पालिकेकडे अतिदक्षता, कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या फक्त १९४ खाटाच; खासगी रुग्णालयांत शहराबाहेरील रुग्ण

नवी मुंबई : वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने ‘जम्बो’ आरोग्य सुविधा पुरविल्याचा दावा केला असला तरी शहरात अत्यवस्थ करोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या फक्त १९४ खाटाच उपलब्ध आहेत. त्यामुळे या रुग्णांची गैरसोय सुरूच आहे. काही रुग्णांना खाटा न मिळाल्याने मुंबई, ठाण्यातील खासगी रुग्णालयात जावे लागल्याच्या तक्रारीही आहेत. शहरातील खासागी रुग्णालयांकडे या खाटांची संख्या ही तीनशेच्या घरात आहे, मात्र ही रुग्णालये शहराबोरील रुग्णांना प्राधान्य देत आहेत.

शहरात सुरुवातीपासूनच अत्यवस्थ रुग्णांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याच्या रुग्णांच्या कुटुंबीयांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने नेरुळ येथील डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाशी करार करीत त्या ठिकाणी दोनशे अतिदक्षता तर ८० कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे पालिकेकडे अतिदक्षता खाटा १३० खाटा तर कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या ६४ खाटा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिवसाला रुग्णसंख्या चारशेच्या घरात असून करोनाबाधितांची संख्या ३१ हजार पार झाली आहे. मंगळवापर्यंत ३ हजार ४६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनामुळे ६७० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुढील काळात रुग्णसंख्या वाढणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासन नियोजन करीत आहे.

सद्य:स्थितीत शहरात पालिका व खासगी रुग्णालयात मिळून ३ हजार ३०९ खाटा उपलब्ध आहेत. यात प्राणवायू असलेल्या २ हजार २६६ तर अतिदक्षता खाटा ३३५ तर कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या १३५ खाटा आहेत.

सद्य:स्थितीला करोना रुग्ण पाहता या खाटा पुरेशा आहेत. मात्र अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना खाटा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अत्यवस्थ रुग्णांसाठी पालिकेकडे अतिदक्षता, कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या १९४ खाटा आहेत. तर खासगी रुग्णालयात २७६ आहेत. असे असतानाही अत्यवस्थ रुग्णांसाठी खाटा मिळत नाहीत. काही रुग्णांच्या नातेवाईकांना शहरात खाटांची शोधाशोध करावी लागत आहे. काहींना मुंबई, ठाण्यात जाऊन खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.

असे असताना खासगी रुग्णालयांवर पालिकेचे बंधन नसल्याने खासगी रुग्णालयात असलेल्या खाटांवर शहराबाहेरील रुग्णांची संख्या अधिक आहे. शासन नियमानुसार खासगी रुग्णालयाने ८० टक्के रुग्णांचा उपचार शुल्क हे शासकीय दराने तर फक्त २० टक्के रुग्णांचे उपचार शुल्क हे त्यांच्या दरानुसार आकारणे बंधनकारक आहे. असे असताना या रुग्णालयांत ४० टक्के शहराबाहेरील रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे पालिका क्षेत्रातील अत्यवस्थ रुग्णांना प्रथम प्राधान्य द्यावे अशी मागणीही रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. तर पालिकेनेही या खाटांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.

नवी मुंबई शहरात अतिदक्षता व कृत्रिम श्वसनयंत्रणा असलेल्या खाटा मिळत नाहीत. नातेवाईकाला श्वास घेण्यास त्रास होत होता. खाट मिळावी म्हणून पाच रुग्णालयांत गेला, मात्र खाट उपलब्ध झाली नाही. पालिकेने या खाटांची संख्या वाढवून सामान्य रुग्णांचे हाल थांबवावेत.

– नरेश कालेकर, सीवूड्स, रुग्णाचे नातेवाईक

पालिकेकडून अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणा खाटांची संख्या वाढवण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात ४० खाटांवर शहराबाहेरील रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना शहरातील रुग्णांसाठी बंधन करणे योग्य होणार नाही. त्यासाठी पालिकेला खाटांची संख्या वाढवावी लागेल.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

खासगी रुग्णालयातील

२०५ अतिदक्षता खाटा

७१ कृत्रिम श्वसन यंत्रणा

पालिकेकडील

१३० अतिदक्षता खाटा

६४ कृत्रिम श्वसन यंत्रणा