..एव्हाना नाटकाची आवड, छंद ही मर्यादा ओलांडली गेली होती. पण फक्त ‘जुनून’ असून भागणार नाही, तर ज्ञान आणि आकलन वाढणं गरजेचं आहे हे जाणवत होतं. मग त्या दिशेनं ठोस प्रयत्न सुरू झाले. विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, वसंत कानेटकर यांची नाटकं वाचून तो प्रयोग कसा सिद्ध झाला असेल? सादरीकरणाचा फॉर्म कसा हाताळला असेल? अशी कल्पना करून पाहणं, प्रायोगिक नाटकं आणि समांतर सिनेमे पाहून त्यांचा अन्वयार्थ लावणं, घनघोर चर्चा करणं सुरू झालं. लेखन, अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती असा वैयक्तिक ‘फोकस’ सापडला होता. आता ‘रियाजा’ला सुरुवात झाली. स्वतंत्र नाटकांच्या लिखाणाबरोबरच प्रशांतनं ‘अरण्य’ (भारत सासणे), ‘स्मशानातलं सोनं’ (अण्णाभाऊ साठे) या कथांचंही उत्तम नाटय़रूपांतर केलं. अभिनय, दिग्दर्शनाच्या अभ्यासासाठी ‘आषाढ का एक दिन’ (हिंदी- मोहन राकेश), ‘पोस्टर’ (हिंदी- शंकर शेष), हृदय (श्याम मनोहर) आणि चक्क मुख्य प्रवाहातील ‘पुरुष’ (जयवंत दळवी), ‘जास्वंदी’ (सई परांजपे) अशी वेगवेगळ्या शैलीतली नाटकं दिग्दíशत केली. नाटकांची गुंतागुंत, बारकावे हळूहळू ध्यानात येऊ लागले. बरोबरच्या नटांची क्षमता आणि समज वाढत गेली. प्रत्येकालाच लय सापडत गेली. मोहन राकेशांच्या ‘काव्यमय’ हिंदीनं आमच्या नटांची ‘वाणी’ रसाळ, प्रवाही केली; तर शंकर शेषांच्या ‘पोस्टर’नं त्यांना ‘तीव्रता’ मिळाली. ‘स्मशानातलं सोनं’मध्ये मला नटांची ‘शरीरभाषा’ आणि समूहदृश्यं हाताळता आली, तर ‘अरण्य’मुळे मानसिक आंदोलनांचा आलेख मंचित करता आला. सगळ्यांचाच आवाका, अनुभूती एकत्रितरीत्या उंचावण्यासाठीची ही धडपड होती. या वेगवेगळ्या घाटातल्या, रूपबंधातल्या नाटय़प्रयोगांनी दिग्दर्शक म्हणून सतत प्रश्न निर्माण केले, अडथळे उभे केले. पण यातूनच रंगमंचीय साधनं वापरण्याची एक ‘मेथड’ सापडत गेली असावी. हळूहळू ‘जिगीषा’ची म्हणून सादरीकरणाची एक शैली निर्माण होत गेली. ज्याचं प्रमुख सूत्र होतं- सातत्य, दर्जा आणि निवड!

नाटकं प्रत्यक्ष उभी करताना, इतरांचे प्रयोग नीट बघताना एक गोष्ट मनात रुजत गेली की, नाटक फक्त जुनं किंवा नवं नसतं, तर ते सादर करण्याची ‘संवेदना’ नवी-जुनी असू शकते. कदाचित म्हणूनच एखादं जुनं नाटक नव्या रंगजाणिवेनं सादर करता येतं; आणि कित्येकदा एखादं नवं नाटकही जुन्या स्कूलचं वाटू शकतं. मग तुम्ही नाटक पुण्या-मुंबईला करा किंवा सोलापूर, नागपूर, नाशिक, जळगाव, लातूर, सातारा इथं कुठंही. त्याचा विषय-आशय काहीही असो; पण जर तुमच्या संवेदना त्या काळाच्या असतील तरच तुमचा ‘प्रयोग’ खऱ्या अर्थानं वेगळा ठरतो. थोडक्यात, ‘चांगलं-वाईट’ नाटक म्हणजे काय? नाटय़प्रयोग फसतो म्हणजे नेमकं काय होतं? ‘शो’ रंगत नाही म्हणजे काय घडतं? याचा खोलात जाऊन शोध घेणं, त्यानुसार तालमीत बदल करत जाणं आणि मग जिवंत प्रयोग अनुभवणं.. असा रोमांचकारी प्रवास सुरू झाला.

