News Flash

गणेशमूर्ती घडविणाऱ्या ‘दारावे’ला १०० वर्षांची परंपरा

दारावे गावात भोईर व नाईक कुटुंबात वंशपरंपरेने गणेशमूर्ती घडविण्याचा व्यवसाय केला जातो.

ganesh festival
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

वडिलोपार्जित व्यवसायात चौथ्या पिढीचाही सहभाग

महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाचे आगमन लवकरच होणार आहे. यानिमित्ताने आकर्षक, देखण्या व सुबक मूर्ती घडवणारे गाव म्हणून नवी मुंबईतील दारावे गावाचा नावलौकिक आजतागायत कायम आहे. कारण गेल्या शंभर वर्षांपूर्वीपासून गणेशमूर्ती घडविण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय येथे सुरू असून ही कला जोपासण्याचे काम येथील चौथी पिढीही करत आहे.

ठाणे बेलापूरपट्टय़ामधील दारावे गावात भोईर व नाईक कुटुंबात वंशपरंपरेने गणेशमूर्ती घडविण्याचा व्यवसाय केला जातो. वडिलोपार्जित परंपरेने आलेली कला आत्ताची चौथी पिढीही आवडीने जोपासत असून या गावातील मूर्तिकार जनार्धन नाईक यांचे आजोबा विठू आशा नाईक यांनी सर्वप्रथम मूर्ती घडविण्याचे काम सुरू केले. त्यानंतर कृष्णा नाईक व मूर्तिकार अनंत भोईर यांनीदेखील हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीच्या काळात हे मूर्तिकार फक्त मातीच्याच मूर्ती घडवीत असे. त्यामुळे बेलापूर पट्टय़ात सर्वात प्रथम गणेशमूर्ती घडवणारे गाव म्हणूनदेखील दारावे गाव प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्यपूर्वकाळापासून या तीनही कुंटुंबातील सदस्य या व्यवसायात असून आता त्यांची चौथी पिढीही यात आवडीने सहभागी होत आहे.

गावातील सर्वात पहिले मूर्तिकार असलेले विठू आशा नाईक यांना धनाजी नाईक, भिकू नाईक, दिनकर नाईक, विराजी नाईक ही चार मुले होती. त्यातील भिकू नाईक हे मूर्ती बनवायचे. त्यानंतर त्यांचा मुलगा जनार्दन नाईक व आता त्यांचा मुलगा शैलेश व चुलत भावंडे ही वयाच्या २० वर्षांतच गणेशमूर्ती घडवतात. विठू नाईक यांची चौथी पिढी दारावेतील सायली कला केंद्रामध्ये मूर्ती घडवत आहेत.

त्याचप्रमाणे कृष्णा नाईक यांची तिसरी पिढी रामनाथ नाईक व अनंत नाईकदेखील मूर्ती घडविण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय जोपासत आहेत. त्यांचे श्री गणेश कला केंद्र आहे. त्याचप्रमाणे आकर्षक व देखण्या मूर्तीसाठी सुप्रसिद्ध असलेले अनंत भोईर यांचे दिलीप, विलास, हृदयनाथ व प्रवीण भोईर ही चारही मुले एकत्रित मूर्ती बनविण्याचे काम करतात. त्यातील प्रवीण भोईर याने ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून शिल्प कलेचे शिक्षण घेतले आहे. ते ‘अनंत कला केंद्र’ या माध्यमातून मूर्ती साकारण्याचे काम करत असून यंदाचे त्याचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.

मूर्तीना विदेशातही मागणी

पेणमधून तयार मूर्ती आणून कला केंद्र चालवणारे अनेक व्यवसायिक निर्माण झाले आहेत, परंतु या गावातील तीनही कुटुंब स्वत: विविध आकाराचे साचे बनवून गावातच मूर्ती घडवतात. त्याच्या कला केंद्रात मूर्ती बनवण्याचे काम बारमाही सुरू असते. त्यापैकी काहीजण आठशे, तर काहीजण बाराशे मूर्तीदेखील बनवतात. गणपतींच्या मूर्तीबरोबरच देवीच्या मूर्तीही घडविण्याचे कामदेखील केले जाते. शिवाय या कला केंद्रातील मूर्तीना विदेशातही मागणी आहे.

शंभराहून अधिक वर्षे मूर्ती घडविण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. विशेष म्हणजे या कामात आमच्या कुटुंबातील उच्च शिक्षित चौथी पिढी देखील सहभागी असते.

-जनार्दन नाईक, मूर्तिकार, ‘सायली कला केंद्र’, दारावे.

दारावे गावात वर्षांनुवर्षे मूर्ती घडविण्याचे काम सुरू असून बेलापूर पट्टय़ात सर्वात प्रथम दारावेतच मूर्ती बनविल्या जायच्या. तीच परंपरा आम्ही आजतागायत जोपासत आहोत.

-रामनाथ व अनंत नाईक, ‘श्री गणेश कला केंद्र’, दारावे

मूर्ती बनविण्याची कला वडिलांना बघूनच शिकलो आहे. यंदाचे आमचे पन्नासावे वर्ष असल्याने विशेष आनंद असून संपूर्ण कुंटुंब एकत्रितपणे मूर्ती घडविण्याच्या कामात सहभागी होतो.

– दिलीप भोईर, मूर्तिकार, ‘अनंत कला भवन’, दारावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 1:42 am

Web Title: 100 years old tradition of making ganesh idol in darave village in navi mumbai
टॅग : Ganesh Idol
Next Stories
1 स्वातंत्र्याचा जयघोष, तिरंग्याला मानवंदना..
2 स्वातंत्र्यदिन जुन्याच गणवेशात
3 ‘नैना’चा दुसरा विकास आराखडा मंजूर
Just Now!
X