खाडीक्षेत्रात जलनियंत्रक भिंत; नाल्यांचेही बांधकाम

संतोष सावंत, लोकसत्ता

पनवेल : शहर महापालिका क्षेत्राला मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पनवेलचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अशी वेळ पनवेलकरांवर पुन्हा येऊ नये यासाठी पालिका आयुक्तांनी सुरक्षित पनवेलचा विकास आराखडा तयार केला आहे. यासाठी सुमारे १२५ कोटी रुपये पालिका खर्च करण्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

पनवेल शहरातील बंदर रोड, टपाल नाका, पटेल मोहल्ला यासोबत पालिका क्षेत्रातील ४५ विविध ठिकाणे अतिवृष्टीमुळे जलमय झाली होती. शहराला पुरापासून वाचविण्यासाठी मागील वर्षी १९ ऑगस्टला झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपने याबाबत ठराव मांडल्यानंतर सभागृहाने त्याला मान्यता दिली होती.

मागील वर्षी २२ जुलै ते ३ ऑगस्ट या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीत पनवेल महापालिका क्षेत्राचे कोटय़वधींचे नुकसान झाले होते. लोकवस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. अतिवृष्टीमध्ये पाणी शहराबाहेर कसे काढावे, खाडीक्षेत्रातील पाणी नियंत्रण भिंतीने कसे थांबवावे, याचे नियोजन करण्यात न आल्याने तसेच शहरातील गटारे स्वच्छ केली नसल्याचा आरोप नागरिकांकडून व विरोधी सदस्यांकडून केला गेला.

यावर पालिकेच्या स्थापत्य विभागातील अभियंत्यांनी विविध पर्याय सुचविले होते. भाजपची सत्ता पनवेल पालिकेत असल्याने सत्ताधारी सदस्यांना नागरिकांचा रोष सहन करावा लागला होता. मात्र अतिवृष्टीमध्येच झालेल्या सर्वसाधारण सभेत पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी यापुढे ही अवस्था पनवेल शहर व पालिका क्षेत्रात होणार नाही यासाठी सदस्यांना त्यांच्या परिस्थितीतील पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पर्याय विचारले होते. याच बैठकीत सदस्यांनी सुचविल्यानंतर पावसाळ्यात पाणी भरणारी ४५ ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेने ‘यश इंजिनीअरिंग’ या कंपनीला याबाबतचा अहवाल बनविण्याचे काम दिले.

दोन वर्षांचा कालावधी

पनवेल पालिकेने हा आराखडा बनविला असला तरी यामध्ये सीआरझेड, कांदळवने असणाऱ्या ठिकाणी काम करण्यासाठी केंद्र व इतर प्राधिकरणांची रीतसर परवानगी लागणार आहे. पालिकेला परवानग्यांचे शिवधनुष्य पेलावे लागेल. परवानगीनंतर कामे करण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. मात्र परवानग्यांपूर्वी सभागृहातील सदस्यांसमोर मंजुरीसाठी हा आराखडा ठेवण्यात येईल.

पावसाळ्यात पनवेल शहरावर अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून पालिकेने ठोस उपाययोजनांवर भर दिला आहे.

-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका