01 March 2021

News Flash

ईस्टमनकलर!

‘मी औरंगाबादच्या सांस्कृतिक-सामाजिक पर्यावरणाचं, तिथल्या भवतालाचं ‘बायप्रॉडक्ट’ आहे!’

‘बोलाचीच कढी’ नाटकातील दृश्य

‘मी औरंगाबादच्या सांस्कृतिक-सामाजिक पर्यावरणाचं, तिथल्या भवतालाचं ‘बायप्रॉडक्ट’ आहे!’ असं माझ्या बोलण्यात नेहमी येतं. म्हणजे नेमकं काय? यात आपल्या मातीचा अभिमान, प्रादेशिक अस्मिता, तिथले गुणधर्म या सगळ्यापलीकडे जाऊन काहीतरी खास आहे, हे मात्र नक्की! शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या औरंगाबादविषयी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून लिहिलं गेलंय. संत परंपरा, ऐतिहासिक वास्तु, शिक्षण, कला, पुरातत्त्व, शिल्पकला, किल्ले, मंदिरं, मराठवाडा मुक्तिसंग्राम अशा अगणित मिती असलेलं हे शहर. मराठवाडय़ाची राजधानी असलेल्या या शहरानं मला इतकं भरभरून दिलंय, की एक छोटासा कोपरा माझाही आहे- जिथून मी पाहिलेलं हे शहर मला सतत दिसत राहतं.

त्यावेळच्या भवतालाची संगती लावण्याचा प्रयत्न केला तर जेव्हा मी पहिलीत होतो (सन १९६८) त्याच्या दहा वर्ष आधी मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली होती (१९५८ साली). ‘आणीबाणी’चे पडसाद उमटत होते तेव्हा मी सातवीत होतो (१९७५). ‘अंधेरे में एक प्रकाश.. जयप्रकाश, जयप्रकाश!’ अशी घोषणा देत जेव्हा जनता पक्ष निवडून आला तेव्हा मी नववीत होतो (सन १९७७). तर माझ्या आठवी ते दहावीला युक्रांद चळवळ, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, विद्यार्थ्यांचे मोच्रे-निदर्शनं, सामाजिक चळवळींचा जोर असा ‘बॅकड्रॉप’ होता.

एकवीस वर्षे या शहरात मी राहिलो.. १९६६ ते १९८८. अंगुरीबाग, औरंगपुरा, नगारखाना गल्ली, उस्मानपुरा अशा विविध वस्त्यांमध्ये तिथल्या वैशिष्टय़ांसह वाढत राहिलो. आधी फक्त वयानं.. नंतर शिक्षणानं आणि मग बुद्धीनं! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतलं ते जगणं होतं. पण गरिबी, हलाखी या सगळ्याचं भावनिक भांडवल मला कधीच करावंसं वाटत नाही. कारण असं जगणारा मी काही एकटा, जगावेगळा नाही. जगण्याच्या विविध स्तरांवर संघर्ष करणारे लाखो लोक माझ्या अवतीभवती होते आणि आहेत. पण बालपणात, जडणघडणीच्या काळात तुमच्या सभोवती जी विशिष्ट परिस्थिती असते त्यामुळेच तुम्ही आज ‘तसे’ असता. त्या ‘मूशी’त तुम्ही हळूहळू घडता; नाहीतर बिघडताही! इथल्या ‘गल्ली’ संस्कृतीत न राहता जर मी ‘कॉलनी कल्चर’मध्ये राहिलो असतो, उच्च उत्पन्न गटातला असतो, दुसऱ्याच कुठल्या शाळा-कॉलेजात असतो, तर ज्यांनी मला घडवलं ते मित्र, शिक्षक कदाचित मला भेटलेच नसते आणि मी आज आहे तसा नक्कीच नसतो.

वयाच्या तिसऱ्या वर्षी हमदापूर (जि. परभणी, ता. मानवत) ते औरंगाबाद असं माझं पहिलं स्थलांतर झालं. खेडय़ातल्या कोरडवाहू, अनिश्चित शेतीत जर आपलंच काही होऊ शकत नाही तर पुढे मुलाबाळांचं कसं होणार, या प्रश्नाचं उत्तर म्हणून माझ्या आईनं हमदापूर ते औरंगाबाद असं संपूर्ण कुटुंबाचं १९६६ मध्ये स्थलांतर केलं. मुख्य म्हणजे तेव्हा ती स्वत: फक्त २०-२१ वर्षांची होती. आता वाटतं, तेव्हा काय असेल नेमकं तिच्या मनात? कसं ठरवलं असेल हे तिनं? आणि मग लगेच उत्तर मिळतं- हेच तर आपल्या ग्रामीण भागातल्या स्त्रीचं उपजत शहाणपण! आई, वडील, एक काका आणि तीन वर्षांचा मी औरंगाबादमध्ये आलो आणि मोठे उत्तमरावकाका मात्र शेती करण्यासाठी गावातच राहिले.

अगदीच ‘कोरी’ पाटी.. खरं तर ‘फुटकी’ पाटी घेऊन माझं जगण्याचं शिक्षण सुरू केलं ते आईनं. जणू तिनं मला जगाकडे कसं पाहायचं, हेच शिकवलं. प्रचंड पॉझिटिव्हिटी आणि दुर्दम्य आशावाद होता तिच्याजवळ. माणसं जोडण्याची तिची तिची म्हणून एक ‘जादू’ होती. प्रचंड मोठा गोतावळा तिनं जमवला आणि टिकवला. तीन-चार वर्षांच्या मला हाताला धरून गरागरा पायी पायी ती औरंगाबाद फिरायची. तिला चांगल्या वाटणाऱ्या माणसांच्या सहवासात नेऊन मला सतत शहाणपण देण्यासाठी प्रयत्न करायची. वडिलांच्या नोकरीसाठीही तिनंच प्रयत्न केले. समोर येणाऱ्या कष्टांना तिनं अत्यंत खुबीनं हाताळलं. ‘अशक्य’ हा शब्दच तिला ठाऊक नव्हता. प्रचंड ऊर्जा, आत्मविश्वास! तिच्या कष्टांचा प्रवास नुसता आठवला तरी दमायला होतं. आठ बाय दहाच्या वीजही नसणाऱ्या अंधाऱ्या खोल्यांमध्ये आम्ही राहायचो. पण कधीही तिनं मनात निराशेचा अंधार पेरला नाही. उलट, आपल्यासारख्या इतर नातेवाईकांना, मित्रांना सतत तिनं मदतच केली. एक प्रकारची ‘चुंबकीय शक्ती’ होती तिच्या व्यक्तिमत्त्वात. म्हणूनच गरिबी असली तरीही गतायुष्याचा सिनेमा मला कधी ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ दिसत नाही. उलट, छोटय़ा छोटय़ा आनंदाच्या क्षणांनी तो ‘ईस्टमनकलर’च दिसतो! गणित शिकलो तेव्हा लक्षात आलं, की सगळा घरखर्च आई उधारी-उसनवारीवरच करतेय. ऋण काढून सण साजरा करतेय. पण तेव्हाचा तो तिचा ‘तुटीचा अर्थसंकल्प’ ही पुढच्या विकासासाठीची गुंतवणूक होती, हे आता जाणवतं. त्या गरिबीतही माझ्या घरी मित्रांचा, नातेवाईकांचा राबता कधी थांबला नाही. दिवसभर स्टोव्हवरचं चहाचं आधण कधी खाली उतरलं नाही आणि ‘महालक्ष्म्यां’च्या जेवणावळीत सोळा भाज्या, सोळा चटण्यांचा नवेद्य तिनं कधी चुकवला नाही. तिचं माहेरचं नाव उषा. म्हणूनच तिला ओळखणाऱ्या शेकडो जणांच्या तोंडी आजही माझी ओळख ‘उषीचा कांता’ अशीच आहे.

सन १९६८.  घरापासून जवळच असणाऱ्या नगरपालिकेच्या विनयन प्रायमरी स्कूलमध्ये बाळासाहेब काका मला घेऊन गेले. शिक्षकांना म्हणाले, ‘‘याला घ्या दाखल करून शाळेत.’’

शिक्षक : वय किती? जन्मदिनांक?

काका : १५ ऑक्टोबर १९६३.

शिक्षक : अहो, पहिलीत प्रवेश घेण्यासाठी सहा वर्षे पूर्ण पाहिजेत. हा फक्त पाचच वर्षांचा आहे.

काका : मग घ्या साल बदलून. करून टाका ६३ चं ६२!

शिक्षक : बरं. बसवा त्याला वर्गात.

असं झालं माझं अ‍ॅडमिशन! आणि तिथेच मी एका वर्षांनं मोठा झालो! बरं झालं मी शासकीय नोकरीत नाही. अन्यथा माझ्या एका वर्षांच्या पगार-गॅ्रच्युइटीवर गदा आली असती आणि मी वर्षभर आधीच ‘रिटायर’ झालो असतो!

