पोलिसांना न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा; सहा लाख खर्चाची तरतूद

गेली १३ वर्षे कळंबोलीतील भंगारात सापडलेल्या जिवंत स्फोटकांची ‘सुरक्षा’ नवी मुंबई पोलिसांकडे आहे. या स्फोटकांची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्रीय गृहविभागाच्या सुरक्षा विभागाने दोनदा पाहणी केली असून न्यायालयाच्या आदेशाने ती लवकरच नष्ट केली जातील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली. स्फोटके नष्ट करण्यासाठी पोलिसांनी सहा लाखांच्या खर्चाची तरतूद केली आहे.

पनवेल व उरण तालुक्यांच्या वेशीवरील गावांत निर्जन स्थळी एका गोदामात ही स्फोटके ठेवण्यात आली आहेत. या गोदामाला पोलिसांचा सध्या कडक पहारा आहे. या स्फोटकांच्या सुरक्षेसाठी आजवर ६० ते ७० लाखांचा खर्च पोलीस खात्याला करावा लागला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे या स्फोटकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणे कठीण जात आहे.

२००४ साली ऑक्टोबर महिन्यात इराक येथून उरण येथील जेएनपीटी बंदरामध्ये २५ कंटेनर आले होते. त्यापैकी १३ कंटेनरमध्ये स्फोटके होती. भंगाराच्या नावावर युद्धात वापरलेली ही स्फोटके भारतात आणण्यात आली. उत्तर प्रदेशला त्यापैकी १३ कंटेनर पाठविण्यात आले तर एक कंटेनर कळंबोलीमधील लोखंड बाजारातील मनोजकुमार सोहनलाल शर्मा यांच्या गोदाम क्रमांक ५९९ मध्ये पाठविण्यात आला. त्यामध्ये कळंबोली पोलिसांना एक टन जिवंत व भंगारातील स्फोटके सापडली. रॉकेट, हॅण्डग्रेनेड, बॉम्ब, गनबुलेट, रॉकेटचे लोखंडी पार्ट, बुलेटहेड, सिलेंडर असे एकूण ९४१ नग या भंगारवाल्याच्या गोदामात सापडले. याप्रकरणी मनोजकुमार शर्मासोबत अन्थोनी स्वामी, मोहम्मद इकबाल कादरी, दीपक अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली. २००४ ते २००५ पर्यंत ही स्फोटके कळंबोली पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली होती. परंतु एनएसजीचे पथक या स्फोटकांची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर ही स्फोटके जिवंत असून ही स्फोटके नष्ट होईपर्यंत लोकवस्तीपासून दूर ठेवण्याची सूचना या पथकाने नवी मुंबई पोलिसांना केली.

गोण्यांची जमवाजमव

स्फोटक परिसराच्या सुमारे पाच किलोमीटरच्या परिसरात वास्तव्यास बंदी आहे. जिल्हाधिकारी पदावरील व्यक्तीच्या देखरेखखाली साठा नष्ट केला जाईल. याआधी इतक्या मोठय़ा प्रमाणावर स्फोटकांचा साठा नष्ट करण्यात आला नव्हता. नियोजित केलेल्या साहित्यामध्ये शेकडो वाळूच्या गोण्यांची जमवाजमव करण्यात आली आहे.