19 February 2020

News Flash

आदर्शवादी कुटुंबाची गोष्ट

घरातील खेळीमेळीचे वातावरण म्हणजे नेमके काय याचा प्रत्यय हे नाटक पाहताना येतो.

‘मुक्तायन’ प्रस्तुत आणि ‘वेद प्रॉडक्शन्स’ निर्मित ‘या गोजिरवाण्या घरात’ हे नाटक म्हणजे एका नव्याने जन्माला येणाऱ्या सुखी कुटुंबाची कहाणी आहे.

प्रत्येकाच्या स्वप्नात एक आदर्शवादी घर असतं. ज्या घरात सगळं सुखात चाललेलं असतं, कुठल्याही प्रकारची टेन्शन्स नसतात, कुठलाही ताण नसतो, भांडण नसतं आणि दुरावा तर अजिबात नसतो? अशा प्रकारच्या घराच्या शोधात सामान्य माणूस नेहमीच असतो, पण ते घर स्वप्नातच राहतं. मग माणूस ते बाह्य़ जगात शोधायला लागतो. रंगभूमी ही एक अशी जननी आहे जी सामान्य माणसाला क्षणात राजा, रंक, विदूषक, प्राणी, पक्षी अशा हजारो रूपांनी सजवू शकते. आणि या जननीनेच एका आदर्शवादी सुखी कुटुंबाला जन्म दिला तर? ‘मुक्तायन’ प्रस्तुत आणि वेद प्रॉडक्शन्सनिर्मित ‘या गोजिरवाण्या घरात’ हे नाटक म्हणजे अशाच एका सुखी कुटुंबाची कहाणी आहे.

‘या गोजिरवाण्या घरात’ हे नाटक एका आदर्शवादी कुटुंबाचं उत्तम उदाहरण आहे. घरातील खेळीमेळीचे वातावरण म्हणजे नेमके काय याचा प्रत्यय हे नाटक पाहताना येतो. कदाचित अनेक जणांना हे नाटक पाहताना आपल्याच घरातील नाटय़ चालू असण्याचा अनुभव येण्याची शक्यता आहे. कारण नाटक नात्यांमधल्या खुलेपणाला हळुवारपणे स्पर्श करतं. जग कितीही पुढारलं तरी घरच्या माणसांशिवाय पर्याय नाही. घरची माणसं म्हणजे आधारस्तंभ असतात आणि अडचणीच्या-संघर्षांच्या काळात ती कशी खंबीरपणे पाठीशी उभे राहून जगण्याला सकारात्मकतेचा दृष्टिकोन देतात असा सुख-दु:खाच्या पाठशिवणीचा खेळ नाटकाच्या आशयातून व्यक्त होतो.

नाटकाचं कथानक हे बऱ्याच अंशी रोजच्या जगण्यातलं वाटत असलं तरी एका विशिष्ट वेळी ते पटकन पकड घेऊन कथारूढ होतं. एक त्रिकोणी कुटुंब खेळीमेळीच्या वातावरणात सुखात नांदत असतं. त्या कुटुंबाच्या एकमेकांबद्दलच्या प्रेमाला पूर आलेला असतो असं म्हणायला हरकत नाही. त्यातही कुटुंबातील दोन व्यक्तिरेखा या व्यवसायाने कलाकार दाखवल्याने त्यांच्या रोजच्या जगण्यातही कलाकृती डोकावत असते. अशा वेळी एक अनपेक्षित घटना घडून कुटुंबावर आघात होतो. पण त्या आघाताने खचून न जाता दुर्बळ झालेल्या मनांना उभारी देण्याचं काम हे कुटुंब एकत्रच एकमेकांच्या सहाय्याने करतं आणि आलेल्या संकटावर मात करत कसं पूर्ववत होऊन जगण्याला नवी सुरुवात करतं याची रंजक गोष्ट म्हणजे ‘या गोजिरवाण्या घरात’ हे नाटक.

नाटकाचं नाव पाहता प्रेक्षक साधं हलकंफुलकं काहीतरी पाहायला मिळेल अशा अपेक्षेने नाटय़गृहाकडे वळतो. त्याचा हा समज काही अंशी पूर्णही होतो. नाटकाला सुरुवात होताच रंगमंचावरील नेपथ्य नाटकाला अर्धी लढाई जिंकून देतं. एका कलाकाराचं घर कसं असू शकतं याचं हुबेहूब चित्रण नेपथ्यकार सुमित पाटील यांनी केलंय. नेमकी रंगसंगती, अचूक स्थापत्य रचना आणि जागोजागी प्रकर्षांने जाणूनबुजून मांडलेले आर्ट पिसेस प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतात. सासूची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठारे यांनी उत्तम अभिनय केला असून एका वेगळ्या सासूचं दर्शन त्यांनी घडवून आणलंय. भारतीय मानसिकता ही सासूच्या भूमिकेत एककल्ली आणि ठाम असते. पण या नाटकाने त्या भूमिकेला छेद देत नात्याला नवा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. भक्कम आधार देणारी, सुनेला न छळता सतत प्रेम करणारी, मायाळू आणि गोड सासू साकारण्यात सुप्रिया पाठारे यांना यश आलंय. त्यात व्यक्तिरेखेला विनोदी स्वभावाची उपजत झालर आणि विनोदाचं अचूक टायमिंग याने हे पात्र अधिक बहरलंय. मिहीर ही नवऱ्याची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या साईंकित कामत यानेही भूमिका चोख निभावली आहे. त्याचा आजवरचा लोकप्रिय अभिनेत्याचा प्रवास पाहता त्याच्या छापील भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी त्याला या नाटकाची मदत होईल असं वाटतं. विनोदी भूमिका साकारताना प्रेमळ नवरा आणि लाडका मुलगा अशी तारेवरची कसरत त्याच्या अंगच्या चपळतेमुळे त्याला अधिक उपयोगास आली आहे, पण त्याच वेळेस समजून घेणारा आणि पाठिंबा देणारा गंभीर पण खंबीर नवरा त्याने छान साकारला आहे. मुख्य भूमिका साकारणाऱ्या शर्वरी अर्थात अदिती द्रविड हिने सुनेची भूमिका साकारताना घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. तिने पहिल्या अंकात बायको आणि सुनेची भूमिका उत्तम साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलंच, पण त्याचसोबत एक आघात झाल्यावर ती भूमिका साकारताना तिने त्यावर विशेष मेहनत घेतलेली दिसते. या कठीण भूमिकेत ती यशस्वीही झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. ते कठीण काम लीलया पेलून ती प्रेक्षकांची पसंती मिळवते.

नाटकात संगीताचा सुयोग्य वापर झालेला दिसतो. कुठेही संगीत येऊन आदळत नाही किंवा अति झालंय असं वाटत नाही. नाटकात नृत्यं मात्र फार झाली आहेत असं जाणवतं. आनंदाच्या प्रसंगी माणसं नाचतात, पण इतकं साचेबद्ध नाचत नाहीत आणि एकसारखी तर मुळीच नाहीत. ते नृत्य प्रेमळ करण्याच्या नादात ते अंमळ अधिकच प्रेमळ झाल्याचं जाणवतं. त्यामुळे नृत्याचा वापर एका मर्यादेनंतर अनावश्यक वाटतो.

प्रकाशयोजना उत्तम झाली असून तंत्राच्या बाबतीत नाटक उत्तम झाल्याची पावती मिळते. नाटकाचे संवाद आणि लेखन सुंदर झाले असून त्यातून हवा तो संदेश सोप्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचवण्यास लेखक मानस लयाळ याना यश आलंय. दिग्दर्शक अंकुर काकतकर यांनी ही छान क्लृप्त्या वापरत नाटकाला जिवंतपणा दिलाय. काही प्रसंगाच्या सादरीकरणातून दिग्दर्शक कलात्मकतेने डोकावतो. नाटकाचा पहिला अंक फारच हलकाफुलका झाल्याचं एका क्षणानंतर जाणवतं, कारण त्यातून पहिल्या अंकाअंती प्रेक्षकांच्या हाती काहीच लागत नाही. दुसरा अंक मात्र प्रेक्षकांचं मन जिंकून घेतो.

‘या गोजिरवाण्या घरात’ हे नाटक आदर्शवादी कुटुंबाची व्याख्या नाटक रूपाने आपल्यासमोर मांडतं. ते संघर्षमय जीवनाचं समीकरण विनोदी सूत्राने सोडवण्यास मदत करेल, यात शंका नाही.

नाटक  : या गोजिरवाण्या घरात

लेखक  : मानस लयाळ

दिग्दर्शक : अंकुर काकतकर

संगीत : साई, पीयूष

नेपथ्य : सुमित पाटील

प्रकाशयोजना : राहुल जोगळेकर

कलाकार :

नवरा : साईंकित कामत   बायको : अदिती द्रविड

सासू /आई : सुप्रिया पाठारे

सौरभ नाईक – response.lokprabha@expressindia.com

First Published on January 13, 2017 1:01 am

Web Title: ya gojirvanya gharat
Next Stories
1 ‘गुराख्याचे महाकाव्य’ सातासमुद्रापार
2 एका तिकीटात चार नाटकं
3 अभिवाचनातील नाटय़
Just Now!
X