नवी मुंबई : बेलापूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. येथील १०० दुकानांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. तर नेरुळ, वाशीमध्येही रात्री रस्ते पाण्याखाली गेले होते. बुधवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती.

बेलापूर सेक्टर ४,५,६ परिसरातील दुकानांमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी शिरले होते. सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.  दुकानांचे ३५ ते ४० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज नवी मुंबई व्यापारी महासंघाचे महासचिव प्रमोद जोशी यांनी व्यक्तकेला आहे. बेलापूर विभागातील दुकानदारांचे नुकसान झाले असून याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

नवी मुंबईतील मिनी मंत्रालय असलेल्या कोकणभवन परिसर नेहमीप्रमाणे जलमय झाला होता. बेलापूर डेपोमध्येही मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. पावासामुळे वाहत्या पाण्यात गटारावरील झाकणेही वाहून गेली. पालिकेचे जुने मुख्यालय ते विहार परिसरातही मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. बुधवारी दुपारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला होता.

नेरुळमध्ये मोठा पाऊस झाला. विविध ठिकाणी पाणी साचले होते. करावे भागातील सखल भाग, करावे भुयारी मार्ग, शिरवणे भुयारी मार्ग, सानपाडा गाव भुयारी मार्ग तसेच शहरातील विविध ठिकाणच्या सखल भागांत पाणी तुंबले होते. नेरुळमधील काही सोसायटय़ांमध्येही पाणी साचले होते. आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्काळ पाण्याचा निचरा करण्यात आला.  महाापलिकेचे आपत्कालीन कर्मचारी, अग्निशमन विभाग यांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले होते. घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी शहरातील विवध ठिकाणांची पाहणी केली.

दरवर्षी नुकसान.. जगायचे कसे?

बेलापूर सेक्टर ६ येथे इलेक्ट्रिकचे दुकान आहे.  चार फुटांपेक्षा जास्त पाणी भरले होते. १० लाखांपेक्षा अधिक साहित्याचे नुकसान झाले आहे. नेहमीच पावसाळ्यात पाणी शिरते. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. येथील १०० पेक्षा जास्त दुकानांचे नुकसान झाले असल्याचे दुकानदार बाबुलाल जैन यांनी सांगितले.

उरणमधील रस्ते जलमय

मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उरण परिसरातील रस्त्यावर दोन ते तीन फुटांचे पाणी साचलेले होते. यामध्ये उरण शहरातही अनेक ठिकाणच्या रस्त्यावर हेच चित्र होते. त्यामुळे  वाहतूक कोंडी झाली होती. उरणमधील कुंभारवाडा, ग्रामीण रुग्णालय, नवघर ते जेएनपीटी परिसर येथेही पाणी तुंबले होते. उरणमध्ये रात्रभर १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

बुधवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर होता. त्यामुळे पाण्याचा निचरा न होता अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेले होते. नेहमीप्रमाणे उरण-पनवेल मार्गावरील जेएनपीटी कामगार वसाहत ते नवघर दरम्यान मोठय़ा प्रमाणात पाणी साचलेले होते. दोन ते तीन फूट पाण्यातून वाहतूक सुरू होती. तर काही ठिकाणी वाहतूक बंद होती. शहरातील कुंभारवाडा, बोरी, मोरा मार्गावरही पाणी तुंबले होते. पावसामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.