उपाशी मरण्यापेक्षा गावी शेतात काम करू; कामगारांच्या व्यथा

नवी मुंबई</strong> : २१ दिवसाच्या टाळेबंदीनंतर तरी गावाकडे जाता येईल या आशेवर बसलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांमधील अस्वस्थता वाढत असून त्यांनी कोसो दूर असलेल्या गावाकडचा प्रवास आता पायी सुरू केला आहे. नवी मुंबईत अशा १०३ कामगारांना ताब्यात घेत महापालिका प्रशासनाने त्यांची व्यवस्था शहरातील विविध ठिकाणच्या निवारा केंद्रात केली आहे.  हे सर्व कामगार २० ते ५५ या वयोगटातील असून फळबाजारात मजुरी करणारे आहेत.

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २५ मार्च ते १४ एप्रिल अशी २१ दिवसांची टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अडकलेल्या या असंघटित क्षेत्रातील कामगारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला. रोजंदारीवर काम करणाऱ्या या कामगारांना हाताला काम नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिवसभर मजुरी वा मिळेल ते काम करून हे मजूर आपला उदरनिर्वाह करीत असतात. मात्र सर्वच बंद असल्याने त्यांच्या हाताला काम नाही. जवळ असलेले पैसैही संपत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे. २१ दिवस वाट पाहिल्यानंतर तरी काहीतरी गावी जाण्याची व्यवस्था होईल अशी आशा या कामगारांना होती. मात्र टाळेबंदी वाढविण्यात आल्याने त्यांच्यातील ही अस्वस्थता वाढली आणि या कामगारानी आता पायी गावाकडे जाण्याचा निर्धार करीत प्रवास सुरू केला आहे.

फळबाजारात रोजंदारीवर काम करणाऱ्या सुमारे  १०३ कामगारांना असाच पायी प्रवास सुरू केला होता. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या सर्व कामगारांना अडवून त्यांची समजूत काढली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी कोरोना फैलाव थांबवा असे वाटत असेल तर काही दिवस आपण सर्वानी आहे त्या ठिकाणीच थांबले पाहिजे. तुम्हाला कुठलीही समस्या येणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असा विश्वास निर्माण केला. त्यानंतर या सर्वाची घणसोली, वाशी आणि ऐरोली येथील निवारा केंद्रात रवानगी केली.

पंकज गुप्ता या कामगाराने सांगितले की, एपीएमसी सुरू झाली तरी गाडय़ांची आवक कमी असल्याने काम मिळेल की नाही हे सांगता येत नाही. ही सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्यास अनेक महिने लागणार असल्याने आम्ही गावी निघालो होतो, तर राम मिश्रा या कामगाराने येथे हाताला काही काम नाही. उपाशी मरण्यापेक्षा गावी शेतात काम करून किमान जगू तरी अशी व्यथा मांडली.

उत्तरप्रदेशमधील विविध गावी हे कामगार जाणार होते. रस्त्यात मिळेल ते वाहन पकडत पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगत निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

-नितीन गीते,वरिष्ठ पोलीस निरीक्षक