३१ डिसेंबर १९८८ ला ‘रमले मी’चा शुभारंभ झाला. उत्तम प्रतिसादात प्रयोग ‘चंद्रलेखा’च्या शिस्तीत सुरू झाले. माझी अस्वस्थता तात्पुरती संपली. आता मोहनकाकांनी स्वतंत्र संधी देण्यासाठी मला पुढच्या डिसेंबरची वाट पाहावी लागणार होती. आणि अचानक संगीत नाटक अकादमीच्या तरुण दिग्दर्शकांच्या योजनेत माझी निवड झाली. त्यासाठी मी प्रशांत दळवीचं ‘दगड का माती?’ हे नाटक करायला घेतलं; जे त्यानं थिएटर अ‍ॅकॅडमीच्या नाटककार योजनेत लिहिलं होतं. निश्चित विचारसरणी आणि बांधिलकी मानणाऱ्या ‘इप्टा’ संस्थेच्या मराठी विभागातर्फे मी ते सादर केलं. मुंबईत येण्याआधी ‘इप्टा’च्या एका परिषदेच्या निमित्तानं ए. के. हंगल, अबीद रिझवी यांच्याशी परिचय झाला होता. शिवाय ज्येष्ठ मित्र वामन केंद्रे हा तिथे दिग्दर्शक म्हणून कार्यरत होताच. त्यानेही मनपूर्वक मदत केली.

‘दगड का माती?’ नाटक वास्तववादी शैलीतलं नव्हतं. नवऱ्याच्या काळ्या कृत्यांविषयी संशय असणाऱ्या पत्नीला अखेर ती कृत्यं भिंतीतून आरपार दिसू लागतात. घरातल्या तरुण मुलीला सगळ्या भिंती अदृश्य होऊन तिच्याकडेच सगळे बघतायत असं वाटायला लागतं. पुढे तर पात्रांना चक्क एकमेकांच्या मनातलंच दिसू लागतं. हा पारदर्शकपणा असह्य़ होऊन मग या चौकोनी कुटुंबातला मुलगा स्वतचा शोध घेण्यासाठी घरातूनच निघून जातो. आता विस्कटलेलं हे घर सावरायला भक्कम भिंती बांधणारा ‘घरजावई’च आणण्याची कल्पना आई-वडिलांना सुचते. ते सरळ जाहिरातच देतात- ‘कंत्राटदार जावई पाहिजे!’ ..आणि मग घरात घुसतो नव्या विचारांनी झपाटलेला, जुन्याची मोडतोड करायला निघालेला एक रांगडा, धुमसता तरुण! असं तिरपागडं कथानक प्रशांतनं या नाटकात गुंफलं होतं. या नाटकाचा आरंभिबदू बदलण्याची अफलातून आयडिया दिली होती दुबेजींनी. त्यांना हे नाटक खूप आवडलं होतं.

pragya singh thakur
Malegaon Blast Case : “२५ एप्रिलला हजर रहा, अन्यथा..”, न्यायालयाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांना काय सांगितलं?
pune special court to pronounce verdict in narendra dabholkar murder case on may 10
दाभोलकर हत्या खटल्याचा निकाल १० मे रोजी; सीबीआय, बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण
omprakash raje nimbalkar marathi news
धाराशिव : ओमप्रकाश राजेनिंबाळकर १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार
Dhairyasheel Mohite Patil sharad pawar
१४ एप्रिलला शरद पवार गटात प्रवेश, १६ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार? धैर्यशील मोहिते म्हणाले…

