18 February 2019

News Flash

नाटक निवडताना..

नाटक-सिनेमा माध्यमात किंवा एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात तुमच्या हातून एखाद् दुसरं चांगलं काम घडलं

|| चंद्रकांत कुलकर्णी

नाटक-सिनेमा माध्यमात किंवा एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात तुमच्या हातून एखाद् दुसरं चांगलं काम घडलं, थोडंफार यश मिळालं की कामाचा ओघ आपोआपच तुमच्यापर्यंत खळाळत येतो. तुम्ही जर अभिनेते असाल तर निरनिराळ्या भूमिका तुमच्यापर्यंत चालत येतात. तुम्ही लेखक-नाटककार असाल तर तुमच्या संहितांना मागणी येते. ‘नवीन काय?’ असं विचारलं जाऊ लागतं. काही लेखकांना तर ‘साइनिंग अमाऊंट’ देऊन ‘थंड हवेच्या ठिकाणी जाऊन लिखाण करा, आम्ही सोय करतो..’ असा प्रेमळ आग्रहही केला जातो. एकूणच तुमचं एखाद्या ‘प्रोजेक्ट’मध्ये असणं याला एक वलय आणि वजन प्राप्त होतं. म्हटलं तर यात काहीच गर किंवा वावगं नाही, कारण हा जीवनव्यवहार आहे. तुम्ही तुमच्या कामातून जे सिद्ध केलंय, त्या यशाला तुमच्या क्षेत्रानं दिलेली ही पोचपावती असते. प्रश्न फक्त हा असतो, की तुम्ही हे सगळं कसं स्वीकारता? हा पेच कसा सोडवता? या कौतुकानं उतता-मातता? गोंधळता? की गडबडून न जाता खडबडून जागे होता? गाफील राहता की सावध होता? आपलं काम आवडतंय, त्याची नोंद घेतली जातेय याचा मनापासून आनंद होत असला तरी हे सगळं त्या- त्या वेळेपुरतं आहे, पुढचं काम करताना अधिक जागरुक राहायला हवं याचं भान असणं खूप गरजेचं असतं. ‘हेच दिवस आहेत, आता मिळेल ते काम स्वीकारा’, ‘आता दिवस-रात्र काम करून कमावून घ्या’, ‘आपणहून येणाऱ्या कामाला ‘नाही’ का म्हणायचं?’.. असे ‘सुविचार’ही कानावर पडतच असतात! पण हेच ते कसोटीचे क्षण, हीच ती मेख- जिथे प्रत्येकाचा कस लागतो. जिथं तुम्हाला अचूकरीत्या ‘निवड’ आणि ‘नकाराचे’ निकष ठरवावे लागतात.

१९९२-९३ नंतर माझ्याकडेही अशाच खूप संहिता येणं सुरू झालं. आजही येतात. कधी निर्मात्यांकडून, कधी खुद्द नाटककारांकडून, प्रसंगी एखाद्या अभिनेत्याकडून. सुरुवातीला गोंधळायला होतंच. कारण हे सगळेच ओळखीचे, आपल्याच क्षेत्रातले. पकी काही तर मातब्बर. प्रत्येकाविषयी आपल्या मनात आदर, आपुलकी. यापकी प्रत्येकाबरोबर काम करण्याची फक्त त्यांचीच नव्हे, तर आपलीही तेवढीच तीव्र इच्छा! अशावेळी ते नाटक वाचण्यापूर्वीच आपला ‘होकार’ किंवा ‘नकार’ हा परस्परसंबंधांवर परिणाम (खरं तर ‘दुष्परिणाम’!) तर करणार नाही नं? अशी धास्ती क्षणभर वाटतेच. पण मग हळूहळू जाणवत गेलं, की आपल्याकडे आलेलं नाटक किंवा त्या लेखनाला अंतिम न्याय देणारे आपण कुणी न्यायाधीश नाही आहोत; तर वाचल्यानंतर त्या क्षणी वाटणारं प्रामाणिक मत देणारे रंगकर्मी आहोत. ते नाटक म्हणून सादर होताना होणाऱ्या रंगमंचीय शक्यतांची पडताळणी करणारे, त्याच्या दृश्यात्मकतेचा अंदाज लावू पाहणारे दिग्दर्शक आहोत. आपल्याला फक्त खराखुरा, पूर्वग्रहविरहित असा प्रांजळ अभिप्राय द्यायचाय. बस्स! हे मत संपूर्णत: वैयक्तिक असणार आहे. आपल्या आवडी-निवडीतून, अनुभव-निरीक्षणांमधून आलेलं ते पूर्णत:  ‘आपलं’ म्हणणं असणार आहे. ते काही सार्वकालिक भाष्य नव्हे. अंतिम निदान किंवा विधान नव्हे!

