‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ ही नाटककार जयंत पवार लिखित वेगळ्या रूपबंधाची आणि आशयाची दीर्घकथा. अतुल पेठे आणि सहकारी करत असलेला तिच्या अभिवाचनाचा प्रयोग सध्या चर्चेत आहे.
कॉलेज लवकर सुटल्याच्या आनंदात मी धावत पळत घरी यायचं ठरवलं. हा, म्हणजे तसा नाका होता म्हणा टाइम पास करायला; पण आज जरा होमसिक झाल्यासारखं वाटत होतं. बाहेरच्या उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. पाण्याच्या बाटलीमधलं पाणीसुद्धा अगदी गरम झालं होतं. ट्रेनमध्ये एकदाची उडी टाकली. दुपारची वेळ होती त्यामुळे छान खिडकीकडची जागा मिळाली. ट्रेन सुरू झाली तोच वाऱ्याची एक छानशी झुळूक कपाळावरच्या घामाला स्पर्श करून गेली. त्या एवढय़ाशा वाऱ्यामुळे काना बाजूचे केस कानात गेले आणि अंगावर शहारा आला. भानावर आले तेव्हा कळलं पोटात कावळे भरपूर जागा मिळाल्याने घरटी घालतायत आणि काहीच सामान मिळत नाही म्हणून कोकलतायत. त्यांना मनात म्हटलं ‘बेटय़ांनो बाहेर या. पोटात कसं बांधाल घरटं?’ त्यांनी बाहेर येण्यासाठी पोटात काहीतरी जायला हवं होतं. काहीतरी बावळट विचार मी करत होते हे मला जाणवलं. तेवढय़ात ट्रेनमधल्या स्पीकरवर एका मसाल्याची जाहिरात वाजायला लागली. त्यातल्या पदार्थाची नावं ऐकून भुकेला आणखीन चेव चढला आणि मेंदूला काय खावं याचं खाद्य मिळालं. सगळे पदार्थ डोळ्यासमोर आणून झाले. पदार्थ संपले तेव्हा मी नशिबाने घरी पोचले होते. घरात तुपाचा घमघमाट सुटला होता.वा! रव्याची खीर आणि तीसुद्धा जेवायला. क्या बात! दिन बन गया. मला आमच्या कॉलेजला कधी नव्हे तो लाख लाख धन्यवाद द्यावेसे वाटले. असो.
मी खीर प्लेटमध्ये ओतली आणि पंख्याखाली ठेवून दिली कारण मला त्यावर साय यायला हवी होती. ती थंड होताना मला कोल्हा आणि कारकोच्याची गोष्ट आठवली आणि क्षणभर दोघांची ही दया आली. पुढच्याच क्षणी मला माझ्या आजीची प्रकर्षांने आठवण झाली. माझा लहान भाऊ आणि मी आम्ही दोघं खीर खायला बसलो की ती नेहमी आम्हाला ‘बुड बुड घागरी’ ची गोष्ट सांगायची. आम्ही कितीही वेळा खीर खावो प्रत्येक वेळेला आम्ही तीच गोष्ट सांगायला सांगायचो आणि तीही न थकता त्याच हावभावांसकट आम्हाला गोष्ट सांगायची. तेव्हा आम्हाला टीव्हीची जराही आठवण यायची नाही. म्हणजे तिच्या गोष्टीमधून प्रत्येक पात्र डोळ्यासमोर उभं राहायचं. प्रत्येक वेळेस एक नवीन मांजर, नवीन माकड भेटायचं आणि त्या उत्साहाच्या भरात खीर कधी संपायची हे कळायचंसुद्धा नाही.
‘अभिवाचन’ ही कल्पनाही कुणाला तरी अशीच सुचली असावी नाही? म्हणजे टीव्ही वगैरे यायच्या पूर्वीसुद्धा आकाशवाणीवर कथाकथनाचे कार्यक्रम व्हायचेच. आपली भारतीय संस्कृतीच पूर्ण मौखिक परंपरेवरच आधारलेली आहे म्हणा. लिहिलेल्या गोष्टी जतन करण्याचं एक प्रभावी माध्यम.
तर अभिवाचनाची कला हा एक वाचिक अभिनयाचाच प्रकार. अभिनय हा शब्द ‘अभि+ नी-नय’ या धातूपासून आलाय. नी-नय म्हणजे नेणे आणि अभि म्हणजे प्रामुख्याने. प्रामुख्याने रसाच्या परिपोषाकडे नेणे म्हणजे अभिनय करणे असाही शब्दाचा अर्थ होऊ शकतो. जशी कुठलीही गोष्ट वाचल्यावर रसनिष्पत्ती होते तसंच कुठली गोष्ट ऐकल्यावरही रसनिष्पत्ती होऊच शकते म्हणजे थोडक्यात जेव्हा अपघाताची बातमी वाचतो तेव्हा आणि कुणाकडून ती ऐकतो तेव्हा, दोन्ही वेळेला आपल्याला दु:ख होतंच; पण जर एखादा तो प्रसंग रंगवून सांगत असेल तर आपले डोळे पाणावतात आणि मग तो वाचिक अभिनय होतो. आंगिक अभिनयाबरोबरच या वाचिक अभिनयाचंसुद्धा बीज आपल्या मातीत रोवलं गेलं. आता टीव्ही, कॉम्प्युटर्स, सोशल नेटवर्किं ग साइट्स अशा काही साधनांमुळे आपल्यातलाच संवाद खुंटलेला आहे तिथे मौखिक परंपरेची काय कथा? म्हणजे मला आईने व. पु. काळे, शं. ना. नवरे, पु. ल. देशपांडे यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम रंगवून रंगवून सांगितलेले आठवतात. तिच्या सांगण्यावरून प्रेक्षागृह प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं असायचं हे नक्की कळलं. म्हणजे यांनी जसं शहरी भागांवर आपलं स्थान वठवलेलं होतं तसंच शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार यांनीही दोघांनी एकत्र कथाकथनाचे कार्यक्रम करून महाराष्ट्र गाजवला होता.