कंत्राटदाराच्या व्यक्तिरेखेत फिट बसणाऱ्या विनय आपटेला आम्ही नाटक वाचून दाखवलं. आणि तिथल्या तिथं ‘मी हे नाटक करणार’ असं विनयनं घोषितच करून टाकलं. तेव्हा त्याचं ‘रानभूल’ जोरात सुरू होतं. ‘तो मनस्वी आहे. तुझ्या तालमींना कधी तो येणारही नाही..’ अशा दंतकथा आम्हाला ऐकवल्या गेल्या. पण आमचा अनुभव मात्र औरच होता. शूटिंग, प्रयोग, मीटिंग्ज हा व्याप सांभाळून विनयनं तालमींचं वेळापत्रक कधीही चुकवलं नाही. माझ्यातल्या दिग्दर्शकावर कधी कुरघोडी केली नाही. ‘ईगो’ बाळगला नाही. उलट, नाटक उभं राहण्यासाठी इतर यंत्रणा, तंत्रज्ञही त्यानं उपलब्ध करून दिले. दीपा श्रीराम यांचं नावही त्यानंच सुचवलं. आणि हे आडवळणाचं पाच पात्री नाटक उभं करताना विनय, दीपाजी या दोन महत्त्वाच्या व्यक्तींशी पुढे आमचा कायमचा ऋणानुबंध जोडला गेला. याच नाटकाच्या निमित्ताने प्रतीक्षा लोणकर मुंबईत आली. या तिघांशिवाय जयंत फडके, मिलिंद सफई अशी उत्तम टीम जमली. विनयनं लयबद्ध, काव्यात्म संवादांची ती भूमिका मोठय़ा दिमाखात पेश केली. दीपाजींनी एक विलक्षण अस्वस्थ आई उभी केली. पुन्हा एकदा मिलिंद जोशीनं कल्पक, प्रतीकात्मक नेपथ्य उभारलं आणि विवेक आपटेनं नाटकाच्या धाटणीला गूढ अवकाशाचं परिमाण देणारं पाश्र्वसंगीत योजलं. उत्तम ध्वनिसंयोजन केलं चक्क संजय नार्वेकरनं! मुंबईतला पहिला प्रयोग छबिलदासमध्ये झाला. जयपूरच्या झोनल फेस्टिव्हलमधूनही नाटकाची दिल्ली महोत्सवासाठी निवड झाली.

..आणि मग मोहन वाघांनी आपला दिलेला शब्द खरा करीत माझ्या हातात ‘चंद्रलेखा’चं नवं नाटक सुपूर्द केलं- ‘रंग उमलत्या मनाचे’! लेखक साक्षात् वसंत कानेटकर! व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पणासाठीची यापेक्षा आणखी कोणती मोठी संधी असणार होती? मी झपाटल्यासारखं एका रात्रीत नाटक वाचून काढलं. कानेटकरांच्या सुवाच्य, रेखीव हस्ताक्षरातली ती करकरीत कोरी संहिता मला दिग्दर्शक म्हणून स्फुरण देत होती. पौगंडावस्थेतल्या हळव्या, संवेदनशील मुलाच्या भावविश्वाची ती गोष्ट. बापाविना पोरक्या मुलाचं आणि आईचं अत्यंत घट्ट  नातेबंध निर्माण झालेला असतानाच आयुष्याच्या मध्यिबदूवर आता आईच्या आयुष्यात कुणी दुसरा ‘मित्र’ येतोय ही चाहूल त्याला हादरवून टाकते. तो सरभर होतो. नाजूक वयातल्या दोलायमान स्वभावानुसार कधी उसळून, तर कधी भावनिकरीत्या तो कसा पेटून उठतो याचा हा आलेख. आजी, आजोबा, समवयस्क मित्राच्या सहवास-संवादातून त्याची समज वाढत जाते.. अशी ही मानसशास्त्रीय मांडणी.

नाटक दोन-तीन वेळा वाचून मी सविस्तर नोट्स काढल्या. काही प्रवेशांत पुनल्रेखन करणं अत्यावश्यक आहे असं मनापासून जाणवलं. पण हा आता मोठा पेच होता. त्यासाठी मला वसंत कानेटकरांशी चर्चा करणं गरजेचं होतं. मोहनकाकांना ही पुनल्रेखनाची कल्पना अजिबात आवडली नाही. ‘कानेटकरांशी तू हे असं कसं बोलणार? त्यांना हे बोलणं रुचलं नाही तर?’ हे त्यांचं म्हणणं बरोबरच होतं. पण माझा कोणताही आविर्भाव नव्हता. हे नाटक पुन: पुन्हा वाचून काही मुद्दे मी नोंदवून ठेवले होते. ‘मी तुमच्या साक्षीनंच त्यांच्याशी बोलतो. मला नेमकं काय वाटतंय ते नीट सांगतो..’ असा आग्रह धरल्यावर शेवटी ही ऐतिहासिक भेट घडली!

दस्तुरखुद्द वसंत कानेटकर समोर बसलेले. मोहनकाका मनातून अस्वस्थ. आणि मी? दडपणाच्या प्रचंड ओझ्याखाली! आधी ओळख करून देऊन सुरुवातीला मी त्यांच्याच ‘वेडय़ाचं घर उन्हात’, माझं ‘पौगंड’ या मानसशास्त्रीय नाटकांविषयी प्रस्तावना केली. आणि ‘आताच्या या नव्या नाटकामधील काही भाग कृपया मला नव्यानं लिहून द्याल का?’ अशी नम्र विनंती केली. नाटकाच्या त्या-त्या टप्प्यावर हे बदल होणं पात्रांच्या चरित्रचित्रणाच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचे आहेत, त्यामुळे नाटकाला खूप वेगळं परिमाण मिळेल; नटांनाही नवा दृष्टिकोन मिळेल, हे माझं कळकळीचं म्हणणं विस्तारानं नमूद केलं. कानेटकर अत्यंत स्थितप्रज्ञ, शांत होते. सगळं ऐकून अचानक ते म्हणाले, ‘पण या पुनल्रेखनासाठी तालमी थांबून राहतील. मोहन वाघांच्या नियोजनात मोठ्ठा अडथळा येईल. त्याचं काय?’ ‘नाही. मी तालमींमध्ये खंड पडू देणार नाही. माझ्या हातात दोन अंक तयार आहेत. कास्टिंग झालंय. फक्त दुसऱ्या अंकाच्या शेवटी आणि तिसऱ्या अंकात काही बदल मला अपेक्षित आहेत..’ असं मी त्यांना तत्परतेनं सांगितलं. ‘तुमच्याकडे आत्ता स्क्रिप्ट आहे?’ अचानक त्यांचा सूर बदलला. मी तीनही अंकांचे वेगवेगळे गठ्ठे समोर ठेवले. त्यातला तिसरा अंक हातात घेऊन त्यांनी अक्षरश: बाजूला टाकला आणि म्हणाले, ‘पाच दिवसांत हा सगळा अंक मी नव्यानं लिहून देतो. तुम्ही कसलंही दडपण न घेता नाटकावरचं निरीक्षण प्रांजळपणे सांगितलं हे मला आवडलं. तुम्ही तालमींना सुरुवात करा!’ मी त्या दोघांनाही वाकून नमस्कार केला. त्यांनी पाठीवर हात ठेवला. सगळा ताण वितळला. मी तालमीला निघून गेलो..!

हा प्रसंग कसा विसरू? या सगळ्या दिग्गज, मातब्बर मंडळींचं ‘मोठेपण’ नेमकं अशाच कितीतरी छोटय़ा छोटय़ा क्षणांमध्ये, त्यावेळी घेतलेल्या त्यांच्या निर्णयांमध्ये दडलेलं असतं! खरं तर एका क्षणात कानेटकर माझं म्हणणं धुडकावून लावू शकले असते आणि नाटक सुविहित झालंही असतं. पण त्या क्षणाला माझ्या म्हणण्यातली कळकळ त्यांनी जाणून घेतली हा त्यांच्या मनाचा केवढा मोठेपणा! संवेदनशील माणसाच्या सकारात्मक विचारप्रक्रियेची अशी ओळख पटली की आपण आपसूकच विनम्र, नतमस्तक होतो.

एव्हाना वंदना गुप्तेबरोबर काम केलेलंच होतं. ती सीनियर, अनुभवी होती. शेकडो प्रयोग करून मुख्य धारेत स्थिरावली होती. तिचा म्हणून एक प्रेक्षकवर्गही होता. ‘रमले मी’च्या तालमीत एकमेकांच्या कामाच्या पद्धतीचा अंदाज घेण्यात, माझा नवखेपणा जोखण्यात काही अवधी गेला. पण नंतर मात्र आमची गट्टीच जमली. ती जिवाभावाची मत्रीण बनली. अत्यंत बेधडक. थेट स्वभाव. प्रचंड उत्साह. तालमींना वक्तशीर. नाटकावर जीव. रंगमंचावरची सळसळती ऊर्जा आणि नसíगक, उत्स्फूर्त अभिनय असं हे अजब रसायन. तिच्याबरोबर आजवर मी थोडीथोडकी नाही, तर सात नाटकं केली. तीही भिन्न आशय, विषय, शैलीतली. अत्यंत संयत, संवेदनशील अभिनेता असलेला ज्येष्ठ नट प्रदीप वेलणकर आणि सोबत अनुभवी जनार्दन सोहोनी आणि नव्यानं ‘चंद्रलेखा’त सामील झालेल्या चारुशीला ओक असं फ्रेश कॉम्बिनेशन ‘रंग उमलत्या मनाचे’मध्ये होतं. आणि ज्याच्या भावविश्वाभोवती हे सगळं नाटक उभारलेलं होतं, जो या नाटकाचा खरा ‘नायक’ होता, त्या सुमित राघवनची मराठी रंगभूमीवर या नाटकामुळं जोशात हिरोसारखी ‘एन्ट्री’ झाली! तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकलं! अक्षरश: हीच प्रचीती सुमितमुळं तेव्हा आली. त्याच्या प्रसन्न, निरागस, खळाळत्या हालचालींनी रंगमंचावर बहार आली. ज्याची आठवण सगळं नाटय़क्षेत्र गेली २८ र्वष जागवतंय! शुभारंभाच्या खणखणीत प्रयोगानंतर मुंबई व महाराष्ट्रभर ‘रंग उमलत्या मनाचे’ नाटकाची वेगानं ‘माऊथ पब्लिसिटी’ झाली. मुख्य म्हणजे वर्तमानपत्रं आणि प्रेक्षकांची पसंती याशिवाय अन्य कुठलंही प्रसारमाध्यम तेव्हा नसताना! महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे अक्षरश: लोंढे नाटय़गृहाकडे आले. बुकिंगला रांगा लागल्या. चंद्रलेखा, कानेटकर, वंदना यांच्या हमखास प्रेक्षकांबरोबरच सुमितच्याही ओढीने प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होऊ लागले. तेव्हाचं हे वातावरण खूपच चतन्यदायी होतं. प्रयोग संपल्यावर सुमितच्या सह्य़ा घ्यायलाही मेकअप रूमपर्यंत रांगा लागत. एक ‘क्रेझ’, ‘स्टारडम’च त्याच्या वाटय़ाला आलं!

समोरच्या किंवा शेजारच्याच घरात घडणारं आपण काही बघतोय, हा अनुभव देण्यासाठी मी सुमितच्या सहज वावराचा उपयोग हालचाली, कम्पोझिशन्समध्ये केला. जिन्याच्या पायऱ्याही ही किशोरवयीन मुलं धडाधडा चढतात, उतरतात. मधेच पायरी वजा करून उडी मारतात. कधी पाठमोरंच जिने उतरतात. या वयातला मुलगा बाहेरून बेल वाजवतानाही एकदा नाही तर लागोपाठ बेल वाजवत राहतो. त्याचं घरात शिरणं, वावरणं इथपासून ते उतावीळपणे त्याच्या भावनांचे क्षणोक्षणी बदलणारे रंग, त्यांच्या छटा यांचा ‘वेग’ मी नाटक घडताना कायम ठेवला; ज्यामुळे या नाटय़ानुभवाची ‘लय’ सतत ओघवती राहिली. पात्रांनी सतत सोफा, डायिनग चेअरवरच बसून निर्माण होणारी कोरडी औपचारिकता मोडून काढण्याचा प्रयत्न मी या नाटकात केला. म्हणूनच शिक्षिका असणारी वंदना परीक्षेचे पेपर तपासायला हातात पाट घेऊन खाली बसली. नंतर तिच्या संयमी मित्रानंही घरात आल्यावर तिच्या शेजारी बसण्यामुळं कम्पोझिशन्समधलं अवघडलेपण गळून पडलं. नाटकातल्या हालचाली बांधलेल्या, आखलेल्या राहिल्या नाहीत. नाटक प्रवाही, नसíगक होत गेलं आणि मग अचूक भावनिक संघर्षांच्या क्षणांना हा वेग कमी करून मला नेमका परिणाम साधता आला.

‘रंग उमलत्या’ च्या यशानं मला प्रचंड आत्मविश्वास दिला. व्यावसायिक रंगभूमीवर एक दिग्दर्शक म्हणून माझी ओळख निर्माण केली. आपण दिलेली संधी फुकट गेली नाही हे समाधान मी मोहनकाकांना देऊ शकलो. प्रत्यक्ष कानेटकर पहिल्या रांगेत बसून आपल्याच नाटकाला खळखळून दाद देताना त्यांचा उमललेला चेहरा विंगेतून पाहण्याचा अद्भुत क्षणही मला याच नाटकानं दिला. असा अनुभव रंगमंचावर निर्माण झाला की ते कलाकार, संस्था, प्रेक्षक सगळ्यांशीच तुमचे भावबंध आपोआप निर्माण होतात. म्हणूनच या नाटकानं मोहन वाघ, चंद्रलेखाची टीम, वंदना, प्रदीप, सुमित, प्रेक्षक आणि संपूर्ण नाटय़जगताशीच माझं नातं कायमचं जोडलं गेलं. ३१ डिसेंबर १९८९ या दिवशी शुभारंभालाच दुपार, रात्र आणि मध्यरात्र अशी ‘हॅटट्रिक’ या नाटकानं केली आणि हा आवेग शतक महोत्सवापर्यंत पुढे कायमच राहिला.

– चंद्रकांत कुलकर्णी

chandukul@gmail.com