पनवेल : करोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी पनवेलमध्ये करोना मृत्यूंची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. बुधवारी एकाच दिवशी २० जणांचा मृत्यू झाला तर अकरा दिवसांत पालिका क्षेत्रातील १३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

मागील तीन दिवसांपासून मृत्यूची संख्या वाढतच असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दिवसाला आढळणाऱ्या नव्या बाधितांची संख्या तुलनेत चारशेच्या खाली असली, तरी मृतांच्या संख्येत होत असलेली वाढ धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत पालिका क्षेत्रात ९३४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत नेमलेल्या समितीला तीन मोठय़ा रुग्णालयांतील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या लाटेतील करोना रुग्णांचा ‘एचआरसीटी’ स्कोर हा २५ पर्यंत गेल्यानंतर अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे त्यांना वाचविण्याचे काम जीवरक्षक प्रणालीही करू शकत नाहीत. तसेच वेळेवर रुग्ण दाखल झाल्यानंतर उपचार सुरू झाल्यानंतही एचआरसीटीचा स्कोर वाढत असल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे रुग्णांनी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि  करोना नियमांचे पालन करावे हा मार्ग असल्याचा सल्ला आरोग्य समितीने पालिकेला दिला आहे.

दिनांक       रुग्ण   मृत्यू

५ मे              ३५४    २०

४ मे             २९८    १५

३ मे              २५७    १९

२ मे              ३३५    १३

१ मे             ३३७     ०६

३० एप्रिल      ५२३    ०९

२९ एप्रिल      ५३५    ०८

२८ एप्रिल      ५२३    ०८

२७ एप्रिल      ४५३    १०

२६ एप्रिल      ४०२    १३

२५ एप्रिल      ५७७    १०