याच काळात शहरात झालेला पं. सत्यदेव दुबे नाटय़महोत्सव ही आमच्यासाठी एक पर्वणीच ठरली. काळ्या िवगा आणि काही निवडक लाकडी फ्रेम्सनं निर्माण झालेली अंधारी पोकळी, प्रकाशाच्या तीव्रतेनं निर्माण केलेली खोली आणि त्या अवकाशात घडणारा ‘इंटेन्स’ प्रयोग असा हा अनोखा अनुभव होता. विशेषत: ‘यकृत’! श्याम मनोहरांचं हे नाटक खास दुबे स्टाईलचं होतं. विहंग नायक, सुनीला प्रधान, अच्युत पोतदार, सुनंदा कर्नाड या नटमंडळींचा विलक्षण ‘परफॉर्मन्स’ होता तो! आजही डोळे बंद केले तर तो प्रयोग जस्साच्या तस्सा दिसतो, इतका तो स्मरणात आहे. प्रयोगांनंतर ‘‘यकृत’ खूप आवडलं’ असं सांगायला आम्ही सगळे गेलो तर दुबेजी ‘‘मिठू मिठू पोपट’ कसं वाटलं? ते आवडलं नाही?’ असं सारखं विचारू लागले. तेव्हा ‘अजिबात आवडलं नाही!’ असं आम्ही स्पष्ट सांगितल्याचीही गमतीशीर आठवण आहे.

राज्य नाटय़स्पध्रेची अंतिम फेरी सोडली तर समग्र महाराष्ट्राचं चित्र एकाच मंचावर पाहण्याची सोयच त्याकाळी नव्हती. म्हणून मग नाटय़महोत्सव घडवून आणणं, पुण्या-मुंबईच्या जाणकारांना नाटकं पाहायला बोलावणं, त्यांच्याशी चर्चा करणं सुरू झालं. या सगळ्यात उत्सवापेक्षा चिकित्सेची भूक जास्त होती आणि आपलं नाटक पारखून घेण्याची तीव्र इच्छा होती. कुठलंही नवं ‘प्रोजेक्ट’ उभारताना आम्ही कधी खचलो नाही. ते होईल का? याच्या भीतीनं गारठलो नाही. हळूहळू आमच्यातला ‘रिस्क टेकिंग फॅक्टर’ बळकट होत गेला. यातूनच आकाराला आली ‘प्रेक्षक सभासद योजना’! ज्यात वर्षभर दर महिन्याला एक नाटक करणं अपेक्षित होतं. जणू स्वत:ला दिलेली ‘कमिटमेंट’ आणि प्रेक्षकांना दिलेलं ‘अभिवचन’! सगळ्यांनी अक्षरश: सायकल, लुना, बसनं प्रवास करून सुमारे २५० सभासद आधी नोंदवले आणि मगच योजना सुरू केली. शिवाय ऐनवेळी येणारे शंभरेक प्रेक्षक असा ‘जिगीषा’चा खात्रीचा प्रेक्षक यामुळं तयार झाला. त्यांचे पत्ते, दूरध्वनी क्रमांक असा ‘डेटा’ही संस्थेकडे होता आणि फक्त पोस्टकार्ड पाठवून, फोन करून दर महिन्याच्या नाटकाविषयी माहिती दिली जाई. वार्षकि फी होती फक्त २५ रुपये. (म्हणजे २ रुपयात एक नाटक आणि ओळखपत्र, पोस्टेज खर्च १ रु.) या योजनेत फक्त आम्हीच नाटक केलं नाही, तर थिएटर अकॅडमी- पुणेच्या ‘चेस’(अतुल पेठे) आणि ‘बसस्टॉप’(सतीश आळेकर) या एकांकिका, परिचय- पुणेचं प्रभावी विचारनाटय़ ‘दोन अंकी नाटक’(संजय पवार), पंचम- जळगावचा ‘वर्षांगीत’सारखा संगीताचा सुरेल कार्यक्रम यांनाही ‘जिगीषा’नं निमंत्रित केलं आणि परिघाबाहेरच्या रंगकर्मीशी संवाद घडवून आणला. वेळोवेळी प्रा. कमलाकर सोनटक्के, डॉ. वि. भा. देशपांडे यांनी मार्गदर्शन केलं. थिएटर अकॅडमीच्या श्रीधर राजगुरूंचा सहवास लाभला आणि प्रायोगिक संस्थेचा ‘सूत्रधार’ असणं म्हणजे नेमकं काय, याचा खरा अर्थ कळला. या मॅनेजमेंट गुरूकडून ‘जिगीषा’च्या जितू-पद्माकर जोडगोळीला विशेष गुरुमंत्र मिळाला. अर्थात वर्षांअखेर या योजनेमुळे मोठा आíथक फटका संस्थेला बसलाच. पण खंबीरपणे स्मरणिका प्रसिद्ध करून आणि जाहिरातींच्या साहाय्यानं हा तोटा भरून काढण्यासाठी ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ही तात्काळ उभारली गेली. ज्यात प्रकाश वैद्य, ऊर्मिला कुलकर्णी आणि अनेकांनी खूप कष्ट घेतले. हितचिंतकांनीही सढळ हाताने जाहिराती, देणग्या दिल्या. या काळात पालकांचा विश्वास, सीनियर्सचा पािठबा आणि उपक्रमशील प्रेक्षकांची साथ यामुळे ‘जिगीषा’चा आवेग कायम राहिला. आमच्याहून वयानं मोठे, पण उत्साहानं तरुण असणाऱ्या आरतीदीदी आणि वैद्य कुटुंबानं तर आमचे अक्षरश: लाड केले. एकूणच बाबा दळवी, प्रा. चंद्रकांत भालेराव, प्रा. चंद्रकांत पाटील, प्राचार्य प्रताप बोराडे, डॉ. भालचंद्र कानगो, सुधीर गव्हाणे, महावीर जोंधळे अशा विविध क्षेत्रांतल्या माणसांनी ‘जिगीषा’ला वेळोवेळी मदत केली.

चार खास निमंत्रित ‘पौगंड’चा प्रयोग पाहताना..

असाच एक अविस्मरणीय किस्सा ‘पौगंड’ नाटकाचा. औरंगाबादमध्ये होणाऱ्या ‘कन्यादान’च्या प्रयोगासाठी डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर, सुहास जोशी, सुषमा तेंडुलकर येणार असल्याचं कळलं. त्यांना आपला प्रयोग दाखवून चर्चा करता आली तर..? कल्पना डोक्यात आली. मग काय? संपूर्ण ललित कला भवन हे नाटय़गृहच बुक करून, नेपथ्य, प्रकाश, संगीत, वेशभूषा, रंगभूषेसह चोख ‘शो’ आम्ही त्यांच्यासमोर सकाळी ११ वा. सादर केला. ८०० आसनक्षमतेच्या संपूर्ण नाटय़गृहात फक्त ते ‘चार’ विशेष प्रेक्षक, काही पालक आणि स्टेजवर आणि िवगेत मात्र २५ जण! अतिशय सुंदर प्रयोग झाला होता तो. त्या सगळ्यांनीच खूप मन:पूर्वक प्रतिक्रिया आणि शाबासकी दिली. पुढे ‘पौगंड’चा असाच एक प्रयोग स्वबळावर आम्ही ‘बालगंधर्व’ला सादर केला आणि पुण्यातल्या झाडून सगळ्या रंगकर्मीना त्या प्रयोगाला बोलावलं, त्यांच्याशी चर्चा केली. औरंगाबादमध्ये राहून आपण जे नाटक करतोय ते आधुनिक संवेदनेशी नाळ जोडणारं आहे ना, हे तपासून पाहण्याचीच आस होती ही. ‘पौगंड’ नाटकावर प्रा. सुशील सुर्वे यांनी मानसशास्त्रीय विश्लेषण करणारा दीर्घ लेख लिहिला. तर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकरांनी साने गुरुजींना अनावृत पत्र लिहून ‘पौगंड’चं वेगळेपण अधोरेखित केलं.

