नवी मुंबई : ठाणे शहरातील वाघबीळ परिसरात मृतावस्थेत आढळलेल्या १५ बगळ्यांनाही ‘बर्ड फ्लू’ झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नियंत्रण कक्षाची स्थापना करीत मृतावस्थेत आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती कळवण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यानुसार शहरात १८ कावळे व दोन कबुतरे मृतावस्थेत आढळले असून यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अहवालानंतर समजणार आहे.

बुधवारी शहरातील वाशी, सानपाडा, सीवूड् आणि तुर्भे येथे एकूण १४ कावळे व दोन कबुतरे मृतावस्थेत आढळली आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच हे कशामुळे मृत्युमुखी पडले हे स्पष्ट होईल. दरम्यान, नागरिकांना घाबरून जाऊ नये. मृत पक्षी आढळल्यास पालिकेला संपर्क करावा.

शहरातील काही भागांत कावळे आणि कबुतरे मृत आढळली आहेत. पुढील तपासणीकरिता पुणे येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात येणार आहेत. अहवालातूनच मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.

-डॉ. वैभव झुंझारे, पशुवैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका