नवी मुंबई : शहरातील वाढती करोनाबाधितांची संख्या पाहाता पालिका प्रशासनाने नेरुळ येथील एका मैदानात १७०० खाटांचे करोना काळजी केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पनवेल येथील ‘इंडिया बुल्स’ यातील काळजी केंद्र तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे.

शहरातील करोनाबाधितांची संख्या ३४ हजाराच्या घरात गेली आहे. तसेच ७००पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शहरात अद्यापही ३ हजार ५०० उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यामुळे पालिका शहरात जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवीत आहे. गेल्या आठवडय़ात काळजी केंद्रासह करोना रुग्णालय तयार करून खाटांची संख्या वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निर्यातभवन येथील सुविधा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी प्राणवायू खाटांची खास महिलांसाठी सुविधा करण्यात आली आहे. तल वाशी येथील निर्यातभवन तसेच तुर्भे येथील राधास्वामी सत्संग भवन येथे १००० प्राणवायू खाटा वाढविल्या आहेत. आता नेरुळ येथील रहेजा मैदानात १७०० साध्या खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. पुढील १५ दिवसांत हे केंद्र सुरू होईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी दिली.

इंडिया बुल्सचे केंद्र तात्पुरते बंद

करोना प्रादुर्भाव वाढू लागल्याने पालिकेने पनवेल येथील ‘इंडिया बुल्स’ प्रकल्पात काळजी केंद्र सुरू केले होते. सुरुवातीपासूनच याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. तसेच ते शहराबाहेर असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी अडचण होत होती. हे केंद्र तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

इतर आजारांच्या गंभीर रुणांवरही उपचार

नवी मुंबई : सहा महिन्यांनंतर वाशी येथील पालिका प्रथम संदर्भ रुग्णालयात इतर आजारांच्या रुग्णांसाठी आजपासून आरोग्यसेवा सुरू करण्यात आली. तिसऱ्या मजल्यावर ९० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून अतिदक्षता खाटाही दिल्या जाणार आहेत.  नवी मुंबईत पालिकेचे हे एकमेव मोठे रुग्णालय करोना प्रादुर्भावानंतर समर्पित करोना रुग्णालय झाल्याने इतर आजारांच्या रुग्णांची गैरसोय होत होती. त्यामुळे या ठिकाणी परत सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी होत होती. त्यानुसार गेले काही दिवस फक्त बाह्यरुग्णसेवा सुरू केली होती. आजपासून ९० खांटांची व्यवस्था केली आहे. याबरोबरच टप्प्याटप्प्याने खाटांची संख्या वाढवली जाणार असून अतिदक्षता खाटांची सुविधा करण्यात येणार आहे.