टाळेबंदीनंतर कार्यालयात हजर असलेल्या १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना करोना लागण

नवी मुंबई : टाळेबंदीचे काही नियम जून महिन्यात शिथिल केल्यानंतर सिडकोच्या दहा टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणे बंधनकारक केल्यानंतर १५ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लागण झाली आहे. यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दहा टक्के कर्मचारी संख्येला परवानगी दिली असताना ५० टक्के कर्मचारी अधिकारी सिडको कार्यालयात हजेरी लावत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतराचा पुरता फज्जा उडाल्याने आता ही संख्या रोडावली आहे.

सिडको हे शासकीय असले तरी अत्यावश्यक सेवेत समाविष्ट नव्हते. त्यामुळे मुंबई,  ठाण्यात कोविड काळजी केंद्र  उभारण्यासाठी अभियंता विभागातील काही अभियंता वगळता सिडकोचे सर्व अधिकारी-कर्मचारी टाळेबंदीच्या चारही टप्प्यांत घरी होते. पाचव्या टप्यात शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात राहण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

यात कार्यालयातील ही संख्या १० ते १५ टक्के कर्मचारी अशी मर्यादा ठेवण्यात आली होती. जूनमध्ये शिथिल केल्यानंतर या टाळेबंदीत सिडकोतील प्रत्येक विभागाने कर्मचारी संख्येनुसार दहा टक्केचे गणित मांडून कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्यास  सांगितल्याने कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढून १९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. यात वाहक असलेला एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

बाधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सर्व कुटुंब बाधित

झाल्याने कार्यालयातील संख्या रोडावली आहे. सिडको मुंबईतील मुलुंड येथे कोविड रुग्णालय उभारण्यासाठी पुढाकार घेत असेल तर नवी मुंबई, पनवेल आणि उरणसाठीही अशी सुविधा उभारण्याची मागणी केली जात आहे.

सिडको कर्मचारी पालिका रुग्णालयात

सिडकोने शासनाच्या आदेशाने मुलुंड आणि ठाण्यात कोविड रुग्णालये उभारली आहेत. त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले आहेत, मात्र सिडको ज्या भूमीवर श्रीमंत झाली त्या नवी मुंबई, पनवेल आणि उरणमध्ये अद्याप एकही रुग्णालय उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे नवी मुंबई आणि पनवेल पालिका हद्दीतील नागरिक नाराज आहेत. सिडकोच्या कर्मचाऱ्याला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. सिडकोने अशा प्रकारे एखादे रुग्णालय उभारल्यास किमान कर्मचारी अधिकाऱ्यांची सोय होईल, असे संघटनेचे सचिव जे. टी. पाटील यांनी सांगितले.

पुढे निवडणुका आहेत..

राज्याचे अनेक मंत्री सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळता यावे यासाठी दूरचित्रसंवादाद्वारे अधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहेत. करोनाकाल संपुष्टात आल्यानंतर पालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेतत. त्यामुळे शहरातील वातावरण कसे अनुकुल राहिल याची काळजी प्रत्येक पक्ष घेत आहे.

नियमांची पायमल्ली

बेलापूर येथील पालिकेच्या मुख्यालयात आतापर्यंत अनेक अधिकारी व कर्मचारी करोना बाधित झालेले आहेत. यात काही उच्च अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सामाजिक अंतराची पर्वा न करता कार्यकर्त्यांत मिसळणारे हे स्थानिक नेते सर्व फौजफाटा घेऊन पालिका मुख्यालयात जात आहेत. यात प्रसारमाध्यमांशी अथवा अधिकाऱ्यांशी संवाद साधताना हे नेते सामाजिक अंतर, मुखपट्टी, यांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे.