16 August 2018

News Flash

आयुष्याला दिशा देणारा टर्निंग पॉइंट

..एव्हाना औरंगाबादमध्ये ‘धडपडणारी मुले’ ही अवस्था आम्ही ओलांडली होती.

..एव्हाना औरंगाबादमध्ये ‘धडपडणारी मुले’ ही अवस्था आम्ही ओलांडली होती. इतर नाटय़संस्थांमधले ‘सीनियर्स’ही आता ‘जिगीषा’त येऊन वेगवेगळ्या नाटकांमध्ये भूमिका करायला आनंदानं तयार होत होते. ‘परिवर्तन’सारखी संस्था तर थोरल्या भावासारखी आमच्या पाठीशी होतीच. शहरातही इतर संस्थांमधल्या भिंती पडत चालल्या होत्या. एक खुलं, सकारात्मक वातावरण तयार होत होतं. आमच्या प्रत्येक नाटकाबद्दल वर्तमानपत्रांतून छापून येत होतं. दरम्यान, ‘स्त्री’ या एकांकिकेला तर स्त्रीमुक्ती संघटनेनं आग्रहाचं निमंत्रण देऊन त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या स्त्रीमुक्ती यात्रेत सामील करून घेतलं होतं. आणि मिरजेला १५ हजार प्रेक्षकांसमोर अविस्मरणीय प्रयोग सादर करण्याची संधीही मिळाली होती. ‘मुलगी झाली हो’ आणि ‘स्त्री’ या एकाच वेळी जन्माला आलेल्या दोन नाटकांमध्ये एक ‘भगिनीभाव’ निर्माण झाला. यानिमित्तानं शारदा साठे, ज्योती म्हापसेकर, छाया दातार यांच्याशी ओळख झाली आणि त्यांचे विचारही ऐकता आले. ‘मदर्स हाऊस’ला राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पारितोषिकंही मिळून झालं होतं. ‘जिगीषा’तले सगळेच एका मत्रीच्या, सहवासाच्या घट्ट  नात्यानं कुटुंबासारखे जोडले गेले होते. एक आवर्तन पूर्ण झालं होतं!

अशी सुरळीत दैनंदिनी सुरू असताना अचानक एके दिवशी प्रशांत म्हणाला, ‘‘चल, जरा कॉलेजकडे चक्कर मारूया..’’ खरं तर आत्ता तिथं काहीच काम नव्हतं. कॉलेज पासआऊट करून आम्हाला दोन वर्षे झाली होती. थोडय़ाच वेळात माझ्या घरी ग्रुपमधली मंडळी भेटणारच होती. आम्ही कॉलेजच्या परिसरात गेलो. मी मोपेड थांबवली. मनात एकच विचार.. त्याला नेमकं काय सांगायचंय? काय म्हणायचंय? आणि प्रशांतनं एक ‘विचार’ बोलून दाखवला.. ‘नाटय़क्षेत्रात पूर्णवेळ काम करायचं ठरवून आपण सगळ्यांनी मुंबईला स्थलांतर केलं तर? आपण गेली काही वर्ष इथं अत्यंत मन लावून, जीव झोकून पद्धतशीरपणानं हेच काम केलंय. पण याच वळणावर जर आपण स्थिरावलो, इथंच थांबलो तर मग मात्र पुढच्या सगळ्या शक्यता आजमावण्याचा विचार नंतर कधीच होणार नाही. पदवी, नोकरी, पगार, स्थर्य, कौटुंबिक जबाबदारी याच चक्रात आपण फिरत राहणार. दिवसभराची नोकरी वेगळीच आणि नंतर फक्त छंद, आवड म्हणून नाटक करत राहणार. हळूहळू ‘साचलेपण’ येत जाईल आणि मग ‘अरे, तेव्हाच आम्ही मुंबई-पुण्याला गेलो असतो ना तर खूप वेगळं काही करून दाखवलं असतं!’ असे किस्से आपण ऐकवत राहणार.’’ हे सगळं मी ऐकत होतो. काय बोलावं ते मात्र काही सुचत नव्हतं. ‘‘तुझा विचार अगदी बरोबर आहे, पण मला घरच्या परिस्थितीमुळे जमेल असं वाटत नाही..’’ हीच माझी त्यावेळची तात्काळ प्रतिक्रिया होती.. जी स्वाभाविकही होती.

