नवी मुंबई : शहरात काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असून करोनामुक्तीचा दरही लोकसंख्येच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक असल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर दुसरीकडे प्रतिदिन सरासरी ३ हजार चाचण्यांचे लक्ष पालिकेने ठेवले आहे. आतापर्यंत २ लाख ५० हजार नागरिकांच्या म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत १७ टक्के नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईची तरंगती लोकसंख्या अंदाजे १५ लाख असून आतापर्यंत अडीच लाखांवर चाचण्यांची संख्या पोहचली आहे. आगामी काळात जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. पालिकेची स्वत:ची प्रयोगशाळा सुरू झाल्यापासून शहरातील चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. दिवसाला सरासरी ३ हजार चाचण्या केल्या जात आहेत.

नवी मुंबई शहरातील बेलापूर, वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, ऐरोली या विभागात करोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात सापडत असून नेरुळ  करोनाबाधितांच्या संख्येत आघाडीवर आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही जास्तीत जास्त चाचण्या करून तात्काळ उपचार करण्याचे सूचित केले आहे.

नागरिकांनी चाचण्यांसाठी सहकार्य करावे. शहरात २२ केंद्र असून विविध ठिकाणी जाऊन चाचण्या करण्यात येत आहेत. सध्या एमआयडीसी विभागात अधिक चाचण्या करण्यात येत आहेत, असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

चाचण्यांची संख्या (२० ऑक्टोबरपर्यंत)

१,५८,८९० प्रतिजन चाचण्या

९१,३६३ ‘आरटीपीसीआर’  चाचण्या

२ लाख ५० हजार २५३ चाचणी झालेले नागरिक