मुंबईच्या दक्षिण समुद्रकिनाऱ्यावर मेरीटाईम बोर्डाकडून सुरू करण्यात येणाऱ्या जलवाहतुकीचा एक भाग असणाऱ्या नेरुळ येथील जेट्टीवर सिडको १३० कोटी रुपये खर्च करणार आहे. येत्या सोमवारी त्याची निविदा काढली जाणार आहे. नेरुळ येथील डीपीएस स्कूलच्या मागील बाजूस ही जेट्टी बनवली जाणार असून तिकीट घर आणि प्रवेशद्वाराचा या जेट्टीत समावेश आहे.
मुंबई व नवी मुंबईला जोडल्या जाणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर जलवाहतुकीचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. काही वर्षांपूर्वी सिडकोने वाशी व सीबीडी येथे खासगी हॉवरक्राफ्टला मंजुरी दिली होती. परंतु हे सेवा बंद पडली. त्यानंतर या मार्गावरील जलवाहतुकीचा पर्याय बंद झाला होता. राज्य मेरीटाईम बोर्डाने मुंबई- नवी मुंबईला जोडणाऱ्या सागरी वाहतुकीचा पर्याय खुला केला असून मुंबई पोर्ट ट्रस्ट भाऊचा धक्का येथे जेट्टी बांधत आहे, तर मेरीटाईम बोर्डाकडून मांडवा येथे जेट्टी उभारली जाणार आहे. त्यामुळे मुंबई, अलीबाग, नवी मुंबई अशी ही जलवाहतूक प्रवाशांच्या दृष्टीने सोयीस्कर होणार आहे. राज्य शासनाच्या आदेशाने सिडकोने नेरुळ येथे बांधण्यात येणाऱ्या जेट्टीचा विकास आराखडा तयार केला असून सोमवारी या कामाची निविदा काढली जाणार आहे. यावर सिडको १३० कोटी रुपये खर्च करणार असून हे काम दीड वर्षांत पूर्ण होणार आहे. सिडकोच्या सहकार्याने सुरू झालेल्या हॉवरक्रॉप्टला एपीएमसीतील व्यापारी तसेच शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांमुळे चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे नवी मुंबई व मुंबईदरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना हा मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईला रस्तामार्गे जाण्यासाठी एक ते दोन तास लागत असल्याने हा वेळ वाचणार असून केवळ २२ ते २५ मिनिटांत मुंबई गाठता येणार आहे. रस्ते विकास महामंडळाकडून उत्तर बाजूस जलवाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. त्याअगोदर मेरीटाईम बोर्डाने नवी मुंबई मुंबईला जोडणारी वाहतूक सुरू करण्यास प्राधान्य दिले आहे.

वाशी रेल्वे स्थानक ते कोपरखैरणे मार्गावर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून रोप वेच्या प्रस्तावाला सिडकोने मान्यता दिली असून टाटा रिअ‍ॅलिटीतर्फे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. टाटापेक्षा कमी दराने हा प्रकल्प इतर संस्था उभारणार असल्यास (स्विस चॅलेन्जद्वारे) त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी स्पष्ट केले.