असा वेगळा विचार त्याच्या मनात येण्यामागेही एक मोठी पाश्र्वभूमी होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत दर्जेदार काम करणारे अनेक जाणकार रंगकर्मी त्यांच्या उमेदीच्या काळात योग्य वेळीच स्थलांतर करू शकले नव्हते आणि म्हणून त्यांचं रंगकार्यही सर्वदूर पोहोचू शकलं नव्हतं. खरं तर नाटय़क्षेत्रात स्थलांतर करण्याची अशी अपरिहार्यता केवळ ‘नाटककारा’लाच नसते. कारण तो जिथं राहतो तिथं राहूनही तो त्याला सुचलेलं, दिसलेलं, योजलेलं सगळं निर्माण करू शकतो. पण नट, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना मात्र स्वत:ला आजमावण्यासाठी एकदा मोठय़ा प्रवाहात झोकून द्यावं लागतंच. हे प्रशांतचं म्हणणं पटत होतं, पण ‘प्रॅक्टिकल’ वाटत नव्हतं. शिवाय वैयक्तिकरीत्या कुणी असा निर्णय घेऊन पाहणं हे शक्यही होऊ शकतं. पण इथं तर विचार आला होता की- आपण सगळेच मुंबईला जाऊ!

मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी. आमच्यासाठी मात्र ती सांस्कृतिक राजधानी होती. सांस्कृतिक क्षेत्रात पूर्णवेळ काम करण्याची संधी मिळण्याचं सामर्थ्य आणि शक्यता असलेलं शहर. इथे सकाळी अकराच्या प्रयोगालाही प्रेक्षक ‘हाऊसफुल्ल’ गर्दी करतात. आणि प्रायोगिक नाटकांसाठीही मोठमोठी मंडळी आवर्जून छबिलदासचा जिना चढतात. राष्ट्रीय पातळीवरचे नाटय़प्रयोग, चित्रकला प्रदर्शनं, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, व्यावसायिक रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमीवर सातत्यानं काम करणाऱ्या अनेक संस्थांची प्रचंड मोठी ऊर्जा असलेलं हे महानगर. म्हणून तर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा प्रशिक्षित रंगकर्मी असो की चित्रकर्मी, महाराष्ट्रातील नाटय़शास्त्र विभागाचा विद्यार्थी असो की कला महाविद्यालयातला कौशल्यप्राप्त कलावंत, संगीत क्षेत्रातला गायक, वादक असो की संगीतकार, नृत्य क्षेत्रातला असो की तंत्रज्ञानातला- पूर्णवेळ काम करण्यासाठी त्याला इथं मुख्य प्रवाहात येऊन हात-पाय मारावेच लागतात. आपल्याला मनापासून आवडणारं काम हेच आपलं ‘प्रोफेशन’ व्हावं यासाठीची ही धडपड असते. संघर्ष ते संधी या प्रवासातला हा अत्यंत निर्णायक महत्त्वाचा टप्पा असतो.

