अनेकदा आंदालने करूनही अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. असे असताना सिडकोने कळंबोली सेक्टर ५ मधील नागरिकाना वाढीव पाणी देयके पाठवली आहेत. त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून वाढीव पाण्याच्या देयकांना विरोध करीत आहेत. ‘स्वच्छ पाणी पुरवठा करा, त्यानंतरच पाण्याची वाढीव देयके वसूल करा’ अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

येथील सेक्टर ५ ई येथील केएलवन आणि केएल ४ या वसाहतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मलमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नळाला पाणी आल्यानंतर किमान पंधरा मिनिटे पाणी सोडून द्यावे लागते. त्यानंतर पाणी भरले जात आहे. असे असताना सिडको प्रत्येक नळजोडणीधारकाला २० रुपये प्रति युनिट दराने पाण्याची देयके पाठवीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

कळंबोली वसाहतीमधील बैठय़ा वसाहतीसह इतर वसाहतींना सिडकोने जलमापके बसविली नव्हती. पनवेल पालिकेच्या हस्तांतरणापूर्वी ही जलमापके बसविण्यात आली असून त्या माध्यमातून पाणी शुल्क वसूल केले जात आहे. कळंबोलीतील सुमारे आठ हजार रहिवासी व वाणिज्य खातेधारकांना सिडकोतर्फे पाणीपुरवठा केला जातो. या भागाला ३२ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना ३० एमएलडी पाणी दिले जाते. त्यामुळे पाण्याचा तुटवडा भासतो. सिडको पाणी देयकातून महिन्याला सुमारे दीड कोटी रुपयांचा महसूल गोळा करते.

करोना संकटकाळात या बैठय़ा वसाहतीमधील अनेकांचा हातचा रोजगार गेला असताना सिडकोने पाठविलेल्या पाणी देयकांविरोधात येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. येथील सदनिकाधारकांना यापूर्वी महिन्याला ७५ रुपये देयक भरावे लागत होते. सध्या जलवाहिनीला जलमापके बसविल्याने महिन्याला तीनशे रुपयांहून अधिक पाणी शुल्क भरावे लागत आहे. वेळीच देयके न भरल्यास दंडाची रक्कम वर्षांला १६ टक्के आकारले जात आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मलमिश्रित पाण्याचे शुल्क व त्यावरील दंडव्याज द्यावा लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी मागील दोन वर्षांपासून मलमिश्रित पाण्याचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन देत आहेत. मात्र प्रत्यक्षात याबाबत काहीही झालेले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याबाबत सिडकोकडे मागील दोन वर्षांपासून शुद्ध पाण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतरही हा प्रश्न कायम असल्याने नगरसेवक सतीश पाटील यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे याबाबत निवेदन देत हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.
याबाबत सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन दलाल आणि अधीक्षक अभियंता प्रणिक मूळ यांच्याशी संपर्क साधला मात्र ते बैठकीत असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

शुद्ध पाण्यासाठी वर्षभर प्रतीक्षा

सिडकोकडून सव्वा कोटी रुपये खर्च करून सुमारे दोन किलोमीटरची जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. या कामासाठी निविदाही जाहीर केली असून चार कंत्राटदारांनी सहभाग घेतला आहे. मात्र अद्याप हे काम दिलेले नाही. त्यामळे पुढील प्रक्रिया पार पडल्यानंतर काम पूर्ण होण्यास किमान वर्षांचा कालावधी लागणार आहे.

पाणी वापर वाढल्याचे कारण

सिडको ५४ हजार लिटरपेक्षा पाण्याचा कमी वापर असल्यास प्रति हजार लिटरसाठी आठ रुपये प्रति युनिटचा दर, ७२ हजार लिटपर्यंत वापर असलेल्यांना १० रुपये आणि ७२ ते ८४ हजार लिटर वापरकर्त्यांसाठी १५ रुपये तर त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर असल्याने २० रुपये प्रति युनिट दर सिडको आकारते. मात्र या बैठय़ा वसाहती असताना व पाणीही अशुद्ध येत असताना सिडको २० रुपये दर आकारत असल्याने येथील नागरिकांचा विरोध आहे. सिडको बैठय़ा वसाहतीमध्ये वाढीव बांधकाम केल्याने पाण्याचा वापर वाढल्याचे कारण पुढे आहे.