15 July 2020

News Flash

१७ टक्के विकासक व्यवसायाबाहेर

‘क्रेडाई एमसीएचआय’ संघटनेचा अहवाल

संग्रहित छायाचित्र

‘क्रेडाई एमसीएचआय’ संघटनेचा अहवाल

नवी मुंबई : नोटाबंदी, महारेरा, जीएसटी आणि आता करोना अशा लागोपाठ तीन वर्षांत आलेल्या चार ‘संकटांमुळे’ अडचणीत आलेल्या १७ टक्के बांधकाम व्यावसायिकांनी गेली अनेक वर्षे सांभाळलेल्या व्यवसायाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘क्रेडाई एमसीएचआय’ या संघटनेने केलेल्या अंर्तगत सर्वेक्षणानंतर ही बाब समोर आली आहे. ८३ टक्के व्यावसायिकांनी व्यवसाय कायम ठेवण्याचे मत नोंदविले आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ बदलापूर, कर्जत, नवीन पनवेल, उरण या एमएमआर क्षेत्रात एकूण १० हजार २०० गृहप्रकल्प सुरू आहेत. सुमारे पाचशे विकासक हे प्रकल्प विकसित करीत आहेत. यात महारेरात नोंद नसलेले पण छोटे गृहप्रकल्प उभारणाऱ्या दोनशे विकासकांचा समावेश आहे. या विकासकांच्या ‘क्रेडाई एमसीएचआय’ या संघटनेने नुकतेच एक सर्वेक्षण केले आहे. पाचशे विकासकांशी बोलून त्यांची मते जाणून घेण्यात आली असून २३ वेबनार संवाद घेण्यात आले होते. यात ६० टक्के विकासकांनी पुढील नऊ ते १२ महिन्यांत आपण पूर्ववत व्यवसाय सुरू करू असे सांगितले आहे. तर तीस टक्के विकासक सहा महिन्यांत सर्वसाधारपणे व्यवसायाचा डोलारा सांभाळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. देशातील इतर उद्योजकांपेक्षा बांधकाम व्यवसाय गेली तीन वर्षे एका सतत संघर्षांतून जात असल्याचे या विकासकांच्या चर्चेतून निष्कर्ष काढण्यात आला आहे. इतर उद्योजकांप्रमाणेच हा व्यवसाय एका कठीण काळातून जात असून २०२१ मध्ये काही विकासक नवीन प्रकल्प सुरू करतील, असा आशावाद संघटनेचे अध्यक्ष नयन शहा यांनी व्यक्त केला आहे.

येत्या काळात कुशल कामगार व मजुरांची मोठी समस्या बांधकाम ठिकाणावर निर्माण होणार आहे. त्यामुळे मूळ व्यवसाय कायम ठेवून विकासक अत्यावश्यक सेवा आणि मनोरंजनसारख्या नवीन क्षेत्रात आपले नशीब अजमवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक विकासक हे आता आपल्या व्यवसायात भागीदार तसेच मालमत्तेच्या बदल्यात मालमत्ता देण्याचा वस्तुविनिमयचा (बार्टर) व्यवसाय सुरू करणार आहेत.

शेतघरांची गरज वाढणार

पुढील काळात महानगरातील रहिवाशांना सेकंड होम अथवा शेतघरांची गरज वाढणार असून वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांनी कमी दरात कर्ज उपलब्ध करून दिल्यास या व्यवसायात ही संकल्पना जोर धरणार असल्याचे विकासक राजेश प्रजापती यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 3:27 am

Web Title: 17 percent of developers left real estate business zws 70
Next Stories
1 रुग्णांसह योद्धय़ांचीही काळजी
2 टाळेबंदी काळातील विलंब शुल्क सर्व हप्ते सुरळीत भरल्यास माफ
3 वाशी एपीएमसीकडे किरकोळ विक्रेत्यांची पाठ
Just Now!
X