नवी मुंबई महानगरपालिकेच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आरोग्य विभागाच्या २४ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. आरोग्य विभागासाठी पॅथोलॉजी साहित्य खरेदी करणे, वाशी, कोपरखरणे, नेरुळ, तुभ्रे रुग्णालयांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याच्या कंत्राटी कामास मंजुरी देणे, ऐरोली व नेरुळ येथील ऐरोली माता-बाल रुग्णालयात फर्निचर खरेदी करणे, रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य खरेदी करणे, सर्व रुग्णालयांतील धुलाई व इस्त्री व शिलाईसह करून देण्याचे कंत्राट देणे, औषध खरेदी, नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयात उपाहारगृह व आंतररुग्णांना भोजन देण्यासाठी कंत्राट देणे आदी २४ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
हिरानंदानी रुग्णालयावर उभारलेल्या अनधिकृत मोबाइल टॉवरच्या विषयाकडे तसेच नेरुळ व ऐरोली येथील माता-बाल रुग्णालयामध्ये अद्याप नामफलक लावण्यात आले नसल्याच्या मुद्दय़ाकडे नगरसेवक शिवराम पाटील यांनी लक्ष वेधले. यावेळी आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याप्रकरणी योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले.