शिवाजी मंदिर, प्लाझा आणि रस्ता ओलांडून रसवंतीच्या जिन्यानं खाली उतरलं की छबिलदास- या त्रिकोणाचं मला नेहमी विलक्षण कुतूहल वाटत आलंय. या त्रिकोणाच्या कोणत्या कोनापासून प्रवास सुरू करायचा? कोणत्या दिशेनं पुढे सरकायचं? नेमकं कुठे पोहोचायचं? हे सर्वच रंगकर्मीनी त्या त्या टप्प्यावर ठरवलं. परंतु हे फर्लागभराचं अंतर पार करणं कुणालाही सहज सोपं झालेलं नव्हतं. संघर्ष, संधी आणि यशाची ज्याची त्याची एक निराळीच गोष्ट या प्रवासात लपलीय..

मुंबईत येऊन दाखल होण्याआधी नुकताच १९८८ च्या जानेवारी महिन्यात आमचा ‘पौगंड’चा प्रयोग ‘आविष्कार’च्या पहिल्या अरविंद देशपांडे महोत्सवात सादर झाला होता. प्रयोग खूप रंगला. छबिलदासमधल्या त्या प्रयोगाला नाटय़क्षेत्रातली दिग्गज मंडळी उपस्थित होती. हा प्रयोग पाहून जयवंत दळवींनी खास पत्र पाठवलं आणि राजीव नाईकनं सविस्तर लिखित प्रतिक्रिया दिली होती. दुसऱ्या दिवशी ‘झुलवा’चा प्रयोग पाहायला आमची टीम मुद्दाम मुंबईमध्येच थांबली. यापूर्वी मी मुंबईत यायचो ते शनिवार-रविवारच्या सुट्टीत दोन दिवसांत सहा नाटकं पाहण्यासाठी, तर कधी राज्य नाटय़स्पध्रेचा फॉर्म भरण्यासाठी. एका दिवसासाठी खांद्यावर शबनम अडकवून एसटीनं यायचं, बॉम्बे सेंट्रल बसस्थानकाच्या स्वच्छतागृहातच कपडे बदलून फोर्टला जायचं, सांस्कृतिक संचालनालयात स्पध्रेचा फॉर्म भरायचा आणि विजयी योद्धय़ासारखं पुन्हा औरंगाबादला परतायचं. आख्ख्या मुंबईत तेव्हा माझा नावाला एकही नातेवाईक नव्हता. पण.. आता मात्र मी मुंबईत आलो होतो ते ‘स्ट्रगल’ करण्यासाठी, माझ्या क्षेत्रात पूर्णवेळ झोकून देण्यासाठी!

‘मुंबई सकाळ’ची नोकरी आणि प्रभादेवीतच राहण्याची सोय- या दोन्हींसाठी ज्येष्ठ स्नेही प्रदीप भिडे यांनी आपुलकीनं केलेली मदत आठवली की आजही कृतज्ञता दाटून येते. आत्ता गंमत वाटते की तेव्हा ‘मुंबई सकाळ’मध्ये सहकारी मित्र होते- नितीन वैद्य, चारुहास साटम, अशोक राणे, विशाखा नाईक, प्रवीण टोकेकर, श्रीकांत पाटील, अनिता पाध्ये, सरस्वती कुवळेकर, प्रबोध सावंत, शेखर जोशी.. या सगळ्याच गँगनं त्या अवघड काळात ‘तू कर प्रयत्न. होईल सगळं नीट.’ असा भक्कम दिलासाच दिला. साऱ्यांनाच माझी धडपड दिसत होती, पण हा पुढे पत्रकारितेत रमणार नाहीये, हेही त्यांना पक्कं ठाऊक होतं. आज या सर्व मंडळींचं पत्रकारिता, टेलिव्हिजन आणि अन्य क्षेत्रांत स्वतंत्र असं कर्तृत्व आहे. पण पुढे काय होणार हे आम्हाला कुणालाच माहीत नव्हतं, अशा संघर्षांच्या काळातल्या आठवणींची या मत्रीला भावनिक किनार आहे. दिवाळी अंकाच्या घाईगर्दीत मी गावी जाऊ शकणार नसल्याचं जाणवून माझ्यासाठी घरून मुद्दाम फराळ आणणारे संपादक नार्वेकरसाहेब असोत, की माझ्या नाटय़क्षेत्रातल्या प्रयत्नांना विशेष भावनिक मदत करणारे माझे बॉस नारायण पेडणेकर असोत.. या साऱ्यांनीच तेव्हा मला खूप मानसिक आधार दिला.

