पालिकेची स्वंतत्र यंत्रणा; वाशी रुग्णालयात उपचार सुविधा

नवी मुंबई : करोनाबाधित रुग्णांना सामोरे जावे लागणाऱ्या म्युकरमायकोसिस या बुरशी जन्य आजाराचा सामना करावा लागत असून नवी मुंबईत १६ रुग्ण या आजाराचे असल्याचे आढळून आले असून यातील एका रुग्णांचा जबडा कापण्याची वेळ आली आहे.

या नवीन संकटाचा सामना करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने एक प्रश्नावली तयार केली असून रुग्णालयात उपचार घेऊन घरी गेलेल्या करोनाबाधित रुग्णांना ही प्रश्नांवली विचारण्यास गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. या आजारावरील उपचाराचा खर्च हा सर्वाधिक असून तो पालिकेने कसा सोसावा या चिंतेत प्रशासन आहे. म्युकरमायकोसिस आजारात डोळे, कान, नाक, चेहरा, जबडा बाधित होत आहे.

नवी मुंबईत करोना रुग्ण संख्या कमी होत असल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडलेला असतानाच आता म्युकरमायकोसिस या आजाराने डोके वर काढले आहे. गेल्या वर्षी या आजाराचे काही रुग्ण आढळून आले होते, पण त्यांची संख्या अतिशय नगण्य होती. करोना रुग्णाचे उत्परिवर्तन मोठय़ा प्रमाणात होत असल्याने या म्युकरमायकोसिस या बुरशी जन्य आजाराचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. नवी मुंबईतील पाच खासजी रुग्णालयता १६ रुग्ण हे म्युकरमायकोसिसचे आढळून आले आहेत. त्यातील पाच रुग्ण हे शहराबाहेरील असण्याची शक्यता वर्तवली जात असून ११ रुग्ण हे नवी मुंंबईतील आहेत.

करोना होऊन गेलेल्या रुग्णांना स्टेरॉईड देण्यात आल्याने या रुग्णांना हा बुरशी जन्य आजार होत असून यामुळे कान, नाक, डोळा, चेहऱ्याचा काही भाग कापण्याची वेळ येत आहे. तेरणा रुग्णालयात अशा एका रुग्णाचा जबडा कापावा लागला आहे.

मधुमेह असलेल्या रुग्णांच्या सारखेची पातळी या आजाराने नेहमीपेक्षा जास्त वाढत असून ही म्युकरमायकोसिस चेहऱ्यावर दिसून येत आहे.

पालिकेने शहरातील अशा रुग्णालयीन उपचार व स्टेरॉईड घेतलेल्या रुग्ण्णांची एका प्रश्नांवली द्वारे विचारपूस केली जात असून म्युकरची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यास सांगितले जात आहे. त्यासाठी पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात एक स्वंतत्र कक्ष सुरू करण्यात येणार असून प्राथमिक तपासणी ऐरोली व नेरुळ या सार्वजनिक रुग्णालयात देखील केली जाणार आहे. या आजारावरील खर्च हा नऊ ते दहा लाखाच्या घरात खासगी रुग्णालयात होऊ शकणार आहे. पालिका काही डॉक्टरांना त्यासाठी आमंत्रित करून रुग्णांवर उपचार उपलब्ध करून देणार आहे.

करोनामुक्त नागरिकांशी संपर्क

* करोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. ती केव्हाही वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका उपाययोजना करीत असून तिसऱ्या लाटेची देखील तयारी करण्यात आली आहे.

* अशा वेळी या म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळून आले असून पालिका व खासगी रुग्णालयात पंधरापेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत.

* पालिकेने करोनातून बऱ्या झालेल्या नागरिकांची विचारपूस एका प्रश्नावलीने सुरू केली आहे. त्यासाठी एक स्वंतत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे, असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.