21 April 2019

News Flash

‘आविष्कार’:  अथक, अविरत, अविचल!

१९८८-२०१८ असं माझं ‘आविष्कार’ नाटय़संस्थेशी ३० वर्षांचं घट्ट नातं आहे.

सीताराम मामा, अरुण काकडे

|| चंद्रकांत कुलकर्णी

१९८८-२०१८ असं माझं ‘आविष्कार’ नाटय़संस्थेशी ३० वर्षांचं घट्ट नातं आहे. ही केवळ संस्था नाही, तर सर्व रंगकर्मीसाठीचं हक्काचं ठिकाण.. माहेरच आहे असं वाटतं. छबिलदासमध्ये ८८ साली झालेल्या पहिल्या अरिवद देशपांडे स्मृती नाटय़महोत्सवात ‘जिगीषा’नं ‘पौगंड’ नाटक केलं तेव्हापासून ‘आविष्कार’शी ऋणानुबंध जुळले आहेत. या नाटय़मांडवाखालून गेला नाही असा नाटकवाला तसा दुर्मीळच. आज मनोरंजनाच्या माध्यमांत वावरणाऱ्या प्रत्येक कलाकाराची पाळंमुळं ‘आविष्कार’च्या एखाद्या तरी नाटकाशी जोडलेली असतातच. अभिनेत्रींपकी तर जवळपास प्रत्येकीनं ‘दुर्गा झाली गौरी’मध्ये काम केलेलं आहे. साखरेचा एक मोठा कण डोक्यावर घेऊन ‘दुर्गा’मधल्या मुंग्या ‘आम्ही राब राब राबतो..’ म्हणत रंगमंचावर फिरायच्या. आता ‘आविष्कार’चे रंगकर्मी-कार्यकत्रे याच गाण्याच्या आशयाशी आजही इमान राखून आहेत. मुंबईत आल्यापासून छबिलदासमध्ये सादर होणाऱ्या सर्व प्रायोगिक नाटकांचा मी प्रेक्षक तर होतोच; पण पुढे अनेक उपक्रमांशी प्रत्यक्ष जोडलाही गेलो. याच संस्थेची निर्मिती असणाऱ्या प्रत्यक्ष सहा नाटकांचं दिग्दर्शन मी केलं. ‘यळकोट’, ‘त्रिनाटय़धारा’ (‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगान्त’), ‘मौनराग’ आणि ‘आषाढ बार’!

पूर्णवेळ कलाक्षेत्रात काम करण्यासाठीच मुंबईत आलो खरा; पण फक्त मुख्य धारेतच एकामागोमाग नाटकं सादर करून माझं समाधान झालं नाही. विशिष्ट वळणांवर मी पुन्हा पुन्हा प्रायोगिक रंगभूमीकडे आवर्जून वळलो. अनेक वर्षांच्या कामानंतर, अनुभवानंतर प्रायोगिक-व्यावसायिक रंगभूमीविषयीच्या संकल्पना स्पष्ट आणि स्वच्छ झाल्या होत्या. फक्त कामाचा मोबदला, मानधन न घेता तिथं सादर होणारं सरसकट ‘प्रायोगिक’ सदरात नोंदवलं जाणं जसं मला मान्य नाही, तसंच मुख्य धारेत आशयाची अभिव्यक्ती करताना तुम्हाला तडजोड करावी लागते, प्रेक्षकांचा अनुनय करावाच लागतो असं म्हणणंही मला खूप बेफिकीरपणाचं लक्षण वाटतं. नव्या, आधुनिक संवेदना व्यक्त होताना, त्याचं नाटय़ात्म विधान वेगवेगळ्या बंधात करून पाहण्याची प्रयोगशाळा म्हणूनच जाणतेपणानं प्रायोगिक रंगमंचावरचा आविष्कार केला जातो, पाहिला जातो, त्याचं विश्लेषण केलं जातं. शिवाय सरधोपट वास्तववादी शैलीत आशय सादर करण्याचं बंधन झुगारून भाषा, मांडणी, सूचकता, प्रतीकात्मकता यातून वेगळ्या दृश्यभाषेच्या सर्व शक्यता प्रायोगिक रंगमंचावर तपासून पाहिल्या जातात, या विचाराशी मी सहमत आहे. मात्र, ज्या ज्या वेळी मनापासून प्रायोगिक रंगमंचावर काही सादर करावंसं वाटलं, तेव्हा ‘आविष्कार’कडेच विचारणा केली आणि दरवेळी अत्यंत आनंदानं मला त्यासाठी होकार मिळाला. इथं समविचारी नाटय़कर्मीबरोबर काम करण्याचं समाधान खूप अवर्णनीय आहे.