तर, दिवसभर नोकरी.. रोज संध्याकाळी छबिलदासच्या अड्डय़ावर जाणं; नव्यानंच ओळखी होत असलेल्या नाटकवाल्यांबरोबर कटिंग चहा आणि तिथला फेमस बटाटावडा खात रमणं, वर जाऊन दुबेजींच्या तालमी, इतर प्रयोग बघणं.. असं नवं ‘रुटीन’ झालं. अधुनमधून शिवाजी मंदिरला जाऊन नाटक बघणं, समोरच्या नित्यानंद, सरस्वतीच्या फुटपाथवर उभ्या असलेल्या कोंडाळ्यामध्ये किस्से ऐकत रेंगाळणं, शेजारीच प्लाझामध्ये कधी एखादा सिनेमा पाहणं, हेही सुरूच होतं. शिवाजी मंदिर, प्लाझा आणि रस्ता ओलांडून रसवंतीच्या जिन्यानं खाली उतरलं की छबिलदास- या ‘त्रिकोणा’चं मला नेहमी विलक्षण कुतूहल वाटत आलंय. या त्रिकोणाच्या कोणत्या कोनापासून प्रवास सुरू करायचा? कोणत्या दिशेनं पुढे सरकायचं? नेमकं कुठे पोहोचायचं? हे सर्वच रंगकर्मीनी त्या त्या टप्प्यावर ठरवलं. परंतु हे फर्लागभराचं अंतर पार करणं कुणालाही सहज सोपं झालेलं नव्हतं. संघर्ष, संधी आणि यशाची ज्याची त्याची एक निराळीच गोष्ट या प्रवासात लपलीय. खरं तर मुंबईच्या प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी माध्यमाचा रंजक आणि रोचक इतिहासच जणू या त्रिकोणात दडून बसलाय.

माझ्या आठवणीनुसार, याच काळात छबिलदासमध्ये आणि इतरत्र ‘अविनाश- एक ध्यास’ (शांता गोखले), ‘अंधारयात्रा’ (गो. पु. देशपांडे), ‘भूमितीचा फार्स’ (शफाअत खान), ‘झुलवा’ (रूपांतर- चेतन दातार), ‘जय जय रघुवीर समर्थ’ (प्रेमानंद गज्वी), ‘चारशे कोटी विसरभोळे’ (मकरंद साठे), ‘मातीच्या गाडय़ाचं प्रकरण’ (राजीव नाईक), ‘मॅकबेथ’ (भाषांतर-अरुण नाईक), आविष्कारचं ‘एक डोह अनोळखी’, ‘आत्मकथा’, ‘कारान’, ‘वाटा पळवाटा’, ‘कोण म्हणतं टक्का दिला?’, इ. नाटकांचे प्रयोग सुरू होते.

प्रायोगिक रंगभूमीवर पं. सत्यदेव दुबे, शफाअत खान, वामन केंद्रे, विजय केंकरे, अजित भगत, अजित भुरे, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम हे दिग्दर्शक कार्यरत होते; तर व्यावसायिक रंगभूमीवर दिलीप कोल्हटकर, पुरुषोत्तम बेर्डे, विनय आपटे, प्रकाश बुद्धिसागर, कुमार सोहोनी, राजन ताम्हाणे, अरुण नलावडे या दिग्दर्शकांची नाटकं गाजत होती. विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, वसंत कानेटकर, रत्नाकर मतकरी ही ज्येष्ठ पिढी अजूनही लिहिती होती. तर प्र. ल. मयेकर, अशोक पाटोळे, शेखर ताम्हाणे यांची नाटकं जोरात सुरू होती. ‘कलावैभव, ‘चंद्रलेखा’, ‘नाटय़संपदा’ या अनुभवी त्रिकुटाबरोबरच ‘सुयोग’, ‘श्री चिंतामणी’, ‘माऊली’, ‘गणरंग’, ‘प्रतिपदा’, ‘अष्टविनायक’, ‘ओमनाटय़गंधा’, ‘अश्वमी’ यांचेही नाटय़प्रयोग सुरूच होते. या सगळ्या माहौलमध्ये आता मला माझी जागा नव्यानं शोधायची होती. आतापर्यंत असणारं ‘जिगीषा’ संस्थेचं भक्कम पाठबळ वजा झाल्यामुळे मला अधांतरी वाटत होतं.

.. आणि मग मी पुन्हा राज्य नाटय़स्पध्रेपासून सुरुवात करण्याचं ठरवलं. या अस्वस्थतेच्या काळात मला प्रचंड मोठा आधार, मनोबळ दिलं ते शरद बागवे, नितीन केणी या मुलुंडच्या मित्रांनी आणि त्यांच्या ‘समिधार’ नाटय़संस्थेनं. त्यांनी विश्वास दाखवला, सगळी यंत्रणा उपलब्ध करून दिली आणि मी त्यावर्षी स्पध्रेत ‘देहधून’ हे नाटक सादर केलं. सॉमरसेट मॉम यांच्या ‘द रेन’ या दीर्घकथेवरचं एक वेगळंच नाटक मला अजित दळवी यांनी लिहून दिलं. यात त्यांनी काव्यमय आणि बायबलमधल्या भाषाशैलीचा उपयोग केला होता. एका अज्ञात बेटावर घडणारी, एक धर्मगुरू आणि वेश्या यांच्यातल्या नतिक आणि तात्त्विक संघर्षांची ती गोष्ट होती. जयंत दिवाण, सुजाता कानगो, अभय जोशी, महेंद्र तेरेदेसाई, सुनील नाईक, संजीव वढावकर, क्षमा बापट, वैशाली तांबे, तेजश्री फाटक, आदी कलाकारांबरोबर केलेल्या मुंबईतल्या या पहिल्या नाटकाच्या तालमी मी कधीच विसरू शकणार नाही. संध्याकाळी बरोब्बर गर्दीच्याच वेळी लोकलच्या लोंढय़ात मुलुंडला जाणं, तिथे ७ ते ११ रिहर्सल, रात्री उशिरा प्रभादेवीला घरी पोहोचणं, पुन्हा सकाळी नोकरी.. असा अत्यंत किचकट दिनक्रम सुरू झाला. नाटकाला पारितोषिकंही मिळाली आणि मिलिंद जोशीनं डिझाइन केलेल्या अप्रतिम एकमजली भव्य नेपथ्यानं नाटकवाल्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं.

अचानक एक दिवस संपादक नार्वेकरसाहेब म्हणाले, ‘‘कुलकर्णी, तुम्ही नाटकवाले नं? मग आज तुम्ही ‘चंद्रलेखा’च्या ‘दीपस्तंभ’ नाटकाच्या प्रयोगाला जा. तिथं मध्यांतरात एक कार्यक्रम आहे. प्रतिकूल परिस्थितीतही दहावीत मेरीटमध्ये आलेल्या मंगेश म्हसकरला संपादक माधव गडकरींच्या हस्ते घराच्या किल्ल्या सुपूर्द करणार आहेत. त्याची बातमी तुम्ही कव्हर करा. जरा नाटकाच्या वातावरणात राहा.’’ मी ‘चंद्रलेखा’च्या बसमधून ठाण्याला गडकरी रंगायतनमध्ये गेलो. मध्यांतरात समारंभ झाला, मी फोनवरून बातमी दिली आणि संध्याकाळी त्याच बसमधून दादरला यायला निघालो. दोनशे प्रयोगानंतरच्या सहज, खेळीमेळीच्या वातावरणात सर्व कलाकार हास्यविनोदात दंग होते, एकमेकांची थट्टा-मस्करी करत प्रयोगानंतरचा शीण घालवत होते. संजय मोने सोडला तर त्यावेळी बसमधला एकही जण माझ्या ओळखीचा नव्हता आणि मी हे सगळं मागच्या सीटवर बसून दूरून बघत होतो. आपण कधी या वातावरणाचा भाग होणार? असं वाटून खूप एकटं वाटायला लागलं. बाहेरची ती अंधारी संध्याकाळ अंगावर उदासीची लाट घेऊन आली. पुढे आपलं कसं होणार? या अनिश्चिततेनं अक्षरश: गलबलून आलं. आयुष्यातली ती संध्याकाळ माझ्या मनात कायमची रुतून बसलीय. कारण पुढच्या दोनच वर्षांत याच ‘चंद्रलेखा’च्या बसवर माझ्याच तीन नाटकांची नावं ठळक अक्षरांत लिहिली जाणार होती आणि १९८८ ते १९९७ या दशकभरात मी ‘चंद्रलेखा’ची १० हून जास्त नाटकं दिग्दर्शित करणार होतो, हे त्याक्षणी मला खरंच माहीत नव्हतं.

