पावसाळा सुरु होण्यापूर्वी नवी मुंबई पालिकेने शहरातील १८७ धोकादायक इमारतींची यादी शनिवारी जाहीर केली. यात वाशी येथील जेएनवन-जेएनटू प्रकारातील इमारतींचा देखील समावेश आहे. राज्य शासनाच्या मिराणी तसेच लिमये कमिटीने या इमारतींना धोकादायक जाहीर करुनही पालिकेने अद्याप धोकादायक जाहीर केले नव्हते. या इमारती धोकादायक जाहीर झाल्याने त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे. गतवर्षी धोकादायक इमारतींच्या यादीत केवळ ८१ इमारती होत्या.
नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या शेकडो इमारती दहा वर्षांत निकृष्ट ठरल्या आहेत. त्यात वाशीतील इमारतींची तर दारुण अवस्था आहे. पावसाळ्यात या इमारतींचे छत कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे या इमारतींच्या पुर्नबांधणीचा प्रश्न गेली वीस वर्षे ऐरणीवर होता. सरकारने गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात या इमारतींना जास्तीत जास्त अडीच एफएसआय जाहीर केला आहे. त्यापूर्वी त्या इमारती धोकादायक असणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली आहे. वाशी येथील जेएनवन, जेएनटु प्रकारातील इमारतींची पाहणी यापूर्वी राज्य सरकारने नेमलेल्या मिराणी व लिमये कमिटीने केली होती. या इमारती रहिवाशांना राहण्यास योग्य नसल्याचा अभिप्राय या दोन्ही समितीने दिला होता. तरीही पालिकेने या इमारतींना दरवर्षी धोकादायक इमारतीत समाविष्ट करण्याचे टाळले होते. त्यांचा अंर्तभाव करुन पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एकूण १८७ इमारतींची यादी शनिवारी जाहीर केली.