जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के विकसित भूखंडासाठी फुंडे गावाजवळ १११ हेक्टर जमीन आरक्षित करण्यात आलेली होती. ती सीआरझेड- २ मध्ये मोडत असल्याने पर्यायी जागा मिळावी, अशी मागणी सर्व पक्षीय संघर्ष समितीने केली होती. यासाठी दास्तान ते रांजणपाडा दरम्यान राज्य महामार्गाला लागून असलेल्या जमिनीची मागणी प्रकल्पग्रस्त समितीने जेएनपीटी अध्यक्षांकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार बुधवारी जेएनपीटी प्रशासनाने साडेबारा टक्केसाठीचा १११ हेक्टरचा भूखंड याच जमिनीवर देण्यात येणार असल्याचे लेखी पत्र समितीला दिले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडाचा प्रश्न सुटला आहे. आता त्याचे वाटप कधी होणार याकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या भूखंडाबाबत शंका व्यक्त केली जात होती, दरम्यान प्रकल्पग्रस्तांनी पर्यायी मागणी केलेल्या जमिनीवर भरावाचे काम सुरू करण्यात आलेले होते. हा भराव सेझसाठी होत असल्याने प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्केसाठी भूखंड मिळणार का, अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्याशी सर्वपक्षीय समितीच्या झालेल्या बैठकीत दास्तान-रांजणपाडा दरम्यानच्या जमिनीची मागणी करणारे लेखी पत्र देण्यात आलेले होते. मात्र त्याचे उत्तर न आल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये अस्वस्थता होती. या संदर्भात समितीचे निमंत्रक अतुल पाटील व सदस्य सुरेश पाटील यांनी जेएनपीटी अध्यक्षांची भेट घेतली. दास्तान ते रांजणपाडा दरम्यानची जमीन साडेबारा टक्केसाठीच असल्याचे पत्र देण्याची विनंती केलीहोती.