वर्षभरात शेकडो घरफोडय़ा
२०१५ हे वर्ष चोरांसाठी ‘चांगले’ गेले असून पनवेल तालुक्यात तब्बल पावणेदोनशे घरफोडय़ा झाल्या आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजे ४५ घरफोडय़ा या खारघरमध्ये झाल्या आहेत. त्यानंतर खांदेश्वर वसाहतीमध्ये ३३ तर पनवेल व कामोठेमध्ये प्रत्येकी सुमारे ३० घरफोडय़ांचे प्रकार घडले आहेत.
कामोठे वसाहतीमधील सेक्टर २१ येथील शुभआर्केड या इमारतीमध्ये बुधवारी तीन घरफोडय़ा झाल्या. अरुण आमले यांच्या घरातील १ लाख वीस हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. रखवालदार असताना कुंपणावरून उडय़ा मारून तीन चोरांनी इमारतीत शिरून ही चोरी केली. पनवेल शहर, खांदेश्वर, खारघर, कामोठे येथील चोरटय़ांच्या टोळ्या वेगवेगळ्या असल्याचे सीसीटीव्हीमधील चित्रीकरणामधून पोलिसांच्या ध्यानात आले आहे.
दिवाळीच्या सुटय़ांनंतर पनवेलमधील चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून ते आजपर्यंत कायम आहे. पनवेल शहरात तीन दिवसांपूर्वी एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या घरी झालेल्या चोरीत त्यांचे दागिने चोरीला गेले. या चोरांवर पोलिसांचा वचक नसल्याचे दिसत असून हे चोर सापडतही नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.