख लेखकाच्या या प्रतिक्रियेतून व्यक्त होतं. ‘डॉक्टर’मध्ये उपस्थित केलेला प्रश्न हा फक्त मांडायचा म्हणून मांडलेला नाही, तर त्याच्या मुळाशी तो प्रश्न सुटावा अशी आंतरिक तळमळ आहे. मुळात हे नाटकही फक्त एका प्रश्नापुरतं किंवा एका क्षेत्रापुरतं मर्यादित नाही. लेखकानं अधोरेखित केलेला हा मूल्यांचा झगडा चिरंतन आहे. त्यावरचं ‘भाष्य’ हे प्रत्येक संवेदनशील माणसाला सदैव सोबत करणारं आहे. ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा!’ हे नाटकाचं नाव प्रशांत दळवीनं सुचवलं होतं. व्यक्ती आणि समाजाच्या जगण्यात ज्यांच्यावर पक्का ‘विश्वास’ आणि ‘खात्री’ असते तेच जेव्हा या विश्वासाला तडा देतात, तेव्हाच ‘तुम्हीसुद्धा?’ असा प्रश्न विचारला जातो. जिवलग मित्र, पालक, शिक्षक, न्यायदान करणारे न्यायाधीश, एरवी ‘जीवनदान’ देणारे डॉक्टरच जेव्हा असा अपेक्षाभंग करतात तेव्हा ‘तुम्हीसुद्धा?’ या विचारण्यातली कळकळ अधिक गडद होते. या नाटकात हाताळल्या गेलेल्या विषयाची समर्पक अभिव्यक्तीच जणू या नावात सामावलेली आहे. आजूबाजूचा भोवताल अनुभवताना तर कधी कधी वाटतं- ‘तुम्हीसुद्धा?’, ‘तूसुद्धा?’ असं म्हणता म्हणता ‘आपणसुद्धा?’, ‘मीसुद्धा?’ असा स्वतलाच प्रश्न विचारायची वेळ कधी येऊ नये..

chandukul@gmail.com

First Published on June 10, 2018 12:33 am

Web Title: chandrakant kulkarni article in marathi shirish pendse