प्राथमिक शाळेत आधी आधी मी तसा एकलकोंडा होतो. मात्र, मागील लेखात सांगितलेल्या भाषणाच्या प्रसंगानंतर मी खुलत गेलो. राजेंद्र बसैय्ये, सय्यद, दिलीप घोडेगावकर या मित्रांबरोबर खूप मौज केली. या वयात एक वेगळीच गंमत घडली. ती म्हणजे मी प्रचंड कीर्तनं ऐकली. चातुर्मास आणि इतर उत्सवांत सुपारी हनुमान मंदिर, नाथ मंदिर, रामेश्वर मंदिर, सावता मंदिर अशा अनेक ठिकाणी मी जायचो. ७५ टक्के श्रोते वानप्रस्थाश्रमातले असताना मी तिथं कसा काय रमलो, हे एक कोडंच आहे. आमच्या शेजारी राहणाऱ्या प्रभामावशीबरोबर सुरुवातीला सोबत म्हणून जाता जाता मलाही त्यात प्रचंड रस निर्माण झाला. आणि मग निजामपूरकर, सिन्नरकर, धोंगडे महाराज अशा अनेक कीर्तनकारांची आख्यानं मी गुंगून जाऊन ऐकली. रामायण-महाभारतातल्या पौराणिक कथा, इतिहासातली चरित्रं, अभंग, पोवाडे, भारुड, गवळणी.. कीर्तनकारांच्या त्या रसपूर्ण पूर्वरंग-उत्तररंगात मी रंगून गेलो अक्षरश:! अभिनयाच्या या एकपात्री परिपूर्ण प्रयोगांनी मला संमोहित केलं. भाषेच्या प्रवाहीपणाचा अनुभव दिला. लय-गतीच्या हिंदोळ्यावरचं ते प्रभावी सादरीकरण आजही माझ्या मनात आणि कानात इतकं दडून बसलंय, की ‘महानिर्वाण’, ‘हयवदन’ वा ‘घाशीराम..’सारखी नाटकं समजून घेताना हेच कीर्तन अचूक उपयोगी पडलं. नाटकातली भाषा ओघवती असावी, या माझ्या आग्रहामागेही हे कीर्तनच असावं.

गणेशोत्सवात ‘मेळे’ सादर होत असत. हजारोंच्या गर्दीसमोर रात्र-रात्र कलाकारांचे वेगवेगळे संच गुलमंडी, राजाबाजार, चौराहा आदी अनेक भागांत प्रचंड ऊर्जेनं मेळ्यांत सहभागी होत असत. फिल्मी गाण्यांच्या चालीवरची नृत्यं, कोरसमधली अनेक गाणी, प्रत्येक मेळ्याची ओळख असलेली धून हे सगळंच एकदम खास होतं. ‘कलाकार’ मेळ्याची तर त्या काळात खास ‘क्रेझ’च होती. मेळ्यातले ते बालकलाकार म्हणजे त्यावेळचे खरे ‘सेलिब्रिटी’! ऑक्टोबर ते जानेवारी औरंगाबादचं आभाळ रंगीबेरंगी पतंगांनी फुललेलं असायचं. आणि होळीला फक्त चेहरेच नाही, तर शहरातल्या तमाम दुकानांच्या पाटय़ा आणि रस्तेही रंगून निघायचे. ‘वॉर्निश’नं रंगलेल्या अनोळखी चेहऱ्यांच्या तोंडून त्या दिवशी ऐकलेल्या खास औरंगाबादी शिव्यांची एकदा ‘डिक्शनरी’च काढायला हवी! या रंगीबेरंगी जगण्यानंच मला नकळत रंगावकाशाची भाषा शिकवली असावी.

मुंबईत जशा चाळी तशा औरंगाबादेत छोटे वाडे आणि गल्ल्या. ज्या वाडय़ात राहायचो तिथं सोनी, दागडिया, वर्मा अशी मारवाडी कुटुंबं होती. शाळेतले गणिताचे महामुनी सरही आमचे शेजारी. त्यांचा प्रचंड धाक होता. यादरम्यान मिळेल ते मराठी-हिंदी पुस्तक वाचण्याचा माझा सपाटा होता. वाडय़ातल्या सोनीभाभींना गुलशन नंदा आणि त्या धर्तीच्या हिंदी कादंबऱ्या वाचायची प्रचंड आवड. त्या एका रात्रीत वाचून मी त्यांना परत द्यायचो. शिवाय ओळखीच्यांकडून मराठी कथा-कादंबऱ्याही आणायचो. तेव्हा ही पुस्तकं, पाहिलेल्या शेकडो हिंदी चित्रपटांतील संवाद हाच माझ्या माहितीचा स्रोत होता. यातूनच मराठी, हिंदी, उर्दू, मारवाडी, गुजराती या भाषा हळूहळू माझा शब्दसंग्रह वाढवीत होत्या.

१९७३-१९७८ ही पाचवी ते दहावीची अत्यंत महत्त्वाची वर्षे मी गुजराथी विद्यामंदिर प्रशालेत होतो. तिथे नाटकाचे प्राथमिक धडे गिरवून घेतले अचलेरकर सरांनी, तर भाषणाची तयारी करून घेतली नामजोशी बाईंनी. टिळक, दीक्षित, मनोहर, चौधरी, भोपे या शिक्षिका आणि बी. एस.  देशपांडे, बोरीकर, सौंदणकर अशा अनेक शिक्षकांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन. माझे वडील याच शाळेत काही काळ शिपाई म्हणून काम करत होते. त्यामुळे सुरुवातीला सगळ्यांचा दृष्टिकोन सहानुभूतीचा होता. मला अभ्यासाकडे वळवण्याचा निकराचा प्रयत्न केला गेला; पण मी काही बधलो नाही. अर्थात मी आता नाटय़-चित्रपट क्षेत्रात असल्याचा सर्वाधिक अभिमान माझ्या शाळेलाच आहे. या शाळेनं माझं संगोपन केलं, कौतुक केलं, भरभरून प्रोत्साहन दिलं. जिवाभावाचे मित्र इथंच भेटले. अभ्यास, खेळ, वक्तृत्व आणि नाटक असा ‘तुडुंब’ भरलेला हा काळ होता. इथंच पहिल्यांदा रंगमंचावर उभा राहिलो. ‘पृथ्वी गोल आहे’, ‘पांडवप्रताप’, ‘सतरा रत्नांचा वग’ अशा काही नाटकांमध्ये राजेश्वर टाकळीकर, राजेंद्र मनमाडकर, रवींद्र अष्टुरे, शहा,  नितीन वैद्य हे मित्र बरोबर होते असं स्वच्छ आठवतं.

परीक्षेच्या हॉलपेक्षा रंगमंचावर मी जास्त खुलतो, हे एव्हाना शाळेत लक्षात यायला लागलं होतं. यातूनच एक किस्सा घडला. तेव्हा बालनाटय़ाची चळवळ जोमात सुरू होती. सूर्यकांत सराफ सरांनी जालन्यात ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’ हे बालनाटय़ स्पर्धेसाठी बसवलं होतं. पण त्यातला एक विद्यार्थी माधव आंबेकर अचानक आजारी पडला आणि नाटक खोळंबलं. अचलेरकर सरांच्या शिफारसीवरून सरांनी चक्क मला औरंगाबादहून जालन्याला बोलावलं. १३-१४ वर्षांचा मी एकटाच रेल्वेनं गेलो. स्टेशनवर घ्यायला कुणीच आलं नाही म्हणून रडकुंडीला आलो. तितक्यात सर आले. सायकलवरून मला डबलसीट घरी घेऊन गेले. पाठांतरासाठी नाटकाची वही हातात ठेवली. दिवसभर ते शाळेत शिकवत होते आणि मी कोपऱ्यात पाठांतर करीत बसलो होतो. संध्याकाळी डायरेक्ट तालमीतच उभं केलं त्यांनी. दुसऱ्या दिवशी औरंगाबादला स्पर्धा.. आणि थेट अभिनयाचं प्रथम पारितोषिक! या ‘ड्रॅमॅटिक’ दीड दिवसानं मला जो आत्मविश्वास दिला तोच मला अजूनही ठायी ठायी उपयोगी पडत असावा.

एकीकडे शाळेत असा रमत होतो आणि दुसरीकडे घरच्या आर्थिक परिस्थितीला जमेल तसा हातभारही लावत होतो. दिवाळीत फटाक्यांच्या दुकानात काम करत होतो, कधी पेपरची लाइन टाकीत होतो, तर कधी रस्त्यावर उभं राहून कॅलेंडर, आकाशकंदील, पंचांगे विकत होतो. आज वाटतं, बरं झालं- जगण्याच्या शाळेतलं हे ‘खरं शिक्षण’ तेव्हा मी घेतलं, कारण पुढे ते रूढार्थानं कोणत्याही अभ्यासक्रमात मला कधीच शिकता आलं नसतं. मात्र, या गरिबीची लाज कधीच वाटली नाही. उलट त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत ठाम उभं राहण्याची शक्ती मिळाली. प्रसंगानुरूप कुठेही सामावून जाण्याची लवचीकता प्राप्त झाली. म्हणूनच आठ बाय दहा फुटांची लेव्हल असो की छोटा पडदा, भव्य नेपथ्य असो की मोठा पडदा, दृश्य आयोजन करताना हे सगळं सांस्कृतिक संचितच मला क्षणोक्षणी उपयोगी पडतं, हे नक्की!

चंद्रकांत कुलकर्णी

chandukul@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 3:07 am

Web Title: theatre director chandrakant kulkarni articles in marathi on unforgettable experience in his life part 2
Next Stories
1 गारूड!
Just Now!
X