पाच केंद्रांवर लसीकरण; पहिल्या दिवशी ५०० करोना योद्धय़ांना लस

नवी मुंबई : करोना लसीकरणाचा मूहूर्त निघाला असून १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी ५०० करोना योद्धय़ांना लस दिली जाणार असून यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. पाच केंद्रांवर हे लसीकरण होणार आहे. लशीचा साठा ठाणे जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात मिळाला असून बुधवारी सायंकाळी नवी मुंबईत लस दाखल झाली आहे.

पहिल्या टप्प्यात २१,२५० हजार करोना लशींच्या कुप्या पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. पालिका आयुक्तांनी बुधवारी लसीकरणाबाबत आढावा बैठक घेत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे तसेच सिटी टास्क फोर्स समितीचे विविध सदस्य दूरचित्रसंवादाद्वारे या बैठकीस उपस्थित होते.

लसीकरण मोहिमेवर नियंत्रण ठेवण्याची मुख्यालय स्तरावर जबाबदारी वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांना दिली असून विभागनिहाय तीन विभाग अधिकारी नेमण्यात आले आहेत. हे अधिकारी त्या त्या विभागात नियोजन व नियंत्रण करणार आहेत.

लसीकरणासाठी शहरात ५० लसीकरण केंद्रांची तयारी पालिकेने केली आहे. मात्र पहिल्या दिवशी यातील ५ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. पहिल्या टप्प्यात करोनाकाळात आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय व खासगी आरोग्यकर्मीना लसीकरण केले जाणार असून १९ हजार ८५ करोना योद्धय़ांची नोंद पालिकेने केली आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाटीच्या नोंदीही झाल्या आहेत.

लस साठवणुकीसाठी आवश्यक सुविधा तपासून घेण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले असून लस प्राप्त झाल्यानंतर ती वाशी गाव येथील नागरी आरोग्य केंद्रात साठा करण्याची सर्व तयारी करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी दिली.

लसीकरणाची पूर्वकल्पना

लसीकरणासाठी नोंदणी झालेल्या आरोग्यकर्मीना त्यांचे लसीकरण कोणत्या केंद्रावर, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळेत होणार आहे, याचा संदेश मोबाइलवर प्राप्त होणार आहे. प्रत्येक केंद्रावर दर दिवशी १०० व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे.

या ठिकाणी लसीकरण

पहिल्या दिवशी पाच केंद्रांवर लसीकरण होणार असून यात पालिकेची वाशी व ऐरोली ही दोन सार्वजनिक रुग्णालये, नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, अपोलो व रिलायन्स रुग्णालयांचा समावेश आहे.

करोना लसीकरणाची सराव फेरी यशस्वी झाली असून पहिल्या दिवसाच्या लसीकरणाचे नियोजनही करण्यात आले आहे. ५०० जणांना लसीकरण करण्यात येणार असून बुधवारी सायंकाळी  २१ हजार कुप्या प्राप्त झाल्या आहेत.

अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका