दिवाळीच्या अगोदरपासून शहरात करोना रुग्णांत हळूहळू घट होत गेल्याने करोना उपचारासाठी व अलगीकरणासाठी पालिकेने शहरातील सर्व विभागांत उभारलेली १२ काळजी केंद्र टप्प्याटप्प्याने बंद केली आहेत. वाशी येथील पालिका रुग्णालयही सामान्य केले असून आता वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात उपचार होणार आहेत. तर अत्यवस्थ रुग्णांसाठी डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे.

नवीन रुग्ण संख्या शंभरच्या आत गेल्या काही दिवसांपाून स्थिरावल्याने १३ करोना काळजी केंद्रापैकी ९ केंद्रे पालिकेने अगोदरच बंद केली होती. आता उरलेल्या चारपैकी तीन केंद्रांत नव्याने प्रवेश बंद केला असून एकाच ठिकाणी उपचार केंद्रित केला आहे.

मागील ९ महिन्यांपासून शहरात करोनाचा कहर सुरू आहे. मंगळवापर्यंत शहरातील करोनाबाधितांची संख्या  ५०,६०६  इतकी झाली असून मृतांचा आकडा १०४२ इतका झाला आहे. तर ४८,५६३ जण करोनामुक्त झाले आहेत.

करोनाचे दिवसाला दोनशे ते तीनशे रुग्ण शहरात सापडत होते. दिवाळीपूर्वी ही परिस्थिती नियंत्रणात येत दिवसाला नव्या रुग्णांची संख्या शंभरच्या घरात आली होती. त्यामुळे मोठा दिलासा मिळत करोनासाठी उपचार यंत्रणांची गरज कमी होत गेली. त्यामुळे काही केंद्रांमध्ये एकही रुग्ण शिल्लक न राहिल्याने ती बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्या परिसरातील नव्याने सापडलेल्या रुग्णांना सुरू असलेल्या केंद्रात उपचार सुरू ठेवले. मात्र दिवाळीत झालेली गदी व करोना नियमांचे पालन न झाल्याने पुन्हा शहरात  करोना रुग्ण वाढू लागले. त्यामुळे बंद केलेली काळजी केंद्र सुरू करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. मात्र पुन्हा ही परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली. त्यामुळे अगोदर ९ काळजी केंद्रे बंद केली होती व चारच ठिकाणी उपचार सुरू होते. मात्र गेले काही दिवस उर्वरित चार केंद्रांपैकी तीन केंद्रांत एकही करोना रुग्ण न राहिल्याने आता तीही बंद करण्यात आली आहेत. आतापर्यंत वाशी सेक्टर १४, वारकरी भवन बेलापूर, सीबीडी सेक्टर ३, आगरी कोळी भवन, सेक्टर ९ नेरुळ, सावली सेक्टर ५ नेरुळ, समाजमंदिर सेक्टर ५ ऐरोली, ईटीसी केंद्र वाशी, बहुउद्देशीय केंद्र ५ कोपरखैरणे तसेच इंडिया बुल तसेच लेवा पाटीदार समाज, निर्यातभवन व राधास्वामी सत्संगभवन येथील केंद्र बंद करण्यात आली आहेत. आता फक्त सिडको येथील प्रदर्शनी केंद्रात उभारलेल्या काळजी केंद्र व रुग्णालयात उपचार सुरू ठेवले असून डॉ.डी. वाय. पाटील रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होणार आहेत. घटती करोनाची संख्या ही शहरासाठी मोठा दिलासा आहे.

करोना रुग्णस्थिती

* आजचे नवे रुग्ण :    ६३

* आजचे करोनामुक्त :  ६५

* आजचे करोनामृत्यू  : ०२

* उपचाराधीन रुग्ण :    १००२

* करोनामुक्तीचे प्रमाण :    ९६ टक्के

* करोनामुळे एकूण मृत्यू :   १०४२

* एकूण करोनाबाधित :  ५०,६०६

* एकूण करोनामुक्त :   ४८,५६३

शहरातील करोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटत असल्याने आता फक्त वाशी येथील प्रदर्शनी केंद्रात उपचार सुरू आहेत. इतर सर्व करोना काळजी केंद्र तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहेत. अत्यवस्थ रुग्णांसाठी डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयात करोनावर उपचार करण्यात येत आहेत.

-संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त