अजित दळवी, प्रशांत दळवी यांची थिएटर अकॅडमीच्या नाटककार योजनेत झालेली निवड ही आणखी एक महत्त्वाची घटना. संस्थेच्या लेखकाच्या अनुभवदृष्टीला वेगळेपण मिळालं की भवतालच्या सर्व रंगकर्मीच्या जाणिवांचंही आपोआप उन्नयन होतं, हा आपल्याकडचा इतिहास. (एकटय़ा तेंडुलकरांनी रंगायन, आविष्कार, थिएटर अकॅडमीच्या दिग्दर्शक-नटांना प्रेरणा आणि पाठबळ दिलं, हे आपण अनुभवलंय.) नाटककार योजनेमुळे पुढे दळवी बंधूंचा महाराष्ट्रातल्या इतर नाटककारांशी झालेला संवाद, चर्चा, एकमेकांच्या प्रयोगांविषयी आदानप्रदान हे खूप महत्त्वाचं ठरलं.

आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘नाटय़प्रशिक्षण’! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाटय़शास्त्राच्या अभ्यासक्रमाला आम्ही सगळ्यांनी मिळूनच प्रवेश घेतला. हेतू खूप स्पष्ट होता- बाहेर नाटय़चळवळीत काही वष्रे सातत्यानं रंगभूमीचा ‘प्रॅक्टिकल’ अनुभव घेत असतानाच या शास्त्राची ‘थिअरी’ही पक्की व्हावी. इथं मराठी रंगभूमीचा इतिहास, टप्पे, जागतिक रंगभूमीवरचे निरनिराळे प्रवाह, विविध ‘स्कूल्स’ची ओळख होत गेली. उत्तमोत्तम इंग्रजी ग्रंथांमधली अनेक रेखाचित्रं, छायाचित्रं, चार्टस् डोळ्याखालून गेले. क्लासरूम प्रॉडक्शन्समधून रंगभाषेचा, शैलींचा अभ्यास गहिरा झाला. यात माझ्यापुरता एक गमतीचा भाग असा झाला, की आपण यापूर्वी तालमीत जे करत होतो त्यालाच ब्लॉकिंग, कम्पोझिशन, मुव्हमेंट प्लॅन, रंगमंचांचे डाऊनराइट ते अपलेफ्टपर्यंतचे नऊ भाग असं संबोधलं जातं हे कळलं आणि दिग्दर्शन करताना आपण जे जे छोटे नाटय़संकेत नकळत वापरतो तीच या शास्त्राची ‘प्रिन्सिपल्स अ‍ॅण्ड एलिमेंट्स्’ (तत्त्वं आणि घटक) आहेत हे जाणवून दिलासा मिळाला. थोडक्यात, आधी ‘प्रॅक्टिकल’ आणि मग ‘थिअरी’ असं झाल्यामुळे नाटय़संकल्पना कायमच्याच रुजल्या. परीक्षेच्या निमित्तानं पाश्चात्य रंगभूमीवरचं ‘हॅम्लेट’ अभ्यासता आलं. आणि अंतिम परीक्षेला तर मी ‘शाकुंतल’ हे भारतीय अभिजात नाटय़ सादर केलं. हे धाडसी प्रयोग करताना विभागाचं मोठं ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी खुलेपणानं उपलब्ध करून दिलं. विद्यापीठात हे नाटय़शास्त्राचे वर्ग संध्याकाळी असत. मी आणि प्रशांत दोघेही खरं तर तेव्हा ‘लोकमत’मध्ये उपसंपादक म्हणून काम करत होतो. पण राजेंद्रबाबू दर्डा यांनी आम्हा दोघांनाही त्यासाठी ‘डय़ुटी अवर्स’ बदलून दिले, हे ऋण आम्ही कधीच विसरू शकणार नाही. दिवसा नोकरी, संध्याकाळी नाटय़शास्त्राचे वर्ग आणि रात्री पुन्हा ‘जिगीषा’च्या तालमी असं जे चक्र तेव्हा सुरू झालं ते आजही तसंच आहे..

एव्हाना आम्ही सगळेच पदवीधर होत होतो. कॉलेजमधल्या काही मत्रिणींची तर लग्नंही होऊ लागली होती. नोकरी, स्थर्याची अपेक्षा कुटुंबाकडून होणंही गर नव्हतं. पण नाटकाच्याच भाषेत सांगायचं झालं तर यानंतरच्या ‘नाटय़प्रवेशा’त एक मोठ्ठी घटना घडणार आहे आणि त्यामुळे आम्हा सगळ्यांच्या प्रवासाची दिशा आणि वाटच बदलणार आहे, हे आमच्यातल्याच ‘एका’ व्यक्तीशिवाय कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं!

chandukul@gmail.com