स्थलांतराचा हा अवघड निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा आम्ही सगळे पंचविशीच्या मागेपुढे होतो. स्थर्य मिळण्याच्या अचूक टप्प्यात होतो. थोडं जरी कुठेही अडखळलो असतो तर एका चाकोरीत, ‘भोवऱ्यात’ नक्कीच अडकणार होतो. आता सगळ्यांसमोर हा विचार मांडला आणि सगळेच गप्प झाले. काही दिवस नाटकातल्या विरामासारखे अत्यंत शांततेत गेले. हळूहळू मात्र सगळेजण याबाबत सकारात्मक विचार करू लागले. या निर्णयामागे मुळात कुठलंही ‘ग्लॅमर’, पसा, प्रसिद्धी अशा खोटय़ा कल्पना नव्हत्या. तकलादू, प्रलोभनं मनात नव्हती. तर मर्यादित काळाचा अवधी प्रत्येकानं स्वत:ला द्यायचा, काम मिळवण्याचा प्रयत्न करायचा, पुढे या क्षेत्रात खरंच काही होत नाही असं दिसलं तर परत यायचं.. असा प्रामाणिक विचार होता हा! ग्रुपमध्ये काही जण पदवीधर होते, कोणी होऊ घातले होते. काहींना नुकत्याच नोकऱ्याही लागल्या होत्या. मुख्य म्हणजे हे सगळं मी १९८७ ते १९९० या काळातलं बोलतोय! जेव्हा खासगी वाहिन्या आलेल्या नव्हत्या. कलाक्षेत्रात पूर्णवेळ करीअर करण्यासाठी आजच्यासारखे मुबलक पर्याय उपलब्ध नव्हते. सिनेमा हा तर तेव्हा दूरचाच पर्याय वाटत होता. फक्त ‘नाटक’च समोर दिसत होतं. मुख्य म्हणजे हे करताना आमच्यापकी कुणाचीही औरंगाबादमध्ये भक्कम स्थावर-जंगम मालमत्ता नव्हती. सगळेच मध्यमवर्गातले. प्रत्येकाकडे उत्तम शैक्षणिक गुणवत्ता मात्र होती. मुंबईत कुणाची ठोस ओळखही नव्हती, ना कुणाच्या शिफारशीची चिठ्ठी. लगेच काम मिळेल याचीही खात्री नव्हती. एकत्रच जाऊ. प्रयत्न करू. नाही जमलं तर बॅग उचलून परत येऊ.. पण नंतर आयुष्यात असं केलं असतं तर..? अशी खंत आणि हळहळ पुढे वाटायला नको म्हणून हे सगळं चाललं होतं. सगळ्यांनी मिळून जाऊ असं वाटण्यामागे मत्रीची भावना होतीच; पण पुढे संघर्षांच्या प्रवासात, सुखदु:खात, यशापयशात एकमेकांना मानसिक आधार असावा असंही वाटत होतं. आशा-निराशेच्या वेळी एकमेकांशी झालेला संवादच तुम्हाला उभारी देऊ शकतो, हे नक्की माहीत होतं. म्हणूनच त्यावेळी ‘जिगीषा’नं केलेलं हे सामूहिक स्थलांतर पुढे सांस्कृतिक क्षेत्रातल्या अनेकांसाठी दिलासा देणारं, प्रेरणा देणारं ठरलं असं अनेकांनी वेळोवेळी सांगितलंय.

..आणि अशा अवघड निर्णयाच्या प्रसंगी सगळ्यात समजूतदार, अनपेक्षित भूमिका घेतली ती आम्हा सर्वाच्या पालकांनी. मध्यमवर्गीय स्तरातल्या आमच्या आई-वडिलांनी ‘‘तुम्ही हे करून पाहा.. काही हरकत नाही!’’ असं म्हटल्यावर मात्र आम्ही थक्कच झालो. बहुधा गेल्या काही वर्षांची आमची नाटकाप्रतीची निष्ठा, शिस्त, धडपड त्यांना दिसत होती. म्हणून ते या निर्णयाला परवानगी देऊ पाहत होते. पालकांचा पाठिंबा हा आम्ही आजवर तिथे केलेल्या कामाला मिळालेला सर्वोत्तम पुरस्कार होता.

त्याचवेळी माझ्या वैयक्तिक आयुष्यात वेगळ्याच घटना घडत होत्या. आईला दुर्धर कॅन्सरनं गाठलं होतं. बहिणीचं लग्न आणि इतर जबाबदाऱ्या पार पाडणं हे माझ्यासाठी जास्त गरजेचं होतं. पण माझी आई शांत, ठाम सुरात म्हणाली, ‘‘जर सगळे जाणार असाल तर मागचा-पुढचा विचार तुम्ही नक्कीच केलेला असणार. फक्त परिस्थितीमुळे आपण आपल्या मनासारखं काम करू शकलो नाही, असं तुला पुढे आयुष्यभर कायम वाटत राहील. तू निश्चिंत मनानं जा. आत्तापर्यंत जसं आपण निभावतोय तसंच पुढेही निभवू. पण आता तुम्ही मागं फिरू नका.’’

