दिल्ली येथील ‘मरकज’मधून पनवेलमध्ये ११ जण आले असून त्यातील आठ जणांना बुधवारी  पुढील तपासणीसाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले.

निजामुद्दीन ‘मरकज’मधून आलेले काहीजण पनवेल परिसरातील खारघर, कळंबोली आणि पनवेल शहर परिसरात राहत होते. बुधवारी ११ जणांपैकी आठ जणांचा शोध घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आरोग्य विभागाने त्यांची प्राथमिक तपासणी केली. पनवेल शहराचा पत्ता दिलेल्यांपैकी एक जण अन्य जिल्ह्य़ात राहत असल्याने पोलिसांनी तेथील  पोलिसांना  कळविले आहे.

सध्या पोलीस या सर्व प्रवाशांचा शोध घेत आहेत. अद्याप तीन जणांचा शोध घेण्याचे काम पालिका प्रशासन, महसूल आणि पोलीस संयुक्तपणे करत असल्याचे समजते.

घरकुल सोसायटीला सुरक्षा कवच

खारघर येथील घरकुल गृहनिर्माण सोसायटीतील एका इमारतीमधील नागरिकांचे पूर्णपणे विलगीकरण केले असून घरकुल सोसायटी परिसर मंगळवारपासून सुरक्षा यंत्रणेच्या देखरेखीखाली आहे. घरकुल सोसायटीमधील ज्या सोसायटीमध्ये संशयित रुग्ण सापडले तेथे नोटीस देत नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. फवारणीसह इतर उपाययोजना तातडीने करण्यात आल्या.