असाच आजही एक अभिवाचनाचा कार्यक्रम रंगतोय. तो म्हणजे नाटककार आणि साहित्य अकादमी विजेते कथाकार जयंत पवार यांची ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ या वेगळ्या रूपबंधाच्या आणि आशयाच्या दीर्घकथेचा. या कथेच्या अभिवाचनाचा एक अभिनव प्रयोग प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे गेले काही महिने महाराष्ट्रभर करत आहेत. पेठे यांच्या या वैशिष्टय़पूर्ण प्रयोगालाही सर्वत्र जाणकारांकडून दाद मिळाली आहे. पेठेंनी या अभिवाचनाचे प्रयोग आजवर पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, गडिहग्लज, रत्नागिरी, बेळगाव येथे केले आहेत.
याच संदर्भात त्यांच्याशी बोलण्याचा योग आला. त्यांना स्वत:ला आवाज, शब्द, शब्दांची फेक, साहित्य, वाचन, नाटक यांची मनापासून ओढ आहे. पुण्यात ‘आसक्त’ या नाटक कंपनीअंतर्गत होणाऱ्या िरगण प्रकल्पात त्यांनी जयंत पवारांची ही कथा पहिल्यांदा वाचली. लहानपणापासूनच त्यांच्यावर वाचिक अभिनयाचे संस्कार होत होते. त्याला त्यांच्या मेहनतीची आणि अनुभवाची जोड मिळाली आणि या कथेच्या प्रयोगामध्ये त्यांनी या सगळ्याची एकत्रितरीत्या सांगड घातली.
या कथेत एकूण १२ पात्रं आहेत. या सगळ्या पात्रांना वेगळा आवाज, वेगळा बोलण्याचा बाज, वेगवेगळी उच्चाराची पद्धती द्यावी, असा त्यांनी विचार केला आणि तो प्रयोग करून पाहिला. अर्थातच तो यशस्वी झाला आणि प्रेक्षकांनी उचलूनही धरला. प्रेक्षकांना आकर्षून घेणाऱ्या यात बऱ्याच गोष्टी आहेत. एक म्हणजे लेखकांची लिहिण्याची पद्धत. अतुल पेठे म्हणतातही कथा बाकीच्या कथांपेक्षा फार वेगळी कथा आहे. मुळात ती रहस्यकथा आहे आणि त्याचबरोबर अनेक पातळ्यांवर ही कथा एकाच वेळी फिरते. रहस्यकथेचाच बाज घेऊन लेखकांनी या कथेतून सद्य सामाजिक स्थितीचं दर्शन घडवलेलं आहे. या सोबतच त्यांनी या कथनाला प्रकाशयोजनेची जोड दिली. प्रदीप वैद्य हे प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळतात. आणखीन एक प्रयोग म्हणजे स्वत: अतुल पेठे, नरेंद्र भिडे आणि संजय देशपांडे यांनी मिळून याला संगीताचा साज चढवला. कुमार गोखले यांनी या कथेसाठी अक्षर सुलेखनाचं काम केलं तसंच तुषार गुंजाळ यांनी या कथेसाठी काही चित्रांच्या पाटय़ाही तयार केल्या ज्या योग्य वेळी कथानकानुरूप दाखवल्या जातात. हे सगळं मिळून एक वेगळाच अनुभव ही कथा आपल्याला देऊन जाते. म्हणजे कथेचं वाचनच चाललेलं असतं; पण ती घडताना आपण अनुभवू शकतो. अभिवाचन असलं तरी त्यातलं नाटय़ हा एकपात्री प्रयोग तर नाही ना असा क्षणभर विचार करायला भाग पाडतं. हा प्रयोग म्हणजे बदलत्या काळाचा योग्य वापर आहे असं मला वाटतं. कथा जिवंत करणं, तिला जगवणं म्हणजे काय हे या प्रयोगातून कळून चुकतं. आपण फक्त एखादी गोष्ट संपुष्टात येते आहे असे दावे करतो पण त्यासाठी प्रयत्न करायला कुठे तरी कमी पडतो. हा कार्यक्रम म्हणजे वाचिक अभिनय जिवंत ठेवण्याची, अभिवाचनातलं नाटक जागृत करण्यासाठीची नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही.
या अभिवाचनाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग मुंबईत १ एप्रिल २०१६ रोजी रात्री ८ वाजता यशवंत नाटय़ मंदिर, यशवंत नाटय़संकुल, मनमाला टँक, माहीम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. इथे वाचलेलं सगळं तुम्हाला अनुभवायला मिळेल यात काही शंकाच नाही.
मी रव्याची खीर काही घेऊन येऊ शकत नाही पण मनात खूप जागा घेऊन येणारे कारण प्रयोग संपल्यानंतर जे काही मी घेऊन जाईन त्याला काही जीबी (ॅइ) सुद्धा पुरणार नाहीत. चला मग, तुम्ही काय घेऊन येणार याचा विचार करा. आपण भेटूच थेट कार्यक्रमात!
response.lokprabha@expressindia.com