शेखर हंप्रस

नवी मुंबई वाहतूक पोलीस खात्यातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न ऐरणीवर

वाहतूक नियंत्रित करण्यासाठी गेलेल्या एका हवालदाराचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने नवी मुंबई वाहतूक पोलीस खात्यातील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतूक नियमनात शहरात किमान १७५ पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, मात्र भरती प्रक्रियेतील संथगतीमुळे उपलब्ध पोलिसांच्या बळावर जबाबदारीचा गाडा हाकला जात आहे. मध्यंतरी वाहतूक पोलीस विभागाने शीव-पनवेल महामार्ग आणि मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याचे काम होईपर्यंत किमान ५० पोलिसांचे अतिरिक्त बळ पुरविण्याची मागणी प्रभारी उपायुक्त तुषार दोषी यांनी केली होती. परंतु या मागणीला केरीची टोपली दाखवण्यात आल्याची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांमधून उमटत आहे.

नोडमध्ये बोजवाराच

शीव-पनवेल महामार्गावरील खड्डे आणि मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या कामादरम्यान वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नवी मुंबईतील विविध नोडमध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याने नवी मुंबईतील विविध नोडमधील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. यात कळंबोली, तळोजा आणि खारघर या नव्याने विकसित होणाऱ्या नोडमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. बुधवारी, ५ सप्टेंबर रोजी सकाळी तळोजा येथे वाहतूक नियमनासाठी किमान दोन पोलिसांची आवश्यकता होती. तिथे फक्त अतुल घोगरे यांना तैनात करण्यात आले होते.

बदली करून वाहवा..

शीव-पनवेल महामार्गावर आम जनता प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करीत आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी पोलीस विभागाचेच वरिष्ठ अधिकारी याच रस्त्यावर वाहतूक कोंडीत अडकले असता त्यांनी याबाबत तत्कालीन आयुक्तांना जाब विचारला होता. त्यावेळी त्या अधिकाऱ्यांची नाराजी नको म्हणून वाहतूक शाखेच्या पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करून त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहवा मिळवल्याची चर्चाही शहरात रंगली होती.