महाराष्ट्र राज्य माध्यमिक महामंडळाच्या शालांत अर्थात दहावीच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात होत आहे. उरण तालुक्यातील एन.आय., यूईएस, आवरे, फुंडे व चिरनेर या पाच परीक्षा केंद्रांतून २ हजार ३४८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेची पूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती उरणच्या शिक्षण विभागाने दिली आहे.
उरण तालुक्यातील एकूण २५ माध्यमिक शाळांसाठी पाच परीक्षा केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. यात उरण शहरात एन.आय.यूईएस व फुंडे अशी तीन तर उरण पूर्व विभागासाठी चिरनेर व आवरे अशी दोन परीक्षा केंद्रे आहेत. यामध्ये एन. आय. केंद्रांतून ५००, यूईएसमधून ४५३, आवरेमधून ३०४, फुंडे केंद्रातून ८४३ व चिरनेर केंद्रातून २४८ विद्यार्थी परीक्षेला बसणार असल्याची माहिती उरण पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी प्रियांका पाटील यांनी दिली आहे. यावेळी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.