नाटकाच्या आशय-विषयाशी, त्यातून अधोरेखित होणाऱ्या विचाराशी दिग्दर्शकानं शंभर टक्के सहमत असणं, हा मला सगळ्यात महत्त्वाचा निकष वाटतो. कारण ‘नाटक’ हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे यावर माझा नितांत आणि ठाम विश्वास आहे. ‘आभासा’लाही ‘सत्य’ म्हणून पटवण्याचं सामथ्र्य नाटक या प्रकारात आहे. नाटक बघताना स्वतवर अंधार करवून घेतल्यामुळे प्रेक्षकांची दृष्टी, श्रवणशक्ती तीक्ष्ण बनते. त्यांची पंचेद्रियं तीव्र स्वरूपात कार्यरत होतात. आकलनशक्ती, कल्पनाशक्ती शतपटीनं वाढते. त्यामुळे त्या दोन-तीन तासांत घेतलेला अनुभव कायमस्वरूपी त्यांच्या मेंदूच्या ‘हार्ड डिस्क’मध्ये ‘स्टोअर’ होतो. नाटकातल्या विचार, भावनांशी तो मनानं, बुद्धीनं वेगानं जोडला जातो. हा अनुभव त्याच्या थेट अंतरंगात घुसणारा आणि त्यातल्या विचार-भावनांचा परिणाम होऊन बघणाऱ्याला आतून बाहेरून बदलवून टाकण्याइतपत सामथ्र्यशील असतो. लेखकानं प्रदीर्घ काळ चिंतन करून केलेलं हे भाष्य, दिग्दर्शकानं त्यावर केलेला विचार, नटांनी अनेक महिने तालमी करून सादर केलेलं, तंत्रज्ञांनी प्राप्त करून दिलेलं निराळं अवकाश.. हे सगळंच प्रेक्षकाला त्या विशिष्ट दोन तासांत सहजपणे उमगतं, उलगडतं. हीच तर नाटक या प्रकाराची विलक्षण खासियत! म्हणूनच या अनुभवाला ‘जादू’ म्हटलं जात असावं. इथं व्यक्त होणाऱ्या आशय-विचाराशी माझी दिग्दर्शक म्हणून संपूर्ण सहमती असणं म्हणूनच गरजेचं ठरतं. मला काही त्यातल्या विचारांशी देणंघेणं नाही. ‘मी फक्त सादरीकरणाची एक कला म्हणून ते सादर केलं..’असं म्हणून दिग्दर्शक आपली नतिक जबाबदारी झटकून टाकू शकत नाही. यशस्वी झालं तर ते ‘मी’ केलं आणि फसलं तर मात्र इतर कारणांमुळं.. अशी भलावणही त्याला करता येत नाही. अशावेळी आपण करत असलेल्या नाटकातल्या विचारानं भले समाज दोन पावलं पुढे जाईलच याची खात्री नसली तरी त्यातून एक पाऊल मागे जाण्यासारखं काही सूचित होत नाहीए नं, हे काटेकोरपणे बघणं हीसुद्धा मी बांधिलकी मानतो. यात कुठे अडथळा आला तर मात्र नकाराच्या निर्णयाप्रत यावं लागतं. अर्थात हा नकार कुण्या व्यक्तीला नसतो, त्याच्या प्रतिभेला नसतो, तर आपल्याला न पटणाऱ्या आशयाला असतो. इतर कुणीतरी ते नाटक करण्याचा पर्याय खुलाच असतो.

..पण प्रश्न फक्त इथेच संपत नाही, एवढं मात्र खरं. कधी कधी नाटकातल्या विचाराशी आपण सहमत असलो तरी त्या आशयाचं नाटय़ात्म विधान (ड्रॅमेटिक स्टेटमेंट) होतंय का, हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण नाटक म्हणजे केवळ आशयाचा ‘प्रचार’ करण्याचं माध्यम नाही. सर्वागीण, समग्र नाटय़ानुभव होण्यासाठी त्याला सादरीकरणाची ‘मिती’ असणं गरजेचं असतं. कथा, कविता, कादंबरी लिहिताना लेखक साहित्याच्या अंगानं ही मांडणी करीत असतो. तिथे त्याला एक निराळं स्वातंत्र्य आणि स्वायत्तता असते. वाचक त्या साहित्यकृतीचा एकटय़ाने आस्वाद घेऊ शकतो. त्याला ते ‘सलग’ वाचण्याची अपरिहार्यताही नसते. कुठेही बसून, कितीही वेळात, तुकडय़ा-तुकडय़ांनी, ‘बुकमार्क’ टाकून तो या वाचनाचा अनुभव घेऊ शकणार असतो. पण ‘नाटक’ हे दृश्य-श्राव्य माध्यम आहे. इथं नाटक सादर करणारे आणि बघणारे एका विशिष्ट कालमर्यादेच्या चौकटीत हा सलग दृश्यानुभव घेत असतात. स्थळ-काळ-कृतीच्या निश्चित चौकटीत आणि रंगमंचीय अवकाशातच ही मांडणी ते प्रत्यक्ष अनुभवतात. नट आणि प्रेक्षक या दोघांमध्ये ‘आज.. आत्ता.. इथे’ अशा प्रकारची जिवंत देवाणघेवाण होते. क्रिया-प्रतिक्रिया घडते. म्हणूनच लिखित नाटकाला ‘र्अध साहित्य’ म्हणण्याची पद्धत असावी. नाटक उभारण्याच्या प्रक्रियेत त्याला हळूहळू रंगावृत्तीचा आकार येतो. आणि मग अंतिमत: प्रत्यक्ष प्रयोगच्या रूपानं त्याचं एका सजीव कलाकृतीत रूपांतर होतं.

‘नाटक’ या स्वरूपातली ही अभिव्यक्ती प्रयोगसिद्ध असणं, प्रयोगासाठी पूरक असणं, हाही एक महत्त्वाचा निकष असतो. नाटक लिहीत असताना नाटककार त्याचं दृश्यरूप जणू त्याच्या मनोमंचावर आधीच पाहत असतो. रंगमंचावरच्या हालचाली, कृती त्याला दिसत असतात. उच्चारला जाणारा शब्द आणि ध्वनी त्याला ऐकू येत असतो. म्हणूनच त्याविषयी रंगसूचनांद्वारे वारंवार तो दिग्दर्शक, नट, तंत्रज्ञ यांना काही सूचित करीत असतो. स्वत: लेखक ‘रंगकर्मी’ असला तर नाटक लिहिताना नाटय़-माध्यमाची सामथ्र्यस्थळं तो सहजगत्या हाताळतो. पण या माध्यमाची जाण नसेल, नाटय़लेखनाचं तंत्र पुरेसं अवगत नसेल तर मात्र कधी कधी सरधोपट, एकरेषीय मांडणी होऊन नाटक सादर करण्याच्या शक्यतांना मर्यादा येऊ शकते. अर्थात चर्चा, मोडतोड, पुनल्रेखन या मार्गानीही शेवटी नाटक उत्तमरीत्या सादर झाल्याची कैक उदाहरणं आपल्याकडे आहेत. अशा चर्चा म्हणजे लेखनाच्या हेतूविषयी शंका घेणं नसतं, तर ते नाटक म्हणून ‘वर्क’ होईल का, हे लेखक-दिग्दर्शक एकत्रितरीत्या आजमावत असतात. सुचण्याच्या आरंभिबदूपासून पुढे त्याला पूर्णरूप आल्यानंतरदेखील हे त्या लेखकाचं नाटक म्हणूनच ओळखलं जाणार असतं. फक्त श्रेयनामावलीत या नाटकाचं दिग्दर्शन पहिल्यांदा अमुकतमुकनं केलं, या मर्यादित अधिकाराचा मान दिग्दर्शकाला असतो. भविष्यात दुसरे अनेक दिग्दर्शक त्यांच्या त्यांच्या स्वरूपनिर्णयानुसार (इंटरप्रीटेशन) वेगळ्या रूपात आणि घाटांत याच नाटकाचा प्रयोग नव्या पद्धतीनं करण्याची शक्यता खुलीच असते. उलट, जे नाटक असं वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करण्याचं सामथ्र्य अंगी बाळगतं, तेच तर मोठं नाटक ठरतं!

याव्यतिरिक्तही निवड करताना अनेक घटकांचा मनात अप्रत्यक्षपणे विचार हा सुरूच असतो. संहिता नवीन आहे, पण त्यात नावीन्य आहे नं? मांडलेला विषय रंगभूमीवर यापूर्वीच मांडला गेलाय का? याच पद्धतीचं नाटक आपणच आधी दिग्दíशत केलंय का? ते नाटक गोष्टीत अडकलंय की गोष्टीबाहेर काही बोलू इच्छितंय? त्यात नवीन काही आव्हान दडलंय का? संवादलेखन सहज, स्वाभाविक झालंय की सुविचारी, बोजड आहे? ते विनोदी असेल तर त्या विनोदात काही वेगळी गंमत आहे का? आजचा काळ त्यात डोकावतोय नं? कोणत्या विसंगतीवर बोट ठेवलंय का? ते विचारप्रधान असेल तर अस्वस्थ करण्याची ताकद त्यात आहे का? असे अनेक विचार एखादं नाटक निवडताना मनात येऊन जातात. असे अनेक अडथळे पार करत एखादं नाटक तुम्हाला कधी कधी सहज आवडून जातं. भावतं. भिडतं. आणि मग तुम्ही पुढच्या तयारीला लागता.