मोहन वाघ यांच्या पहिल्या भेटीचीही अशीच एक नाटय़पूर्ण गोष्ट आहे. त्या दिवशी ‘देहधून’चा प्राथमिक फेरीतला प्रयोग होता. मला काय वाटलं कुणास ठाऊक, मी काहीही ओळख नसताना थेट मोहन वाघांना फोन केला, ‘‘पाच मिनिटं तुम्हाला भेटायला येऊ का?’’ ते म्हणाले, ‘‘आत्ता कुठे आहेस?’’ ‘‘प्रभादेवीला,’’ असं सांगताच ते म्हणाले, ‘‘लगेच ये.’’ पुढच्या १५ मिनिटांत मी ‘मकरंद निवास’मध्ये त्यांच्यासमोर बसलेला होतो. ‘मोहन वाघ’ या नावाचं प्रचंड मोठं दडपण, छातीत धडधड, भीती; पण मी अक्षरश: एका दमात त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली : ‘‘मी चंद्रकांत कुलकर्णी. औरंगाबादहून आलोय. नाटय़शास्त्राचा पदवीधर आहे. आत्तापर्यंत वीसेक नाटकं दिग्दर्शित केलीयत. पण आत्ता कुठलंही सर्टिफिकेट, मेडल बरोबर आणलं नाहीये. आज माझ्या नाटकाचा राज्य नाटय़स्पध्रेत दामोदर नाटय़गृह, परळला प्रयोग आहे. माझी मनापासून इच्छा आहे की हा प्रयोग तुम्ही पाहावा. कारण लेखक आपली संहिता वाचायला देऊ शकतो, नट एकटाच काहीतरी सादर करून दाखवू शकतो, पण दिग्दर्शकाचं नाटक प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कुणीच त्याला संधी देऊ शकत नाही. प्लीज, नक्की याल का? नाटक पाहा आणि ठरवा, की तुम्ही मला दिग्दर्शनाची संधी देऊ शकता का?’’

माझ्या किरकोळ देहयष्टीत त्याक्षणी कशाचा आवेग होता माहीत नाही, पण हे सगळं एका दमात बोललो. एक अवघड शांतता पसरली. मी आवंढे गिळत होतो. अचानक मोहनकाका म्हणाले, ‘‘येतो मी प्रयोगाला!’’ हे खूपच आश्चर्यकारक होतं आणि ते खरंच आलेसुद्धा, तेही भक्ती बर्वे-इनामदार आणि अशोक पाटोळेंना बरोबर घेऊन! नाटक पाहून जाताना मला म्हणाले, ‘‘उद्या सकाळी माझ्या घरी ये!’’

दुसऱ्या दिवशीची सकाळ.. त्याच जागी मी पुन्हा त्यांच्यासमोर बसलेलो होतो. मोहनकाका शांतपणे म्हणाले, ‘‘इंडियन एक्स्प्रेसमधली वृत्तपत्र छायाचित्रकाराची नोकरी मला कशी मिळाली माहितीये?’’ मी एकाग्रतेनं ऐकू लागलो. ‘‘मी इंटरवूला गेलो तेव्हा संपादक म्हणाले, फोटोग्राफरचा नुसता इंटरवू घेऊन काय होणार? हा घे ‘फोटोरोल’, आज दिवसभर तुला वाटतील ते फोटो काढ आणि उद्या ते मला दाखव!’’ थोडासा विराम घेऊन मोहनकाका पुढे म्हणाले, ‘‘काल जेव्हा तू भडाभडा बोलत होतास तेव्हा मला हाच प्रसंग आठवत होता. म्हणून मी काल तुझं नाटक पाहायला आलो. आवडलं मला नाटक! पण या ३१ डिसेंबरला शुभारंभ होणाऱ्या माझ्या तीनही नाटकांचं माझं नियोजन झालंय. त्यापकी एका नाटकाला तू दिग्दर्शन साहाय्य करशील? पुढच्या वर्षीच्या ३१ डिसेंबरला मी तुला पहिली संधी देईन! मी शब्दाचा पक्का आहे.’’ त्याचक्षणी मी त्यांना ‘‘हो’’ म्हणालो.

पण बाहेर पडलो आणि विचारचक्र गरागरा फिरायला लागलं.. म्हणजे ही माझी ‘एन्ट्रन्स एक्झाम’ होती तर!.. जे एका अर्थानं बरोबरही होतं.. पण दिग्दर्शक म्हणून आपलं नाव असणार नाही?.. काहीही हरकत नाही; कारण स्वत: मोहनकाका आणि नटांना तर माझी दिग्दर्शनाची पद्धत थेट दिसणारच आहे!

.. आणि मी जीव लावून स्वत:ला तालमींमध्ये झोकून दिलं. नाटक होतं- ‘रमले मी!’  शुभारंभ- ३१ डिसेंबर १९८८. लेखक-

प्र. ल. मयेकर. कलावंत- संजय मोने, जगन्नाथ कांदळगावकर, चारुशीला ओक, जनार्दन सोहोनी.. आणि वंदना गुप्ते!

chandukul@gmail.com