कारखानदारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

तळोजा औद्योगिक वसाहतीत सध्या ४० टक्के पाणी कपात सुरू आहे. येत्या सोमवारपासून तिच्यात आणखी २५ टक्के कपात करण्यासाठीचे पत्र कारखान्यांच्या मालकांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे बुधवार ते शनिवार पाणी ठणठणाट असताना रविवार ते मंगळवार या तीन दिवसांसाठी पुन्हा २५ टक्के पाणी कपात केल्यास कारखाने चालवणेच अवघड होऊन बसेल.  त्यामुळे उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. तळोजातील पाणीप्रश्न काहीही करून सोडवा अन्यथा, कंपन्यांना टाळे लावावे लागतील, अशी शक्यता ‘तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशिएशन’च्या प्रतिनिधींनी (टीएमए) ‘महामुंबई वृत्तांत’शी बोलताना व्यक्त केली.

मागील आठवडय़ात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानी घातला. त्यानंतर पाताळगंगा नदीतून दीड दशलक्ष घनमीटर पाणी कारखान्यांना पुरविण्यात आले; परंतु येथील उद्योगांची पाण्याची गरज २५ दशलक्ष घनमीटर एवढी आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या उदंचन केंद्रातील शुद्धीकरण झालेले पाणी या वसाहतीला मिळाल्यास किमान कारखान्यांमधील इतर पाण्याच्या वापराची सोय होईल असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला आहे. यासाठी जलवाहिनी टाकण्यासाठी पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक असल्याने कारखान्यांना तात्काळ पाणी मिळणे शक्य नाही, तसेच पाताळगंगा नदीतून २० दशलक्ष घनमीटर पाणी अतिरिक्त वाढीव मिळाल्यास या औद्योगिक वसाहतीचा सध्याचा पाणीप्रश्न सुटेल; मात्र यासाठी सरकारदरबारी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट सोमवारपासून एकूण ६५ टक्के पाणी कपातीच्या पत्रामुळे तळोजातील कारखानदार हैराण झाले आहेत.