17 February 2019

News Flash

१७६ कोटींचे प्रस्ताव चर्चेविना मंजूर

गणेशोत्सवाची सबब पुढे करून कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आले.

(संग्रहित छायाचित्र)

पूनम धनावडे

गणेशोत्सवाची सबब पुढे करीत अवघ्या दीड तासात २८ प्रस्तावांना मंजुरी

नवी मुंबई महापालिकेची सप्टेंबर महिन्याची सर्वसाधारण महासभेत गणेशोत्सव तयारीची सबब पुढे करीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने  कोणतीही चर्चा घडवून न आणता  अवघ्या दीड तासात १७६ कोटींचे प्रस्ताव मार्गी लावले.

दररोज ११ ची महासभा ही नेहमीप्रमाणे उशिराच सुरू झाली. १२ वाजता महासभेला सुरुवात झाली. यावेळी काही काळ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यात आला. त्यांनतरच्या कालावधीत १ वाजेपर्यंत प्रश्नोत्तराचा तास झाला. त्यांनतर प्रस्ताव पटलावर घेण्यात आले. त्यांनतर सप्टेंबर महिन्यातील सहा विषय विनाचर्चा मंजूर करून घेण्यात आले. विषय क्रमांक ३ यशवंत क्रीडांगणाची सुधारणा सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी मांडला. यावेळी इथापे यांनाही या प्रस्तावावर चर्चा करण्यास पीठासीन अधिकारी म्हणून महापौरांनी रोखले. आता गणेशोत्सव आहे सर्वाना लवकर जायचे आहे, अशी सबब पुढे करून सभागृह नेत्यांना बोलण्यास मज्जाव केला. यावेळी सभागृह नेत्यांनी महापौर यांचा निषेध करीत पुढील विषय मांडण्यास नकार दिला. सर्व नगरसेवक यांनी पुढे जाण्यास सांगून पुन्हा सभा सुरू करण्यात आली. मुख्य प्रस्तावातील ६ विषय संपवून तातडीचे विषय पटलावर घेण्यात आले. हे प्रस्तावदेखील वाचन, अनुमोदन करून मंजूर करण्याचा धडाका सुरू केला. यावेळी शिवसेना नगरसेवक बहादूर बिष्ट यांनीदेखील विषयांवर चर्चा न करता प्रस्ताव मंजुरी करून घेत असल्याच्या निषेधार्थ सभागृहात कागदपत्रे भिरकावून काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.

महापौर यांनी यालाही दुर्लक्षित करून प्रस्ताव मंजुरीचा धडाका सुरूच ठेवला होता. गणेशोत्सवाची सबब पुढे करून कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आले. घाई होती तर महासभा पुढेही घेता आली असती, अशी चर्चा नगरसेवकांमध्ये सुरू होती.

रस्त्यांची सुधारणा, पावसाळी गटारे..

यात २८ पैकी १३ प्रस्ताव हे कोटी रुपयांमध्ये आहेत. तातडीच्या प्रस्तावातील शहरातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीकरिता ४३ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता मंजूर करून घेण्यात आला. तसेच औद्योगिक पट्टय़ातील पटनी रस्त्याचे काँक्रिटीकरणासाठी ५७ कोटी १२ लाख तरतुदीचा प्रस्ताव होता. तसेच औद्योगिक क्षेत्रातील सी ब्लॉक इंदिरानगर सव्‍‌र्हिस रोड व वारलीपाडा वसाहती परिसरात रस्त्यांची सुधारणा व पावसाळी गटारे बांधण्यासाठी १७ कोटींचा प्रस्ताव होता. २३ कोटींचा दिघा विभागात मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, मलउदंचन केंद्र उभारणीचा प्रस्ताव, यशवंतराव चव्हाण क्रीडांगण सुधारणेचा ३ कोटींचा प्रस्ताव होता.

या प्रस्तावात परिपूर्ण माहिती देण्यात आलेली नाही. दिघ्यातील मलनिस्सारण वाहिन्यांच्या प्रस्तावासंदर्भात सूचना करायच्या होत्या, परंतु महापौर यांनी कोणतीही चर्चा न करिता प्रस्ताव मंजूर केले. गणेशोत्सव कारण पुढे करून घाईत मंजुरी देण्यात आली. सभा तहकूब करून पुढेही घेता आली असती.

– बहादूर भिस्त, नगरसेवक, शिवसेना

आजच्या महासभेत रस्त्यांची वार्षिक देखभाल, तसेच जेनेरिक औषधांना मान्यता देणे, दिघा विभागातील मलवाहिन्या या विषयांवर चर्चा करण्यात आली असती. मात्र गणेशोत्सव गडबड होती, तसेच तातडीची महासभा होती आणि काही धोरणात्मक काही निर्णय नव्हते, त्यामुळे आम्ही हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याची मानसिकता दर्शविली.

द्वारकानाथ भोईर, नगरसेवक, शिवसेना

सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधी, नागरिकांचे प्रस्ताव अधिक होते. प्रभागातील विकासकामे यांचे प्रस्ताव होते. हे प्रस्ताव शहर अभियंता, आयुक्त यांच्या पाहणीनंतरच सभागृहात आणले जातात. त्यामुळे या नागरिक कामांच्या प्रस्तावांवर चर्चा करणे विषय नव्हता. एखाद्या धोरण निर्णयावर प्रस्ताव असता तर त्यावर चर्चा केलीच असती. अशा प्रत्येक विषयावर चर्चा झाली तर एक महासभा तीन दिवस चालेल.

– जयवंत सुतार, महापौर

First Published on September 12, 2018 4:49 am

Web Title: 176 crore proposals without approval