हा सर्व विचार करताना दिग्दर्शक हा काही सर्वज्ञ नसतो, हे लक्षात घेणंही आवश्यक आहेच. मात्र, रंगमंचावर घडणाऱ्या प्रत्येक क्षणाची सर्जनशील जबाबदारी त्यानं स्वतवर घेतलेली असते. अनेक महत्त्वाचे ‘कलात्मक’ निर्णय घेताना त्याला रंगभूमीच्या सर्व बाजूंचा सतत विचार करावा लागतो. यादृष्टीनं त्याच्याकडे बघावं लागतं. एकदा लेखकाबरोबरची सांगोपांग चर्चा होऊन एकमत झालं की सादरीकरणाची शैली ठरवताना तो इतर तांत्रिक अंगांच्या प्रमुखांशी चर्चा करत असतो. पुढे नटांबरोबरच्या संपूर्ण तालीम प्रक्रियेत काम करताना तो लेखकाच्या म्हणण्याचंच प्रतिनिधित्व करतो आणि प्रेक्षकांपर्यंत ते नाटक पोहोचवण्यासाठीचे सर्व प्रयत्न करत असतो. प्रत्येक घटकाचं योगदान वापरून तो अक्षरश: कणाकणानं आणि क्षणाक्षणानं प्रयोग उभारत असतो. या काळात त्याला सतत नाटक चहुबाजूंनी दिसत असतं.. जाणवत असतं.

कधी कधी दिग्दर्शक नाटककारानं लिहिलेली संहिता स्वीकारण्याऐवजी कथा, कविता, कादंबरी, ललित अशा अन्य प्रकारांत लिहिला गेलेला ऐवज वेगळ्या रंगजाणिवेनं रंगमंचावर सादर करतो. मुळात ‘नाटक’ या आकृतिबंधात न लिहिलेल्या या अक्षरधनाचा वापर तो विशिष्ट संकल्पनेसह नाटकीय रचनेत मांडतो तेव्हा ती संपूर्णपणे त्याची नाटय़दृष्टी असते. कारण नाटक असंच लिहिलं पाहिजे, तसंच असलं पाहिजे- अशी काही ठोस नियमावली, आचारसंहिता नाही. किंबहुना, सादरीकरणाच्या प्रचलित पद्धतीला नकार देण्यातूनच अनेक नवनवे प्रयोग आकाराला येत असतात. म्हणूनच कधी रंगमंचाची चौकट मोडून थेट रस्त्यावर, कधी समीप रंगमंचावर, तर कधी खुल्या मदानात असं कुठेही हे सादरीकरण होऊ शकतं. कलेचं व्याकरण मोडून असे नव्या नाटय़-संकल्पनेचे विविध प्रयोग आपल्याकडे सातत्याने होत असतात.

एकूणच ‘स्वीकार’ आणि ‘नकार’ या नाण्यासारख्याच निवडीच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक जण ठरवून कशाला तरी नकार देतच असतो. ‘नाटक’ माध्यमाचा विचार करायचा झाला तर मग नेमका नकार कशाला द्यावा? लेखकानं ‘अतिपरिचित रचनेला’ द्यावा, दिग्दर्शकानं हमखास यशस्वी अशा ‘फॉम्र्युल्याला’ द्यावा, नटानं ‘तोच तोचपणा’ला द्यावा, तंत्रज्ञांनी साचेबद्धपणाला द्यावा, आणि प्रेक्षकांनी ‘डोक्याला ताप नको’ या संकल्पनेला द्यावा. कारण या सगळ्या ‘नकारां’मध्ये नव्याचा स्वीकार आहे, नवतेची आस आहे, प्रयोगशीलतेची ऊर्मी आहे. पुढे पुढे जाताना, नवनवीन नाटकं सादर करून पाहताना हळूहळू ही नेमकी ‘निवड’च तुमची म्हणून एक शैली ठरवते, तुमची वेगळी ओळख निर्माण करते.

chandukul@gmail.com

First Published on July 22, 2018 4:18 am

Web Title: marathi natak culture