१९९३ साली आम्ही ‘यळकोट’ सादर केलं. नाटककार श्याम मनोहरांनी मांडलेला मध्यमवर्गीय मानसिकतेचा, वैचारिक ‘यळकोट’! जगण्याचा अग्रक्रम न ठरवता आल्यामुळे सुखाच्या शोधात आपली झालेली हास्यास्पद फरफट म्हणजेच ‘यळकोट’! बिनमौजेच्या गोष्टींमधली वेगळीच मौज शोधणारे, आपली स्वतंत्र तिरकस लेखनशैली निर्माण करणारे हे महत्त्वाचे नाटककार. नाटय़तंत्राच्या आहारी न जाता ते मोकळेपणानं, पण उपहासानं, वेगळ्या निरीक्षणशक्तीनं आशय अधोरेखित करतात. ही ‘मनोहारी’ शैली नाटय़- दिग्दर्शकाला एक आव्हानच ठरते. त्यांची ‘हृदय’ आणि ‘यळकोट’ ही दोन नाटकं दिग्दíशत करण्याची संधी मला मिळाली. औरंगाबादला ‘जिगीषा’तर्फे मी ‘हृदय’ केलं आणि ‘यळकोट’ (खरं तर ‘सेक्स यळकोट’!) मुंबईत ‘आविष्कार’ संस्थेतर्फे!

किशोर कदम, गणेश यादव, प्रतीक्षा लोणकर, रेणुका शहाणे, निर्मिती सावंत, विश्वास सोहोनी, मंगेश सातपुते, दिनकर गावंडे अशी पात्रयोजना ठरत गेली. नुकतंच महिना- सव्वा महिन्यापूर्वी लग्न झालेले दोन विरुद्ध स्वभावाचे इंजिनीअर्स आणि त्यांच्या बँकेत नोकरी करत असलेल्या बायका अशा जोडय़ा ‘यळकोट’मध्ये आहेत. ‘थंड’ श्रीधर, ‘धसमुसळा’ अशोक, ‘उत्तान’ सुनंदा, ‘सोशिक’ वनिता, ‘घायकुतीला आलेल्या’ मिनाक्षीकाकू, ‘समोरच्या घरात टक लावून बघणारे’ विश्वासराव अशी ही सहा अर्कचित्रं! श्यामरावांच्या स्वच्छ आणि आपल्याला सवयीच्या नसलेल्या मराठीतून ही पात्रं बोलत राहतात. सेक्सविषयीच्या रूढ समज-गरसमजांचं ओझं वाहत, शरीरसुखाच्या ‘फँटसीज्’ प्रत्यक्षात आणू पाहणाऱ्या या दोन तरुण जोडय़ा आणि सुखाच्या अपेक्षाभंगाने पोळलेली मिनाक्षीकाकू आणि विश्वासरावची मध्यमवयीन प्रौढ जोडी अशी ही सहापदरी धावपळ. त्यामुळे सगळ्याच वयाचे प्रेक्षक या ना त्या स्वरूपात आपलं प्रतिबिंब या पात्रांमध्ये पाहतात आणि त्यांच्याविषयी एक करुणा बघणाऱ्यांच्या मनात दाटून येते. किशोर-गणेश ही दुबेजींच्या शिस्तीतली जोडगोळी, रेणुका ‘आंतरनाटय़ संस्थे’मध्ये तयार झालेली, ‘जिगीषा’च्या नाटय़-चळवळीतून उभी राहिलेली प्रतीक्षा, त्याकाळी राज्य नाटय़स्पध्रेमधून ठसठशीत कामगिरी करून दाखवणारी निर्मिती, एकांकिका स्पर्धाचा ‘विनर’ दिग्दर्शक विश्वास अशी ही नट मंडळी असल्यामुळे नाटक वाचण्यापासून उभं राहीपर्यंत अखंड ऊर्जेचा जणू स्रोतच वाहत होता. मुंबईत माटुंग्यात कर्नाटक संघ, पुण्यात भरत नाटय़ मंदिर आणि टिळक स्मारक मंदिरात या प्रायोगिक नाटकाचे त्याकाळी होणारे ‘हाऊसफुल्ल’ प्रयोग हा तेव्हा चच्रेचा विषय ठरला होता. याच पात्रांना घेऊन हिंदी रूपांतर केलेल्या ‘आंगन टेढा’चेही प्रयोग पृथ्वी थिएटरमध्ये असेच भरगच्च गर्दीत झाले.

१९९४ साली ‘आविष्कार’ने ‘वाडा चिरेबंदी’ त्रिनाटय़धारा सादर केलं. ते संपूर्ण वर्ष मी फक्त ‘त्रिनाटय़धारे’च्या प्रक्रियेत स्वत:ला गुंतवून घेतलं होतं. त्याविषयी ‘लोकसत्ता’ आणि इतर ठिकाणी, तसंच ‘दायाद’ पुस्तकात खूप सविस्तर लिहिलं गेलं आहे. त्यामुळे त्याविषयी इथं पुनरावृत्ती करणार नाही. पण विजय तेंडुलकर, अरुण काकडे, सुलभा देशपांडे, प्रदीप मुळ्ये आणि सर्व कलावंत यांनी या अवाढव्य नाटय़- प्रकल्पासाठी जे योगदान दिलं त्याविषयी अपार कृतज्ञता मनात आहे.

२००९ साली ‘आविष्कार’नं महेश एलकुंचवारांचा नाटय़महोत्सव सादर केला. ही संस्था आणि माझं महेशदांशी एक वेगळं सर्जनशील नातं निर्माण झालं होतंच. यादरम्यान त्यांनी जाणीवपूर्वक ललित लेखनाचा आकृतिबंध स्वीकारला होता. ‘मौनराग’ हा अशाच समृद्ध लेखांचा संग्रह. भारतीय तत्त्वज्ञान, साहित्य, अध्यात्म, चित्रकला, संगीत, नातेसंबंध अशा अनेक अंगांनी लिहिलेलं हे ललित लेखन वाचकाला सर्वागानं समृद्ध करून जातं यात शंकाच नाही. त्या साहित्यिक अभिव्यक्तीलाच रंगमंचावर सादर करण्याचा प्रयत्न मी केला. ‘जातस्य हि ध्रुवो मृत्यु’चं अभिवाचन आणि ‘गहकूटं विसङ्गितम्’चं सादरीकरण असं हे स्वरूप होतं. अत्यंत मोजकं, सूचक नेपथ्य-प्रकाश- संगीत असलेला हा नाटय़ावकाश जाणकार प्रेक्षकांना मन:पूर्वक भावला. भिडला. सुरुवातीचे मोजके प्रयोग किशोर कदमनं अभिवाचन केलं होतं. पण नंतर कामांतील व्यग्रतेमुळे त्याला प्रयोग करणं शक्य झालं नाही. सचिन खेडेकर आणि मी मात्र गेली नऊ वष्रे हा अभिनव प्रयोग अत्यंत निष्ठेनं सादर करतोय. सचिनचं तर ‘मौनराग’वर विशेष प्रेम आहे आणि म्हणूनच तो अग्रक्रमानं त्याकरता वेळही देतो. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अलिबाग, पेण, कणकवली, दिल्ली अशा विविध ठिकाणी ‘मौनराग’ झालं. नागपूरच्या एका जुन्या वाडय़ातल्या चौकापासून ते थेट जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्तानं कार्डिफ (लंडन) येथे झालेल्या ‘मौनराग’च्या प्रयोगांचे अनुभव आयुष्यभर स्मरणात राहतील.

कल्पना करा की, ‘मृच्छकटीक’कार शुद्रक, कविकुलगुरू कालिदास, आधुनिक नाटककार मोहन राकेश आणि आजच्या पिढीचा तरुण लेखक-दिग्दर्शक ही वेगवेगळ्या कालखंडातील रंगकर्मी मंडळी एकत्र येऊन गप्पा मारत बसली तर..? तेही एका ‘बार’मध्ये? तर काय काय होऊ शकेल? कोणकोणत्या विषयांवर ते बोलतील? वेगवेगळ्या विचारधारांनी प्रभावित असलेली ही माणसं कला, जीवन, सौंदर्य, समाज याविषयी काय वाद-प्रतिवाद करतील? नुसत्या कल्पनेनंच ही इंटरेस्टिंग गंमत उत्सुकता निर्माण करते. ही सगळी भन्नाट नाटय़पूर्ण शक्यता मकरंद साठे या नाटककारानं ‘आषाढ बार’ या नाटकात कागदावर उतरवली. ‘आविष्कार’नं ११ एप्रिल २०१६ रोजी ‘आषाढ बार’चा पहिला प्रयोग रंगमंचावर सादर केला.

मुळात ‘स्थळ : दिवाणखाना’ या संकल्पनेत मकरंद साठेंचं एकही नाटक नाही. परंपरेला नुसताच नकार न देता एक सशक्त आशय मांडण्यासाठी ते नेहमी नाटक या माध्यमाचा वेगळेपणानं विचार करताना दिसतात. ‘चारशे कोटी विसरभोळे’, ‘सापत्नेकराचे मूल’, ‘ते पुढे गेले’ ही त्यांची प्रायोगिक नाटकं मराठी, हिंदी रंगभूमीवर आली आहेत. ‘आषाढ बार’ हे नवता आणि परंपरेला प्रश्न विचारणारं चर्चानाटय़. कला आणि जीवनविषयक विचाराला लेखक आपल्या लिखाणातून कसा सामोरा जातो, हे ऐरणीवर आणून वेगवेगळ्या विचारधारांच्या लेखकांना इथं  समोरासमोर उभं केलंय. आणि त्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांतून हे चर्चानाटय़ घडवलंय.

अभिनयाची आणि सादरीकरणाची वेगळी पद्धत शोधण्याची मनमोकळी संधी दिग्दर्शकाला उपलब्ध करून देणारं हे नाटक. नाटय़शास्त्राचे संकेत आणि प्रयोगशील समांतर रंगभूमीवरच्या सादरीकरणाचं नवं तंत्र या दोघांनाही ते एकत्र कवेत घेतं. वक्तृत्व पणाला लावणारे संवाद, वितंडवाद.. त्यातही मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, संस्कृत अशा सगळ्याच भाषांचा मनसोक्त वापर इथं केला गेलाय. बोलीभाषेबरोबरच कविता, मुक्तछंद, श्लोक, शायरी, संस्कृत वचनांचाही मुबलक साठा संहितेत आहे. यातली बौद्धिक चर्चा जड व रटाळ न वाटता रसाळ व्हावी यासाठी आम्ही भाषेवर भरपूर काम केलं. प्रसाद बर्वे, प्रज्ञा शास्त्री, आशीष पाथोडे, सुव्रत जोशी, कल्याणी मुळे, नितीन भजन, संतोष वेरुळकर, पूर्वी भावे या तरुण नट-नटय़ांनी झडझडून तालमी केल्या. प्रदीप मुळ्ये, राहुल रानडे, रवि-रसिक, प्रतिमा जोशी या तंत्रज्ञ सहकाऱ्यांनी ‘आषाढ बार’ची दृश्यश्राव्य भाषा कल्पकतेनं साकार केली.

आजही आदरणीय काकडेकाकांच्या खांद्याला खांदा लावून दीपक राजाध्यक्ष, रवि सावंत, रसिक राणे आणि अनेक तरुण मंडळी हे नाटय़व्रत मन:पूर्वक जोपासताहेत. १९७१-२०१८ असा हा ४७ वर्षांचा ‘फ्लॅशबॅक’! विविध टप्प्यांवर उपक्रमांची, व्यवस्थापनाची, दिग्दर्शनाची जबाबदारी ज्यांनी अंगावर घेतली त्यात अरिवद देशपांडे, सुलभाताई देशपांडे आणि परिवार, सर्व कामेरकर भगिनी आणि त्यांचा विस्तारित परिवार, पं. सत्यदेव दुबे, जयदेव हट्टंगडी, रोहिणी हट्टंगडी, चंदर होनावर, प्रदीप मुळ्ये, चेतन दातार, प्रमोद पवार, अजित भगत, विजय केंकरे, सुषमा देशपांडे अशी मोठ्ठी आणि न संपणारी यादी आहे. ‘छबिलदास’च्या रूपानं हक्काचा मंच ‘आविष्कार’नं सतत उपलब्ध करून दिला. प्रायोगिक रंगभूमीच्या चळवळीच्या इतिहासात या संस्थेची नोंद ‘मातृसंस्था’ म्हणून व्हावी, एवढी मोठी ही कामगिरी! ‘रंगनायक’, ‘तें आणि आम्ही’ अशा पुस्तकांच्या संपादक मंडळानं (राजीव नाईक, प्रदीप मुळ्ये, विजय तापस) खूप कष्ट घेऊन दस्तावेज गोळा केला, त्याची शिस्तबद्ध मांडणी केली आणि रंगभूमीच्या अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ उपलब्ध करून ठेवले.

‘रंगायन’ ते ‘आविष्कार’, ‘छबिलदास’ ते ‘माहीमची शाळा’, ‘शांतता’ ते ‘अरण्य-किरण’ असा हा अथक, अविरत प्रवास आहे. आजही हक्काच्या जागेसाठीचा पाठपुरावा निष्ठेनं सुरूच आहे. स्पर्धा, प्रायोगिक नाटक, बालनाटय़, छंदशाळा, एकांकिका, दीर्घाक, नाटय़महोत्सव, पुस्तक प्रकाशन, लेखन-अभिनय कार्यशाळा, अभिवाचन, व्याख्यानं, परिसंवाद आणि नवनवीन संकल्पना इथं नित्य राबवल्या जातात. नव्या वाटांच्या शोधात वळणाघाटांचा प्रवास करताना जणू ‘काकडे काका’ ही बस ‘ड्रायव्हर’ म्हणून चालवताहेत आणि सीताराम मामा ‘कंडक्टर’ म्हणून मागच्या सीटवर बसले आहेत हे दृश्य कायम डोळ्यासमोर तरळत राहतं! (फक्त इथे सीताराम मामा ‘डबल बेल’ नाही, तर नाटक सुरू होण्याआधीच्या तीन घंटा खणखणीत वाजवतात.) किती साथीदार या प्रवासात मधेच उतरून गेले, वेगवेगळ्या थांब्यांवरचे नवे प्रवाशी या बसमध्ये बसले.. या विक्रमी प्रवासाचं नियोजन करताना किती ‘डेपो मॅनेजर’च्या टीम्स कार्यरत राहिल्या, किती नवी गावं, किती ठिकाणं नजरेखालून गेली. कधी इंधन कमी पडलं, कधी दुरुस्ती निघाली. जुने रस्ते जाऊन ‘हायवेज्’ आले, ‘फ्लायओव्हर्स’ आले. पण पुढे चालत राहायचं, थांबायचं नाही, हा निर्धार मात्र कायम आहे.

chandukul@gmail.com

First Published on August 19, 2018 12:03 am

Web Title: sitaram mama arun kakde