उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून पनवेल तालुक्यातील शंभराहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या मंडपांची जागा बदलली, मात्र परवानगी न मिळालेल्या मंडळांनी रस्त्यामध्येच मंडप थाटले आहेत. उच्च न्यायालयाचे आदेश डावलणाऱ्या मंडळांची सूची बनविण्याचे काम पोलीस खात्यात सुरू असल्याचे सहायक पोलीस आयुक्त एस. बी. सूर्यवंशी यांनी सांगितले. २३ गणेशोत्सव मंडळांनी विनापरवानगी उत्सव साजरा करण्याची तयारी चालविल्याने पोलिसांची या मंडळांवर करडी नजर आहे.
पनवेल तालुक्यामध्ये एकूण ३३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांपैकी सोमवापर्यंत १२४ मंडळांना सिडको, पनवेल नगर परिषदेने परवानगी दिली आहे. रस्ते अडवणाऱ्या आणि प्रशासनाने आखून दिलेले निकष पूर्ण न करणाऱ्या मंडळांना परवानगी मिळालेली नाही. त्यापैकी खारघरमध्ये सर्वाधिक १५, कामोठे पाच, तळोजा २ आणि खांदेश्वर १ अशी आहेत. दोनशे मंडळांना पोलीस आणि संबंधित स्वराज्य संस्थेने परवानगी दिलेली आहे. या मंडळांनी मंडपांची जागा बदलली आहे. खारघरमध्ये एकूण ३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी निम्म्यांना परवानगी मिळालेली नाही. यंदा न्यायालयाच्या आदेशाची पोलिसांनी काटेकोर अंमलबजावणी केल्याने २५ पारंपरिक मंडळांनी रस्त्याची जागा सोडून शेजारच्या मोकळ्या जागेवर गणेशोत्सव साजरा करीत असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त एस. बी. सूर्यवंशी यांना दिली. परवानगीशिवाय उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
कारवाई नाही
सिडकोकडून परवानगी मिळावी यासाठी काही मंडळांनी अर्ज केला आहे. मात्र निकष पूर्ण करू न शकलेल्या मंडळांना सिडकोने परवानगी नाकारली. परंतु संबंधित मंडळांना परवानगी नाकारल्याचे थेट न सांगितल्यामुळे हा गोंधळ झाला आहे. न्यायालयाचा आदेश मोडणाऱ्या मंडळांविरोधात पोलिसांनी सिडको व पनवेल नगर परिषदेला एक गोपनीय पत्र दिले आहे. या पत्रात संबंधित मंडळाने रस्ता अडविला असल्याने आपल्या प्रशासनाने पोलीस संरक्षण घेऊन त्यावर कारवाई करावी असे सुचविले आहे. मात्र या मंडळांवर अद्याप तरी कारवाई झालेली नाही.