पण मनात आलं म्हणून फक्त आवेगापोटी आम्हाला अंधारात तीर मारायचा नव्हता. कारण आर्थिक ओढाताण करून केलेला ‘स्ट्रगल’ अनेकदा तुम्हाला मिळेल ते काम स्वीकारायला भाग पाडू शकतो, ही भीती मनात होती. म्हणूनच आत्तापर्यंतच्या शिक्षणाच्या, अनुभवाच्या आधारावर सुरुवातीला कुठेतरी नोकरी करावी आणि मग आपल्या क्षेत्रात संधीचा शोध घ्यावा असं ठरलं. सर्वात आधी प्रशांत मुंबईत आला आणि ‘लोकसत्ता’ दैनिकात उपसंपादक म्हणून रुजू झाला. पाठोपाठ मी आलो. हा लेख लिहिताना लख्ख आठवलं, की याच महिन्यात १४ मार्च १९८८ रोजी मी ‘मुंबई सकाळ’मध्ये उपसंपादक म्हणून कामाला सुरुवात केली होती. आज बरोब्बर ३० वर्षे झाली या गोष्टीला. अभय जोशी, मिलिंद जोशी यांना अ‍ॅड एजन्सीमध्ये काम मिळालं. मिलिंद सफईनं बँकेच्या मुंबई शाखेत बदलीसाठी अर्ज केला. जितू-पद्माकरला कॉमर्स पदवीच्या आणि कामाच्या अनुभवावर नोकरी मिळाली. तर प्रतिमा लोणकर (जोशी) ही विज्ञानाची पदवीधर होती. तिनं पॅथालॉजी लॅबमध्ये काम सुरू केलं. संगीत नाटक अकादमीच्या तरुण दिग्दर्शकांच्या योजनेत मी ‘दगड का माती’ दिग्दíशत केलं होतं. त्यात भूमिका करण्यासाठी प्रतीक्षा लोणकर मुंबईत आली. पुढे इंजिनीअिरग आणि काही काळ प्राध्यापकी करून आशुतोष भालेराव, समीर पाटील हे तरुण मित्रही मुंबईत दाखल झाले आणि स्थलांतराचं हे वर्तुळ टप्प्याटप्प्यानं दोन-चार वर्षांत पूर्ण झालं. आता पुन्हा सगळ्या गोष्टींना नव्यानं सुरुवात करायची होती.

या लेखमालेच्या सुरुवातीलाच म्हटलं तसं माझ्या आयुष्यात दोन अत्यंत महत्त्वाची ‘स्थलांतरं’ झाली. वयाच्या तिसऱ्या वर्षी- हमदापूर ते औरंगाबाद आणि २५ व्या वर्षी औरंगाबाद ते मुंबई! आणि हे दोन्ही निर्णय घेणारा मी नव्हतोच. दूरदृष्टीची ती दोन माणसं होती : आई आणि प्रशांत. फक्त माझ्या एकटय़ाच्याच नाही, तर संपूर्ण ‘जिगीषा’च्या पुढच्या प्रवासाला या सामूहिक स्थलांतराची भक्कम पाश्र्वभूमी आहे. आम्हा प्रत्येकाच्या वाटचालीतला हा ‘टìनग पॉइंट’! आज मागे वळून बघताना नेहमी वाटत राहतं.. हा ‘टìनग पॉइंट’ आमच्या आयुष्यात आलाच नसता तर..?

– चंद्रकांत कुलकर्णी

chandukul@gmail.com

First Published on March 18, 2018 12:48 am

Web Title: theatre director chandrakant kulkarni articles in marathi on unforgettable experience in his life part 6