दोन वर्षांत उरण तालुक्याला नापिकीचा फटका
उरण तालुक्यातील खोपटे, मोठीजुई, पिरकोन, वशेणी, पुनाडे या गावांतील खार जमिनींचे बांध फुटल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी भातशेतीत शिरले आहे. त्यामुळे येथील १२०० एकरहून अधिक जमीन खाऱ्या पाण्याखाली आली आहे. तर या बांधाशेजारील मिठागारातील मिठाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षे उरण तालुक्यातील शेकडो एकर जमीन नापिक होणार आहे. याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसणार आहे. तर येथील शेतकऱ्यांचा जोडव्यवसाय असलेल्या मिठागरांचेही या भरतीमुळे मोठे नुकसान झालेले आहे. मात्र असे असले तरी खारलँड विभाग हे बांध खासगी असून त्यावर शासकीय निधी खर्च करता येत नसल्याची कारणे देत आहे.
खाडीकिनाऱ्यावरील भातशेतीला समुद्राच्या भरतीचे आवाहन असल्याने शेतकऱ्यांनी कष्टाने आपल्या शेतीचे समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण करणारी यंत्रणा राबविली होती. मात्र येथील जमिनी विविध कारणांसाठी शासनाकडून संपादित केली जात असल्याने शेतीच्या संरक्षणाची ही पारंपरिक पद्धत बंद झाली आहे. त्यातील अनेक बांध हे खारलँड विभागाकडून दुरुस्त केले जात आहेत. यासाठी मागील पाच वर्षांत चार कोटींपेक्षा अधिक खर्चही करण्यात आलेला असला तरी बांध फुटण्याच्या घटनांत वाढच झालेली आहे.
सहा महिन्यांपूर्वी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता हे उरणमध्ये आले असता, त्यांनी या भागाची पाहणी करून बांधबंदिस्तीसाठी आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन येथील शेतकऱ्यांना दिलेले होते. तर बांधपाडा हे खासदारांनी दत्तक घेतलेले गाव असतानाही या गावातील शेती नापिकी होत असल्याची खंत माजी सरपंच अविनाश ठाकूर यांनी व्यक्त केली.
त्यानंतर अनेकदा येथील बांध फुटल्याने शेती पाण्याखाली आलेली आहे. तर खारलँड विभागाच्या पेण विभागाचे उपअभियंता सुनील देवरे यांच्याशी संपर्क साधला असता या परिसरातील अनेक बांध हे खासगी आहेत. त्यामुळे त्या बांधाच्या मजबुतीसाठी शासनाला खर्च करता येत नाही. त्यामुळे ते फुटत असल्याने हे बांध शासनाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया आमच्या विभागाने सुरू केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
त्याच प्रमाणे खोपटे बांधपाडा परिसरातील मिठागरांमुळेही या शेतीत पाणी शिरत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगून या परिसरात खारलँडकडून उघाडय़ांची कामे करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली.