भाडेकरूविना मालक हवालदिल

नवी मुंबई : टाळेबंदीनंतर भाडेकरूंनी खाली केलेल्या घरांना आता भाडेकरू मिळेनासे झाले आहेत.  नवी मुंबई, पनवेल आणि उरण या महामुंबई क्षेत्रात सुमारे १५ हजार ५७७ घरे पडून आहेत. करोनापूर्वी असलेल्या भाडय़ात मालकांनी २५ ते ३० टक्के  कपात केल्यानंतरही भाडेकरू मिळत नाहीत.

नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात माहिती तंत्रज्ञान कंपन्या असल्याने अनेक नोकरदार हे भाडय़ाच्या

घरांना पसंती देत असल्याचे

दिसून आले आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात दोन लाख लोकसंख्या ही बदलणारी (फ्लोटिंग) आहे. असे असतानाही आता ही घरे रिकामी आहेत.

मागील काही वर्षांत मध्य व रेल्वे मार्गापेक्षा मुंबईच्या हार्बर मार्गावर मोठय़ा प्रमाणात घरांची निर्मिती होत असून यातील बहुतांशी घरे ही गुंतवणूक म्हणून खरेदी केलेली आहेत. सर्व हप्ते भरल्यानंतर विकासकांकडून ताबा घेण्यात आलेली ही घरे भाडय़ाने दिली जात असल्याने नवी मुंबई, पनवेल, खारघर या भागांतील रिकाम्या घरांना मोठी मागणी आहे. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, सानपाडा, जुईनगर, नेरुळ, बेलापूर, खारघर, कळंबोली, कामोठे या सिडकोच्या १४ विभागांमधील या घरांना पंसती असून ग्रामीण भागात झालेल्या बेकायदा इमारतीतील खोल्यादेखील मोठय़ा प्रमाणात भाडय़ाने दिल्या जात आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने टाळेबंदी केल्यानंतर पहिले दोन ते तीन महिने भाडेकरूंनी घरात राहून घरांचे भाडे मालकांना वेळेवर देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर शिथिल झालेल्या टाळेबंदीत अनेक नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्याने तसेच रोजगार असलेल्यांच्या पगारात कपात झाल्याने अनेकांनी ही भाडय़ाची घरे खाली करून खर्चामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. यासाठी भाडे देऊ न शकलेल्या भाडेकरूनी घरांच्या चाव्या सुरक्षारक्षकांकडे देऊन घरातील टीव्ही, फ्रीज, फर्निचर सोडून मूळ गाव गाठलेले अनेक भाडोत्री आहेत.

नोकरी गमावलेल्या तसेच कपात झालेल्या नोकरदारांच्या व्यथा काही मालकांनी समजून घेतल्या असून भाडेकपात केली आहे. मात्र सप्टेंबरनंतर कमी भाडय़ांची ही घरेदेखील खाली करण्यात आली आहेत. त्यामुळे महामुंबई क्षेत्रात १५ हजार घरे आता भाडेकरूंच्या प्रतीक्षेत आजही आहेत. ही संख्या भाडय़ाचे घर नोंदणी

कार्यालयात नोंद केलेल्या तसेच काही भाडकरूंसाठी ऑनलाइन माहिती देण्यात आलेल्या घरांची असली तरी याव्यतिरिक्त ही संख्या २० ते २२ हजार घरांची असल्याचे मालमत्ता भाडय़ाने देणाऱ्या इस्टेट एजंट यांनी सांगितले आहे. करोनापूर्वी असलेल्या घराच्या भाडय़ात पन्नास टक्क्यापर्यंत भाडे कमी करूनही भाडोत्री मिळत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या शाळा व महाविद्यालये टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होत आहे. या काळात स्थलांतर होणाऱ्या पालकांची संख्या जास्त असल्याने भाडय़ांच्या घरांना पुन्हा चांगले दिवस येतील अशी आशा मालमत्ता सल्लागारांच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

सानपाडय़ात १४०० घरे खाली

करोनाकाळात अनेकांनी भाडय़ाची घरे वाऱ्यावर सोडून गाव गाठले आहे. काही जण कमी भाडय़ाच्या घरात स्थलांतर झालेले आहेत. टाळेबंदीनंतर आता परस्थिती बिकट होऊ लागली आहे. त्या वेळी किमान जीवनावश्यक वस्तूंचे कोणी तरी वाटप करीत होते. आता तेही नाही. भाडय़ाच्या घरांची भाडे अध्र्यावर आणूनही भाडोत्री मिळत नाहीत. एकटय़ा सानपाडय़ात १४०० खोल्या खाली आहेत. कमिशन न घेता सध्या आम्ही घर भाडय़ाने देत आहोत, असे इस्टेट एजंट विजय साळे यांनी सांगितले.

ऐरोली येथील एका मोठय़ा गृहसंकुलात आमचे घर असून ते भाडय़ाने दिलेले आहे. करोनापूर्वी या घराचे भाडे २१ हजार रुपये येत होते. त्यात बँकांचे कर्ज आणि इतर काही गरजा भागविल्या जात होत्या, मात्र करोनाकाळात खाली झालेले हे घर आता चार हजार कमी करून भाडय़ाने दिले आहे. खाली राहण्यापेक्षा कमी भाडय़ात ते भाडय़ाने देणे शहाणपणा होता.

– सचिन पवार, मालक, ऐरोली